‘फत्तेशिकस्त’ने वाढवली महाराष्ट्राची शान; इंडियन आर्मीनं दिलं मानाचं स्थान!

टीम ई-सकाळ
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

१६६० मध्ये महाराष्ट्रातील पुणे शहरात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने लाल महाल हस्तगत करण्यासाठी केलेला संघर्ष या चित्रपटामध्ये दाखविण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक चित्रपटांची चलती आहे. मराठी चित्रपटसृष्टीनंतर आता बॉलिवूडला या चित्रपटांनी भूरळ घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी उभं केलेलं स्वराज्य हा महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या अस्मितेचं भूषण आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बुधवारी (ता.१९) संपूर्ण जगभरात स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९०वी जयंती साजरी केली जात असतानाच तमाम शिवप्रेमींच्या आनंदात भर टाकणारी गोष्ट घडली आहे. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाचा ‘मराठा लाइट इन्फंट्री’मध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती लांजेकर यांनी बुधवारी दिली. 

- Shivjayanti 2020 : असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर, पत्र अजूनही सुरक्षित​

भारतीय सैन्यातील मराठा लाइट इन्फंट्री या पलटणच्या संग्रहालयात ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने दाखल होणाऱ्या जवानांना ही शौर्यगाथा दाखवण्यात येणार असल्याचेही लांजेकर या वेळी म्हणाले. तसेच, असा मान मिळवणारा ‘फत्तेशिकस्त’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.

Image may contain: 9 people, text

तसेच, या संदर्भात मला मंगळवारी लष्कराचे एक पत्र मिळाले आहे. संग्रहालयाची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण होईल, असे त्या पत्रात नमूद केले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर २०१९ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एकूणच चित्रपट धमाकेदार असल्याने फत्तेशिकस्तने तिकीटबारीवरही बाजी मारली होती. 

- Shivjayanti 2020 : PHOTO ; सह्याद्रीच्या कुशीतले गड-कोटांचे कोल्हापूर 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा चित्रपट मराठा लाइट इन्फंट्रीचे मुख्यालय असलेल्या बेळगाव येथे चार हजार जवानांना दाखविण्यात आला असल्याची माहितीही लांजेकर यांनी दिली आहे. हा चित्रपट जवान आणि सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी इतका भावला की त्यांनी आपल्या अर्काइव्हमध्ये जतन करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 'गनिमी कावा' या युद्धनीतीचं दर्शन या चित्रपटातून घडविण्यात आलं असून १६६० मध्ये महाराष्ट्रातील पुणे शहरात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने लाल महाल हस्तगत करण्यासाठी केलेला संघर्ष या चित्रपटामध्ये दाखविण्यात आला आहे. 

Image may contain: text

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी साकारली होती. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, तृप्ती तोरडमल, अजय पूरकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, हिंदीतील अंकित मोहन आणि अनुप सोनी यांनी छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. यानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि टीम बांदल सेना आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या अमर बलिदानावर आधारित जंगजौहर हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.

- नागराज-रितेशच्या कलाकृतीतून साकारणार शिवरायांची महागाथा!

मराठा लाइट इन्फंट्रीविषयी :

मराठा लाइट इन्फंट्री ही भारतीय सैन्यातील सर्वात जुनी सैन्यतुकडी आहे. या तुकडीची स्थापना १७६८ मध्ये करण्यात आली असून सुरवातीला ती ब्रिटीश लष्करातील जंगी पलटण म्हणून ओळखली जात होती. त्यानंतर १८०२ च्या सुमारास या तुकडीला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Army decided to archive Marathi periodic film Fatteshikast