भारतीय चित्रपटसृष्टीत प्रथमच "रिले सिंगिंग' 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

डॉ. लहानेंवरील चित्रपटातील गाणे 

डॉ. लहानेंवरील चित्रपटातील गाणे 

नवी मुंबई :  प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटात पहिल्यांदाच "रिले सिंगिंग'चा प्रयोग केला जात आहे. या प्रयोगाचा जागतिक विक्रम करून त्याची गिनेस बुकमध्ये नोंद करण्याची तयारी सुरू आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत रिले सिंगिंगची ही पहिलीच वेळ आहे. 
सध्या "रिले सिंगिंग'साठी राज्यभरात फेब्रुवारीअखेरपर्यंत ऑडिशन्स सुरू आहेत. त्याला कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत 500 जणांनी ऑडिशन्स दिल्या आहेत. या ऑडिशन्सच्या माध्यमातून 300 गायकांची निवड केली जाणार आहे. वाशी येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी प्रसिद्ध गायिका साधना सरगम, चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक विराग वानखेडे उपस्थित होते. 
"डॉ. तात्याराव लहाने, अंगार पावर इज विदिन' या मराठी चित्रपटातील "काळोखाला भेदून टाकू, जीवनाला उजळून टाकू' या गाण्यावर आधारीत रिले सिंगिंग होणार आहे. 108 शब्दांचे गाणे एकाच वेळी 300 गायकांकडून गायले जाईल. विराग यांनी गीत शब्दबद्ध केले असून, गायिका साधना सरगम व विराग वानखेडे यांनी गायले आहे. 
रिले सिंगिंगमध्ये एकापेक्षा अधिक गायक एकत्र येत एकाच सूर व लयीमध्ये एक एक शब्द गातात. यापूर्वी 2006 मध्ये इंग्लंडमधील जॉन बेल स्कूलमध्ये 288 विद्यार्थ्यांनी एकत्र येत रिले सिंगिंग केले होते. तो जागतिक विक्रम म्हणून नोंदविण्यात आला आहे. आता प्रथमच भारतीय चित्रपटामध्ये हा प्रयोग होणार आहे. 

Web Title: india first relay singing in dr tatya lahane movie