टेन्शन फ्री राहणं हा माझा फिटनेस फंडा : प्राजक्ता हनमघर

शब्दांकन : काजल डांगे
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

अभिनेत्री प्राजक्ता हनमघर सांगत आहे तिचे फिटनेस रहस्य

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

स्लिम फीट : प्राजक्‍ता हनमघर, अभिनेत्री 

मी फिटनेससाठी नेहमी 45 मिनिटं चालते. याआधी मी व्यायाम, योगासनं करायचे, पण काम, सतत असणारी धावपळ यामुळे आता ते जमत नाही. पण माझं 45 मिनिटं चालणं ठरलेलं असतं. मी माझ्या जेवणाच्या वेळा कटाक्षानं पाळते. कितीही काम असेल किंवा चित्रीकरणामध्ये व्यग्र असले, तरीही संध्याकाळीही मी माझ्या वेळेला खाऊन घेते. अवेळी किंवा खूप उशिरा खायला मला आवडत नाही.

मी शुद्ध शाकाहारी आहे. घरच्या जेवणाकडं माझा जास्त कल असतो. गेल्या दोन वर्षांपासून मी अंडेही खाते. मला गोड खायला प्रचंड आवडतं, ते मला कमी करायचं आहे. मला कधीही एखाद्या भूमिकेसाठी वजन कमी किंवा जास्त करावं लागलेलं नाही. आताही माझा "वेडिंगचा शिनेमा' चित्रपट येतो आहे. त्यासाठी मला फिटनेसच्या दृष्टीनं किंवा वजन कमी किंवा वाढवावं लागलं नाही. काही महिन्यांपूर्वी माझा हार्मोनल इम्बॅलन्स झाला होता. त्याचदरम्यान माझं वजन खूप वाढलं होतं आणि त्याकाळात मी केलेल्या भूमिकांसाठी माझं वजन अगदी बरोबर होतं! त्यामुळं मला विशेष काही मेहनत घ्यावी लागली नाही. 

आपण शारीरिक फिटनेसप्रमाणं मानसिक फिटनेसकडं लक्ष देत नाही. माझ्यासाठी मानसिक फिटनेसही खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळंच मला काही शारीरिक त्रास झाल्यास त्यातून मी लवकर बरी होते. मी तणावाखाली असताना मेडिटेशन करते. त्याचा मला अधिकाधिक फायदाही होतो. टेन्शन फ्री राहणं हा माझ्या आयुष्याचा साधा-सरळ फंडा आहे. आपल्या आरोग्याबरोबरच मनही फिट हवं. आनंदी राहा, प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा, नवनवीन गोष्टी शिका. तुम्ही आपसूकच हेल्दी राहाल. सध्या आपण सोशल मीडियाच्या फार आहारी गेलो आहोत. काही काळ तरी घरी गेल्यावर मोबाईल बाजूला सारून इतरांशी संवाद साधला, मन शांत ठेवल्यास वेगळा फिटनेस साधण्याची गरज नाही. प्रत्येक दिवशी व्यायाम केला पाहिजे, त्याचबरोबर मनःशांतीसाठी छोट्या छोट्या गोष्टी केल्यास फिट राहता येतं. 

Web Title: Interview of actress Prajkta Hanamghar on health in Maitrin of Sakal Pune Today