सलमानमुळे माझ्या करिअरला किक्!

संतोष भिंगार्डे
गुरुवार, 14 जून 2018

श्रीलंकन सुंदरी जॅकलीन फर्नांडिसने ‘किक’मध्ये दबंग खानबरोबर काम केले. तो चित्रपट तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला.

श्रीलंकन सुंदरी जॅकलीन फर्नांडिसने ‘किक’मध्ये दबंग खानबरोबर काम केले. तो चित्रपट तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. आता ती पुन्हा सलमानबरोबर ‘रेस ३’मध्ये झळकणार आहे. त्यानिमित्त तिच्याशी केलेली ही खास बातचीत...

‘रेस’च्या दुसऱ्या भागात काम केल्यानंतर तिसऱ्या भागाची ऑफर येईल, असे तुला वाटले होते का?
- तिसऱ्याच काय...‘रेस’च्या दुसऱ्या भागाची ऑफर येईल, असेही वाटले नव्हते. जेव्हा मला ऑफर आली तेव्हा मी आश्‍चर्यचकित झाले. कारण मोठमोठी स्टारकास्ट...मोठे बॅनर आणि अब्बास-मस्तानसारखे नावाजलेले दिग्दर्शक. त्यामुळे तो क्षण आणि ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही. आता तिसऱ्या भागात काम करीत आहे याचा नक्की आनंद आहे. पहिल्या दोन्ही भागांमध्ये सैफ अली खान होता. आता सलमान खान आहे. शिवाय दिग्दर्शक रेमो डिसोझाही आहेत.  

 race 3 poster

सलमानसोबत पुन्हा काम करीत आहेस. एक कलाकार म्हणून तो किती सहकार्य करतो?
- किकमध्ये सलमानसोबत पहिल्यांदा काम केले. तेव्हा मी खूप नर्व्हस होते. सलमानमुळे थोडी घाबरले होते. जणू काही आपण नवीनच आहोत, असे वाटत होते. चित्रीकरणाच्या वेळी कधी कधी संवादही विसरत होते. का कुणास ठाऊक... मनात काहीशी भीती निर्माण झाली होती; मात्र त्या वेळी सलमानने मला खूप सहकार्य केले. खूप चांगली मदत केली. त्याच्यामुळेच मला किक मिळाला आणि तोच चित्रपट माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतरच माझा आत्मविश्‍वास आणखीन वाढला.

‘रेस ३’मधील तुझ्या कॅरेक्‍टरबद्दल सांग...
- या चित्रपटात प्रत्येकाची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. कुणाची पॉझिटिव्ह आहे, तर कुणाची निगेटिव्ह. त्याबद्दल आताच अधिक सांगणे योग्य ठरणार नाही. हा एक फॅमिली ड्रामा आहे. त्यामध्ये कुणी निगेटिव्ह वागताना दिसणार आहे तर कुणी पॉझिटिव्ह. माझ्या भूमिकेबद्दलही असेच म्हणावे लागेल. प्रेक्षकांनी कधी मी सकारात्मक भूमिका करतेय किंवा नकारात्मक भूमिका करतेय असे वाटेल; परंतु भूमिका खूप महत्त्वाची आहे. शिवाय रेसची सीरिज अगोदरच लोकप्रिय असल्यामुळे हा चित्रपट यशस्वी होईल याची मला खात्री आहे. त्यातच सलमानमुळे चित्रपटाला ओपनिंग चांगली मिळेल.

बॉलीवूडमध्ये खूप रेस आहे. त्यामध्ये तू नेमकी कुठे आहेस असे तुला वाटते?
- खरे तर मला बॉलीवूडमध्येच यायचे होते. मी मनाशी तसा पक्का निर्धार केला होता आणि याच क्षेत्रात आले. येथे खूप स्पर्धा आहे आणि तेवढाच स्ट्रगलही; परंतु मी कधी कुणाशी स्पर्धा केली नाही आणि करणारही नाही. दररोज नवीन काय करता येईल ते पाहते. स्पर्धेची मला भीती वाटत नाही. कारण स्पर्धा असल्यामुळेच आपल्याकडून चांगले काम होते. अधिकाधिक चांगले काम करण्याची इच्छा मनात निर्माण होते.

तुझा पूर्वीचा आणि आताचा स्ट्रगल काय सांगतो?
- स्ट्रगल हा नेहमीच असतो. काम मिळविण्यासाठी स्ट्रगल... मिळालेले काम चांगले होण्यासाठी स्ट्रगल आणि ते लोकांना आवडते की नाही, हे जाणून घेणे हाही एक स्ट्रगल. स्ट्रगल हा कधी कुणाला चुकलेला नाही आणि तो कधीच थांबत नाही. चित्रपट कसा आहे... माझी भूमिका कशी आहे... हे पाहणे हादेखील स्ट्रगल आहे.

 सध्याच्या करिअरबद्दल तू खूश आहेस का?
- खूश असले तरी अजून मोठा पल्ला मला गाठायचाय. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मला शिकायच्या आहेत. खरे तर आतापर्यंतचा माझा प्रवास खूप खडतर होता; परंतु अनेक गोष्टींचा सामना करीत येथपर्यंत पोहोचले. आज मी आनंदीत असले तरी माझे पाय अजूनही जमिनीवर आहेत. वेगवेगळ्या अभिनेत्यांबरोबर आतापर्यंत काम केले आहे; परंतु स्वतःला कधीही असुरक्षित मानले नाही.

डान्स तू चांगला करतेस... ही एनर्जी तुला कुठून मिळते?
- आवडीचं काम असलं की माझ्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. माझं शेड्युल्ड फारच व्यस्त असलं तरी मी माझ्या कामाबाबत नेहमीच उत्साही असते. जसं मी ‘दबंग टूर’ची रिहर्सल करून एका पार्टीला हजेरी लावली आणि माध्यमांशी संवाद साधण्यासाठी नव्या उत्साहाने लगेच तयारही झाले. अशाप्रकारेच रोजचं माझे प्लॅनिंग ठरलेलं असतं.  

आणखीन कशा प्रकारच्या भूमिका साकारायच्या आहेत.
- अॅक्शन भूमिका करायला मला आवडतात. एखादा महिलाप्रधान चित्रपट असेल तर तो मला करायला आवडेल. शिवाय बायोपिकमध्येही काम करायला आवडेल

दबंग टूरबद्दल सांग?
- दबंग टूरच्या निमित्ताने पुन्हा एकदा सलमानसोबत काम करण्याची संधी मला मिळतेय. दबंग टूरमध्येही खूप कलाकार आहेत; मात्र याबाबत मी जास्त काही सांगू शकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: i make my career strong because of salman