मराठी सिनेसृष्टी वाटते जवळची - नेहा खान

तेजल गावडे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

जिच्या पोस्टरमुळे सगळीकडे उधाण आलंय चर्चेला... अशी बोल्ड अभिनेत्री नेहा खान हिच्यासोबत केलेली बातचीत...

"शिकारी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत ती पदार्पण करतेय, तेही बोल्ड अवतारात. जिच्या पोस्टरमुळे सगळीकडे उधाण आलंय चर्चेला... अशा या बोल्ड अभिनेत्रीचं नाव आहे नेहा खान. तिच्याशी केलेली बातचीत... 

सिनेइंडस्ट्रीतील प्रवास... 
मला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. मी काही फॅशन शोज केलेत. अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत "1971- बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम व या चित्रपटाचा तेलुगू रिमेक "1971 भारता सरीहद्दू'मध्ये काम केलंय. तसंच "अझाकिया कादल - ब्युटीफूल लव' या मल्याळम चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारलीय. तसंच मी किंग खान शाहरूखसोबत दोन जाहिरातीत काम केलंय. "युवा' या हिंदी चित्रपटात जिम्मी शेरगिलसोबत काम केलंय आणि आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करतेय. 

neha khan

मराठी सिनेसृष्टीत पदार्पणाबद्दल... 
मी महाराष्ट्रीय आहे. माझी आई महाराष्ट्रीय असून मी महाराष्ट्रातच राहते. त्यामुळे मला मराठी इंडस्ट्री जास्त जवळची वाटली. आणि मी मराठी चित्रपटात काम करायचं ठरवलं. मी महेश मांजरेकर यांच्या "एफ.यू' चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्या सिनेमाच्या सेटवर मी गेले होते. पण त्या वेळी चित्रपटाचं कास्टिंग झालेलं होतं. तेव्हा सेटवर दिग्दर्शक विजू मानेदेखील उपस्थित होते. त्यांनी मला त्या वेळी "शिकारी'ची कथा सांगितली व आम्ही यासाठी कलाकारांची निवड करतोय. तुला या चित्रपटात काम करायला आवडेल का? असं विचारलं. त्यावर मी लगेचच होकार दिला. पण तेव्हा सरांनी मला स्पष्ट केलं, की हा बोल्ड सिनेमा आहे. तर तुला चालेल का? मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड सिनेमा जरी बनला तरी तिथे काही मर्यादा आहेत. त्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला. 

"शिकारी'... 
एका तरुणीवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. ही तरुणी चित्रपटसृष्टीत काम करण्याचं स्वप्न घेऊन मुंबापुरीत येते. ती चुकीच्या माणसांच्या जाळ्यात कशी फसते आणि तिला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, हे या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मी "सविता' नामक प्रमुख भूमिका साकारली आहे. ती खूप पॅशनेट आहे. ती गावात राहणारी असून तिला अभिनेत्री बनायचं असतं. ती निरागस आहे. तिचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आलाय. 

बोल्ड सीन... 
यापूर्वी मी कधी बोल्ड चित्रपटात किंवा बोल्ड दृश्‍य केलं नव्हतं. बोल्ड चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मी कम्फर्टेबल नव्हते. या चित्रपटाची कथा चांगली आहे. त्या कथेसाठी बोल्ड होणं गरजेचं होतं. फक्त बोल्डच नाही; तर मला अभिनयासाठीदेखील खूप वाव होता. सविताच्या वेगवेगळ्या भावना यात दाखवल्या आहेत. एका चित्रपटात एकाच भूमिकेतून वेगवेगळे पैलू साकारायला मिळाले, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. बोल्ड सीन करणं खूप आव्हानातमक आहे, असं मला वाटतं. कारण जे विजू सरांनी सेटवर वातावरण केलं होतं, त्यामुळे हे सीन करताना मी कम्फर्टेबल होते. जास्त दृश्‍ये माझी सुव्रत जोशीसोबत होती. त्याने मला कम्फर्टेबल केलं. सीन करताना नेमकं काय हवंय, ते विजू सरांना माहीत होतं. त्यामुळे मला त्या वेळी बोल्ड सिनेमा करतेय, असं अजिबात वाटलं नाही. 

shikari

बोल्ड सिनेमा... 
मराठी प्रेक्षक कथेला जास्त प्राधान्य आणि महत्त्व देतो. या चित्रपटाला एक चांगली कथा आहे. आम्ही फक्त बोल्ड आणि मनोरंजनासाठी काहीही दाखवावं, असं अजिबात केलेलं नाही. मराठी चित्रपटसृष्टी चांगल्या आशयासाठी ओळखली जाते. या चित्रपटाला एक चांगली कथा आहे, जी प्रेक्षकांना आवडेल, अशी मला आशा आहे. 

कास्टिंग काऊच... 
सिनेइंडस्ट्रीत कास्टिंग काऊचला बऱ्याचदा कलाकार बळी पडतात. कारण इथे चांगली व वाईट अशी दोन्ही प्रकारची माणसं आहेत. आपल्यावरच असतं, की आपण त्याला बळी पडायचं की नाही किंवा कशा पद्धतीने अशी परस्थिती सावरायची. 

"शिकारी'चा अनुभव... 
माझा खूपच छान अनुभव होता. दिग्गज व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. महेश मांजरेकर, विजू माने, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक हे खूप चांगले व्यक्ती आणि कलाकार आहेत. त्यांच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. या चित्रपटाचा प्रवास खूपच अप्रतिम होता. सुरुवातीला मला वाटलं होतं की काम करताना प्रेशर असेल; पण तसं काही नव्हतं. विजू माने यांनी मला अभिनयासाठी खूप मोकळीक दिली होती. त्यामुळे काम करायला खूप मजा आली. 

आगामी प्रोजेक्‍ट... 
आणखीन एका मराठी चित्रपटात काम करणार आहे. त्यात मी एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. 

Web Title: interview of actress neha khan for upcoming movie shikari