आमची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही रंगली!

hruta yashoman
hruta yashoman

"फुलपाखरू' या मालिकेमधून वैदेही आणि मानस, म्हणजेच हृता दुर्गुळे आणि यशोमान आपटे ही जोडी घराघरांत पोचली. या मालिकेला जवळपास दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. तरीही वैदेही-मानसच्या जोडीची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे.

खरं तर हृता-यशोमानची ओळख झाली "फुलपाखरू' मालिकेच्या फोटोशूटच्या वेळीच. याआधी हे दोघं एकमेकांना ओळखतही नव्हते. यशोमान म्हणतो, "आम्ही "फुलपाखरू'च्या फोटोशूटच्या वेळी पहिल्यांदा भेटलो. याआधी आम्ही कधीच भेटलो नव्हतो. चित्रीकरणाचा पहिला दिवस होता. आम्ही दोघंही मेकअप करून सेटवर आलो आणि तेव्हाच आम्ही एकमेकांशी बोलायला सुरवात केली. काही दिवस फारसं बोलणं झालं नाही. पण हळूहळू संवाद वाढत गेला. आता जवळपास दोन वर्षं आम्ही एकत्र काम करीत आहोत.'

हृता-यशोमानची ऑनस्क्रीन केमिस्ट्री हळूवार फुलत गेल्यावर त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही रंगत गेली. आधी एकमेकांना न ओळखणारे दोघं एका मालिकेच्या निमित्तानं एकत्र आले आणि त्यांच्याच मैत्रीचं घट्ट नातं निर्माण झालं. मालिकेच्या सुरवातीला ओळख नव्हती, हे खरं आहे. पण शूटदरम्यान आमच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं. सेटवरही मजेशीर वातावरण असतं. त्यामुळं कधीच शूट करताना अवघडल्यासारखं वाटलं नाही. दोन वर्ष आम्ही दोघं एकत्र काम करतोय. त्यामुळं आता यशोमान आणि माझ्यात घट्ट मैत्री आहे, असे हृता सांगते.

कॉलेजमध्ये असतानाच वैदेही-मानसच्या प्रेमकथेला सुरवात झाली. तरुणाईला यांच्या प्रेमकथेनं वेड लावलं. वैदेही-मानसची जोडी छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरली. या सगळ्याचं श्रेय हृता आणि यशोमान मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांना देतात. "मंदार सरांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवली. कोणताही रोमॅंटिक किंवा गंभीर सीन असल्यास चेहऱ्यावरील हावभाव कशाप्रकारे असले पाहिजेत, हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहोत. आज जे काही चांगलं प्रेक्षकांना देऊ शकलो ते मंदार सरांमुळंच,' असे यशोमान सांगत होता. यामागं हृता-यशोमानची मेहनतही आहे.

हृता-यशोमानच्या चाहत्यावर्गामध्ये दिवसागणिक वाढ होत गेली, हेही तितकंच खरं आहे. त्यांच्या उत्तम कामाची ही पोचपावतीच आहे. आज दोघंही उत्तम कलाकार आहेत. हृता-यशोमान एकमेकांचं अगदी तोंडभरून कौतुक करतात. यशोमान म्हणतो, "हृता तिच्या कामात अगदी परफेक्‍ट आहे. आता ती नाटकही करतेय. त्यामुळं तिची सध्या धावपळ आहे. पण सेटवर ती वेळेत हजर असते. व्यक्ती म्हणून तर ती उत्तम आहेच. पण एक कलाकार ती म्हणून अधिक सरस आहे.' हृता म्हणते, "यशोमान एक सहकलाकार म्हणून खूप उत्तम आहे. काळजी घेणारा सहकलाकार असं मी त्याला म्हणेन. त्याचं काम तर उत्तम आहेच. पण त्याच जोडीनं सगळ्यांची तो उत्तम काळजी घेतो. आणि तो सगळ्यांचाच चांगला मित्र आहे.' मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान अनेक विनोदी किस्सेही घडतात. एखादा सीन शूट करताना दोघांमधलं कोणीही चुकलं की, ते एकमेकांना सांभाळूनही घेतात. "फुलपाखरू'मुळं हृता-यशोमान एकमेकांचे चांगले मित्र झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com