ह्रतिक रोशन 'गुरुजी' शिकविणार 'राजा कौन बनेगा?'; पाहा 'सुपर 30' ट्रेलर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जून 2019

बिहारचे गणित शिक्षक आनंद कुमार यांच्या आयुष्यातील शिक्षण देतानाचा संघर्ष 'सुपर 30' चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे. ह्रतिकने या चित्रपटात आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

अभिनेता ह्रतिक रोशन बऱ्याच कालावधीनंतर एका दमदार चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'सुपर 30' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून सत्यकथेवर आधारित हा चित्रपट असेल. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बिहारचे गणित शिक्षक आनंद कुमार यांच्या आयुष्यातील शिक्षण देतानाचा संघर्ष या चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे. ह्रतिकने या चित्रपटात आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

खऱ्या आयुष्यातील आनंद कुमार पाटणा येथे 'सुपर 30' नावाचे कोचिंग क्लास चालवतात. जेथे गरीब घरातील मुलांना आयआयटीचं ट्रेनिंग दिलं जातं. शिकवणी सोबतच या मुलांचा राहण्याचा आणि जेवणाचा खर्चही ते उचलतात. याशिवाय कुमार हे 'रामानुजम क्लासेस'ही चालवतात. या क्लासमध्ये पैसे घेऊन शिकवलं जातं. या क्लासमधून येणाऱ्या निधीतून 'सुपर 30' क्लासचा खर्च भागविला जातो. 'सुपर 30' क्लासमध्ये कुमार हे दरवर्षी घरातील परिस्थिती बेताची अन् गरीब असलेली पण अभ्यासाची ओढ असलेली 30 मुलांची निवड करतात. त्यांना आयआयटीचं शिक्षण देतात. गेल्या पंधरा वर्षात आनंद कुमार यांनी अशाप्रकारे शिकविलेल्या 450 विद्यार्थ्यांपैकी 396 विद्यार्थ्यांना आयआयटी पात्र केलं आहे. 

पण कुमार यांना हे क्लास चालविण्यासाठीच नव्हे तर त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणापासूनच खूप संघर्षाला सामोरे जावं लागलं होतं. त्यांनी सायकलवरुन पापड विकून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. आनंद कुमार यांना त्यांच्या आंतरजातीय विवाहामुळेही समाजातून मिळाणाऱ्या विरोधाला आणि त्रासाला तोंड द्यावं लागलं होतं. कुमार यांना राष्ट्रीय कल्याण पुरस्कारासोबतच अन्य पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. 

'सुपर 30' चित्रपट विकास बहल यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात टिव्ही अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसणार आहे. याशिवाय पंकज त्रिपाठी, नंदिश सिंह सिंधू, विरेंद्र सक्सेना आणि अमित साध हे कलाकारही चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील. 12 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hrithik Roshan starer Super 30 Hindi Film trailer launched