हम, तुम और स्पोर्टस..!

हम, तुम और स्पोर्टस..!
हम, तुम और स्पोर्टस..!

चित्रपट आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांचे अगदी हातात हात नसले, तरीही संबंध सौहार्दाचे आहेत. म्हणजे, क्रीडापटू किंवा क्रीडा याविषयावर चित्रपट अलीकडच्या 15 वर्षांत मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागले असले, तरीही या दोन्ही क्षेत्रांमध्ये संबंध पूर्वीपासूनचे आहेत. आशुतोष गोवारीकर यांनी 'पाथ-ब्रेकर' होत 2001 मध्ये 'लगान' तयार केला. आमीर खानसारखा 'सिन्सिअर' अभिनेता, पारतंत्र्यातील ब्रिटिशांविरोधातील सर्वसामान्यांच्या लढ्याला दिलेले क्रिकेटच्या सामन्याचे स्वरूप हे एकदम भन्नाटच रसायन होतं. तेव्हाची पार्श्‍वभूमीही इंटरेस्टिंग होती. चित्रपट प्रदर्शित झाला 2001 च्या जूनमध्ये आणि त्याच वर्षी मार्चमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ती ऐतिहासिक कोलकता कसोटी जिंकली होती. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला धूळ चारल्याचा आनंद क्रिकेटप्रेमींच्या मनात बराच काळ टिकतो. त्याच 'झील'मध्ये आशुतोष गोवारीकर यांचे हे भन्नाट रसायन समोर आले. याला अर्थातच दणदणीत प्रतिसाद मिळाला. त्यानंतर भारतात क्रीडाविषयक चित्रपटांची लाट आली. त्यातील सर्वच चित्रपट फार उच्च दर्जाचे होते, असाही भाग नाही; पण निदान प्रत्यक्षात समाजात दुर्लक्षित असलेल्या क्रीडा क्षेत्राला रुपेरी पडद्यावर तरी दाद मिळण्यास सुरवात झाली, हेही नसे थोडके!

2001 ते 2016 या 15 वर्षांत आलेल्या क्रीडाविषयक असंख्य चित्रपटांपैकी मोजके निवडक चित्रपट इथे मांडत आहोत. तुम्हीही कळवा तुमचे आवडते क्रीडाविषयक चित्रपट आणि लिहा तो चित्रपट सर्वांनी का पाहावा..! लिहा तुमच्या भावना आणि पाठवा आमच्याकडे webeditor@esakal.com या ई-मेलवर. 'सब्जेक्‍ट'मध्ये 'क्रीडा चित्रपट' असे आवर्जून लिहा.

■ दंगल
कलाकार : आमीर खान, साक्षी तन्वर, फातिमा साना शेख, सान्या मल्होत्रा, गिरीश कुलकर्णी.
दिग्दर्शक : नितेश तिवारी
प्रदर्शन : 23 डिसेंबर, 2016
व्यवसाय : पहिल्या सहा दिवसांत 340 कोटी रुपये
कथानक : 'भारताला कुस्तीत सुवर्णपदक मिळवून द्यायचंच' या ध्यासानं पछाडलेल्या महावीरसिंग फोगाट या अवलियाची ही कहाणी. यात कुस्ती आहे, खेळातलं राजकारण आहे आणि बाप-मुलीचं नातंही आहे. समाजाचे टक्के-टोणपे खात स्वत:च्या मुलींना कुस्तीच्या आखाड्यात उतरवणारा, 'सराव चांगला व्हायला हवा' म्हणून मुलांबरोबर त्यांना कुस्ती लढवणारा आणि हे सगळं करताना कुठेही 'मी खूप ग्रेट काम करतोय' असा आविर्भाव नसलेले महावीरसिंग आणि त्यांच्या दोन पैलवान मुली यांची ही कथा.

का बघावा हा चित्रपट?
रिओ ऑलिंपिकमधल्या अपयशानंतर तुम्ही खेळाडूंना शिव्या दिल्या असतील किंवा खिल्ली उडवली असेल, तर आवर्जून 'दंगल' पाहा. त्यात आपण महावीरसिंगच्या बाजूनं दिसतो की इतरांच्या, हे स्वत:चं स्वत:च ठरवा. आणखी एक.. 'मिस्टर परफेक़्शनिस्ट' आमीर खान चित्रपटात सतत स्क्रीनवर तोच अजिबात झळकत नाही..! आपल्या 'सुपरस्टार' कल्पनेला बसणारा सुखद धक्का अनुभवण्यासाठी पाहा.

सुलतान
दिग्दर्शक : अली अब्बास जफर
कलाकार : सलमान खान, अनुष्का शर्मा, रणदीप हुडा, अमित सध
प्रदर्शन : 6 जुलै, 2016
व्यवसाय : 5.84 अब्ज रुपये
कथानक : पैलवान घराण्यातील मुलीच्या प्रेमात पडून तिला मिळविण्यासाठी पैलवानी सुरू केलेल्या एका काल्पनिक तरुणाची ही कथा. पैलवानी करताना मिळालेले यश आणि त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात निर्माण झालेला तणाव, त्यानंतर बदललेले आयुष्य आणि कुस्तीच्या एका नव्या रुपात 'रिंग'मध्ये परतल्यानंतर झालेले बदल यावर हा रोमॅंटिक-ड्रामा आहे. सलमान खानने रंगविलेला पैलवान आणि अनुष्का शर्माचा अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू..

का बघावा हा चित्रपट?
कुस्ती आणि मिक्‍स्ड मार्शल आर्टसमधील डावपेचांचे मर्यादित चित्रण, कानाला गोड वाटणारी हरियानातील बोली भाषा, अगदी थोडा वेळ असलेला रणदीप हुडा, खेळाडू-प्रेमिका-पत्नी-आई अशा सर्व भावना व्यवस्थित रंगविणारी अनुष्का शर्मा आणि अर्थातच.. सलमान खानचा 'स्क्रीन प्रेझेन्स'!

पानसिंग तोमर
दिग्दर्शक: तिग्मांशू धुलिया
कलाकार: इरफान खान, माही गील, विपीन शर्मा,
प्रदर्शन : 2 मार्च, 2012
व्यवसाय : 38 कोटी 40 लाख रुपये
पुरस्कार :

  1. 60 व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपट आणि इरफान खानला उत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार
  2. 58 व्या फिल्मफेअर ऍवॉर्डमध्ये उत्कृष्ट पटकथा आणि इरफान खानला समीक्षकांचा उत्कृष्ट कलाकार पुरस्कार
  3. उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट पटकथा, उत्कृष्ट कलाकार म्हणून कलर्स स्क्रिन ऍवॉर्ड. याशिवाय अन्य पुरस्कार

कथानक : ऍथलेटिक्‍समध्ये नाव गाजवणारा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर गुंड-दरोडेखोर कसा आणि का झाला, या पानसिंग तोमर यांच्या सत्यकथेवर आधारित हा चित्रपट! लष्करातून निवृत्त झाल्यानंतर मूळ गावी परतलेला तोमर आणि त्यांच्या घरावर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्थानिक गुंडाशी झालेला संघर्ष, त्यातून पानसिंगने तयार केलेली टोळी, 'बदला घेणे' या हेतूने एकत्र आलेली ही टोळी नंतर दरोडेखोरीकडे वळते आणि मग रक्तरंजित शेवट होणे अटळच..!

का पाहावा चित्रपट?
इरफान खान..! पात्र पूर्णपणे अंगात भिनलेलं आहे; तरीही काहीशा त्रयस्थपणे भूमिका साकारण्याचं इरफानचं कसब वादातीत आहेच. संवादफेकीतूनही अभिनयाचा 'टोन' कसा सेट करता येतो, हे इरफानच्या 'पानसिंग'कडे पाहून कळतं. प्रशासन मुर्दाड असलं, की आयुष्य कसं उध्वस्त होऊ शकतं, याची आपल्याच देशात घडलेली ही गोष्ट एकदा तरी डोळे उघडून पाहायलाच हवी.

लगान
दिग्दर्शक: आशुतोष गोवारीकर
कलाकार: आमीर खान, ग्रेसीसिंह, राजेश विवेक, रघुवीर यादव, यशपाल शर्मा, पॉल ब्लॅकथोम, रॅशेल शेली
प्रदर्शन : 15 जून, 2001
व्यवसाय : 70 कोटी
पुरस्कार:

  1. उत्कृष्ट अभिनेता (आमीर खान), उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट संगीतकार म्हणून 2002 चा फिल्मफेअर पुरस्कार
  2. उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाबद्दल 2003 सालचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.
  3. 'आयआयएफए'चा 2002 चा उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार. याशिवाय अन्य अनेक पुरस्कार.
  4. ऑस्करसाठी नामांकन मिळालेला तिसरा भारतीय चित्रपट.

कथानक: 'पारतंत्र्याच्या काळातील एका छोट्या खेड्यात दुष्काळामुळे त्रासलेले गावकरी आणि ब्रिटिश अधिकारी यांच्यात झालेला संघर्ष' ही चित्रपटाची मूळ 'थीम'! पण हा संघर्ष अपेक्षेप्रमाणे रक्तरंजित नसून क्रीडांगणावर होतो, हे याचे वेगळेपण. 'क्रिकेटमध्ये आम्हाला पराभूत केलं, तर तीन वर्षे तुम्ही महसूल-मुक्त असाल' असे आव्हान देणारा आढ्यतेखोर ब्रिटिश कॅप्टन रसेल आणि 'सरत मंजूर है!' करून त्याला शिंगावर घेणारा गावातला उमदा तरुण भुवन यांचा हा संघर्ष. यात प्रेम, प्रेमाचा त्रिकोण, देशभक्ती वगैरे नेहमीचे 'मसाले' आहेतच.

का पाहावा हा चित्रपट?
'पारतंत्र्यातील संघर्ष' म्हटल्यावर बंदुका-तोफा-तलवारी, हाणामारी या आपल्या पारंपरिक कल्पनेला आशुतोष गोवारीकर यांनी छेद दिला. 'क्रिकेट म्हणजे युद्धच' मानणाऱ्या या देशातला एखादा संघर्ष असा रक्तहीनही असू शकतो, त्याला क्रिकेटच्या थराराची जोडही देता येऊ शकते आणि मुख्य म्हणजे 'चांगला कन्टेंट असेल, तर तीन तासांचा चित्रपटही प्रेक्षक पाहतात' हे सिद्ध करणारा हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड! या चित्रपटानंतर भारतामध्ये क्रीडाविषयक चित्रपटांचा प्रवाह सुरू झाला.

मेरी कोम
दिग्दर्शक : ओमंग कुमार
कलाकार : प्रियांका चोप्रा, सुनील थापा, दर्शन कुमार
प्रदर्शन : 5 सप्टेंबर, 2014
व्यवसाय : 104 कोटी
पुरस्कार :

  1. 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार
  2. 60 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट व प्रियांका चोप्राचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन
  3. 16 व्या IIFA पुरस्कारांमध्ये ओमंग कुमारला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पणाचा पुरस्कार

कथानक : भारतात 'महिला मुष्टियुद्धाचा चेहरा' ही ओळख असलेली मेरी कोम कशी 'घडली', याची ही सत्यकथा..! वेगळी वाट निवडून, 'माझं नशीब मीच लिहिणार' असा आत्मविश्‍वास असलेल्या मांग्ते चंग्निजॅंग मेरी कोमने मुष्तियुद्धातच करिअर करण्याचा धाडसी निर्णय घेतला.मणिपूरमध्ये भात शेती करणाऱ्या शेतकऱ्याची ही मुलगी पाच वेळा जगज्जेतीही झाली. हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट असल्याने 'पानसिंग'प्रमाणेच 'मेरी कोम'मध्येही प्रशासकीय मुजोरीचं यथास्थित चित्रण झालं आहे.

का पाहावा हा चित्रपट?
एखादा खेळाडू घडतो म्हणजे किती दिव्यांमधून जातो आणि त्यातही खेळ मुष्टियुद्धासारखा पुरुषी असेल, तर पाहायलाच नको! मुळात खेळाकडे 'लास्ट प्रायोरिटी' अशा दृष्टीकोनातून पाहणाऱ्या आपल्या देशात एखादी महिला मुष्टियुद्धासारखा खेळ निवडते, कुटुंबापासून प्रशासनापर्यंत सगळ्यांशी झगडून स्वत:ची छाप पाडते आणि जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळविते, यातून प्रेरणा मिळत नसेल, तर मग आपलं अवघड आहे!

अजहर
दिग्दर्शक : टोनी डिसोझा
कलाकार : इम्रान हाश्‍मी, नर्गिस फाक्री, प्राची देसाई, लारा दत्ता, कुणाल रॉय कपूर.
प्रदर्शन : 13 मे, 2016
व्यवसाय : 42.1 कोटी
कथानक : क्रिकेटवेड्या देशामध्ये क्रिकेटची आणि प्रेक्षकांची फसवणूक करणे हा मोठाच गुन्हा! हाच गुन्हा केल्याचा आरोप झालेल्या महंमद अजहरुद्दीन या माजी कर्णधाराच्या जीवनावर आधारलेला हा चित्रपट! त्यावेळचा भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार, 99 कसोटींचा अनुभव, बॉलिवूड तारकांशी संबंध, मॅच फिक्‍सिंगचे आरोप आणि त्यानंतर झालेली कायदेशीर लढाई असा या चित्रपटाचा 'प्लॉट' आहे. अजहर आणि मॅच फिक्‍सिंगविषयी माहीत नाही, असा क्रिकेटप्रेमी भारतात नसेल. त्यामुळे अजहरची जडण-घडण, मैदानावरील कामगिरी, मॅच फिक्‍सिंगच्या गर्तेत अडकल्यानंतर दुरावलेले संबंध असे विविध पैलू यात आले आहेत.

का पाहावा हा चित्रपट?
अजहर आणि त्याची 'स्टोरी' सगळ्यांनाच माहीत असली, तरीही पडद्यावरचं त्याचं चित्रण पाहणं हा क्रिकेटप्रेमींसाठी आठवणींना उजाळा देणारं ठरू शकतं. अजहरची ती 'स्पेशल' चाल, सतत 'बडे भाई' बोलण्याची ढब आणि एकूणच 'अपिअरन्स'मध्ये इम्रान हाश्‍मीने उभा केलेला 'अजहर' पडद्यावर (एकदा) पाहण्यासारखा आहे.

एमएस धोनी
दिग्दर्शक : नीरज पांडे
कलाकार : सुशांतसिंह राजपूत, दिशा पटनी, कायरा अडवानी, अनुपन खेर
प्रदर्शन  : 30 सप्टेंबर, 2016
व्यवसाय : 129 कोटी 25 लाखांहून अधिक
कथानक : 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी आणि भारतीय क्रिकेटमध्ये मिळालेल्या 'स्टारडम'नंतर त्याचा जीवनप्रवास लहान मुलांपासून सर्वांना पाठ झाला. त्याची कारकिर्द थांबण्याच्या आधीच त्याच्या आयुष्यावर चित्रपट आला. फुटबॉल खेळणारा 'माही' क्रिकेटकडे कसा वळला, तिकीट तपासनीसाची नोकरी करताना क्रिकेट खेळण्याची दाबून ठेवलेली इच्छा, स्थानिक पातळीवरील क्रिकेटमध्ये मिळालेली संधी, त्यानंतर भारतीय क्रिकेट संघात मिळालेले स्थान आणि मग सतत उत्कर्षाच्या दिशेने झालेल्या प्रवासामध्ये धोनीच्या वैयक्तिक आयुष्यातही डोकावण्याची संधी या चित्रपटाद्वारे मिळते. 'माही-भक्तां'ना ठाऊक नाही, असं या चित्रपटात जवळपास काहीच नाही; तरीही आतापर्यंतचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर झळकणे, हीदेखील उल्लेखनीय गोष्ट आहे.

का पाहावा हा चित्रपट?
'माही'ची 'स्टाईल' उचललेला सुशांतसिंह राजपूत आणि दिग्दर्शक नीरज पांडे या दोघांच्या कामगिरीसाठी हा चित्रपट पाहायला हवाच. सुशांतने तर धोनीच्या हसण्याची ढबही हुबेहूब उचलली आहे. चित्रपट पाहण्यासाठी बाकी कुठलं कारण पटत नसेल किंवा सापडत नसेल, तर निदान 2011 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे अंतिम क्षण पूर्ण भरलेल्या थिएटरमध्ये पाहणे आणि 'अनुभवणे' यासाठी तरी पाहणे 'मस्ट'च होते..!

इक्‍बाल
दिग्दर्शक : नागेश कुकनूर
कलाकार : श्रेयस तळपदे, नसरुद्दीन शहा, गिरिश कर्नाड, श्‍वेता प्रसाद, यतीन कार्यकर, प्रतिक्षा लोणकर, दिलिप साळगावकर, ज्योती जोशी,कपिल देव
प्रदर्शन : 26 ऑगस्ट 2005
व्यवसाय : ४५ कोटी
पुरस्कार :

  • नसरुद्दीन शहा : सर्वोत्तम सह कलाकार (2006) राष्ट्रीय पुरस्कार
  • इतर सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ठ चित्रपट : सुभाष घई, नागेश कुकुनूर (2006) - राष्ट्रीय पुरस्कार

कथानक : आपल्यासारख्या क्रिकेटवेड्या देशात "क्रिकेटपटू' होण्याचे कुणाचे स्वप्न नसते! हेच स्वप्न पाहिलेल्या इक्‍बाल या मूक-बधीर मुलाची काल्पनिक कहाणी मांडली नागेश कुकनूर यांनी. इक्‍बाल-त्याची बहीण, इक्‍बाल-त्याचे वडील, इक्‍बाल आणि त्याचे प्रशिक्षक यांचे परस्परसंबंध आणि गोलंदाजी शिकण्यापासून ध्येय गाठण्यापर्यंतची इक्‍बालची मजल एवढा या चित्रपटाचा "स्कोप' आहे.

का पाहावा हा चित्रपट?
मराठमोळ्या श्रेयस तळपदेने साकारलेला "इक्‍बाल' हेच याचे सर्वांत मोठे बलस्थान आहे. भावाच्या स्वप्नांना सक्रिय साथ देणारी त्याची बहीण श्‍वेता प्रसाद, "क्रिकेट म्हणजे फालतूपणा आहे' हे स्पष्ट मत असणारे त्याचे वडील यतीन कार्येकर, एकेकाळी क्रिकेट खेळलेल्या आणि आता पूर्णवेळ दारूच्या नशेत असणाऱ्या प्रशिक्षकाची भूमिका रंगवलेले नसिरुद्दीन शाह या सर्वांचीच कामिगिरी पाहण्यासारखीच आहे.

चक दे इंदिया :
दिग्दर्शक : शिमित अमीन
कलाकार : शाहरुख खान, सागरिका घाटगे,विद्या माळवदे,तनया अब्रोल, शिल्पा शुक्‍ला, अनिता नायर, सुरभी मेहता, आर्या मेनन, चैत्राशी रावत, सनिदा फुर्तादो, निशा नायर, सीमा आझमी, विभा चिब्बरांजन श्रीवास्तव नकुल वेद.
प्रदर्शन : 10 ऑगस्ट 2007
व्यवसाय : 127 कोटी
पुरस्कार :

  • फिल्मफेअर, आयफा,राष्ट्रीय पुरस्कार
  • फिल्मफेअर सर्वोत्कृष्ठ अभिनेता : शाहरुख खान (2008)
  • फिल्मफेअर पुरस्कार बेस्ट ऍक्‍शन : रॉबर्ट मिलर
  • फिल्मफेअर क्रिटीक्‍स सर्वोत्कृष्ठ चित्रपट : शामित आमीन
  • सर्वात लोकप्रिय चित्रपट : आदित्य चोप्रा,शमित अमीन(2008)
  • आयफा सर्वोत्कृष्ठ कथानक : जयदीप साहनी
  • आयफा सर्वोत्कृष्ठ चित्रपट : यश राज फिल्म (2008)

कथानक : महिला हॉकी म्हणजे भारतीय क्रीडा क्षेत्रातील अगदीच दुर्लक्षित भाग! एकेकाळी हॉकी गाजविलेला, "फिक्‍सिंग'च्या आरोपांमुळे आता मुख्य प्रवाहातून बाजूला फेकला गेलेला आणि गमावलेला सन्मान परत मिळविण्यासाठी झगडत असलेल्या "कबीर खान'ची ही कथा. विखुरलेल्या खेळाडूंना एकत्र खेळण्याची सवय लावण्यापासून "संघ' म्हणून कामगिरी करण्याची शिस्त लावणारा, वेळप्रसंगी कठोर वागणारा आणि सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारा कबीर खान त्याचे ध्येय कसे साध्य करतो, संघातल्या मुलींचा प्रवास कसा होतो यावर हा चित्रपट आहे.

का पाहावा चित्रपट?
आधीच आपल्याकडे खेळ दुर्लक्षित. त्यात हॉकीचा वाटा चिमणीएवढा! त्यात महिलांची हॉकी म्हटल्यावर "आपली महिलांची टीम आहे?' असा प्रश्‍न बहुतेकांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या काळात हा चित्रपट आला. शाहरुख खान इथेही मुलींच्या गराड्यात आहे; पण प्रशिक्षक म्हणून! नेहमीसारखा प्रेमवीर न रंगवता शाहरुखनं इथे त्याच्या अभिनयक्षमतेला पूर्ण न्याय दिला आहे. "दिग्दर्शक चांगला असला, की शाहरुख अभिनयही करतो' हे गृहीतक त्याने या चित्रपटात पुन्हा सिद्ध करून दाखवलं.

भाग मिल्खा भाग
दिग्दर्शक : राकेश ओमप्रकाश मेहरा
कलाकार : फरहान अख्तर,सोनम कपूर, पवन मल्होत्रा,जपतेज सिंग, योगराज सिंग,दिव्या दत्त,प्रकाश राज
प्रदर्शन : 12 जुलै 2013
व्यवसाय : 164 कोटी
पुरस्कार :

  • पाच फिल्म फेअर, दोन राष्ट्रीय पुरस्कार, सात आयफा पुरस्कार
  • फिल्मफेअर सर्वोत्कृष्ठ अभिनेता : फरहान अख्तर
  • फिल्मफेअर सर्वोत्कृष्ठ चित्रपट : राकेश ओमप्रकाश मेहरा
  • सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक : राकेश ओमप्रकाश मेहरा
  • राष्ट्रीय पुरस्कार : सर्वोत्कृष्ठ लोकप्रिय चित्रपट
  • सर्वोत्कृष्ठ कोरिओग्राफी : गणेश आचार्य

कथानक : भारताच्या "फ्लाइंग सिख' असा किताब मिळविलेल्या मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. मिल्खा सिंग यांचे कुटुंब भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान विखुरते, यामध्ये त्यांची बहीण आणि ते असे दोघेच सुखरुप भारतात येतात. निश्‍चित ध्येय नसलेल्या या मुलाचा फाळणीपासून ते फ्लाइंग सिख पर्यंतचा हा प्रवास प्रेक्षकांना थक्क करतो.

का पाहावा हा चित्रपट?
मिल्खासिंगसारख्या "लिजंड'च्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट प्रेरणादायक आहे. फरहान अख्तरने जीव तोडून साकारलेला मिल्खासिंग आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांची "फ्लॅशबॅक' वापरण्याची टिपिकल स्टाईल यामुळेही चित्रपट पाहणे "मस्ट' आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com