व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन निवांत ठिकाणी! (सिद्धार्थ-मिताली)

शब्दांकन : अश्‍विनी सहस्रबुद्धे
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

नुकताच साखरपुडा झालेली सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही जोडी कसा साजरा करणार आहे व्हलेंटाईन डे? सांगताहेत 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सिद्धार्थ चांदेकर - मिताली मयेकर

व्हॅलेंटाईन डे 2019: व्हॅलेंटाइन डे प्रेमीयुगुलांचा दिवस...यंदाचा व्हॅलेंटाइन डे चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर आणि तरुणांच्या दिल की धडकन मिताली मयेकर यांच्यासाठी एक्‍स्ट्रॉ स्पेशल असेल. त्यांचा दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 24 जानेवारीला साखरपुडा झाला. म्हणजेच, साखरपुड्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच व्हॅलेंटाइन डे आहे. गेल्या वर्षी याच दिवशी त्यांनी ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं.

मिताली म्हणते, "आम्ही स्वतःहून सांगायचं नाही, असंच ठरवलं होतं. पण त्या दिवशी इतरांच्या रोमॅंटिक पोस्ट पाहून मी सिद्‌ध्याला म्हटलं, आपण कधी अशा पोस्ट टाकणार? त्यावर सिद्धार्थ म्हणाला आता करूयात का? आम्हाला दोघांना एकमेकांच्या बाबतीत खात्री होती त्यामुळे त्या क्षणी आम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाकली. सिद्धार्थचं व्हॅलेंटाइन डेचं प्लॅनिंग खूप आधीपासूनच सुरू होतं. त्याच्या एक्‍साइटमेंटमुळं मलाही इंटरेस्ट वाटतो. त्या दिवशी काय स्पेशल करता येईल, यावर बरीच चर्चा होते...'' तिला अडवत सिद्धार्थ म्हणाला, "मी खूप उत्साही असतो. छोटे छोटे प्रसंगही सेलिब्रेट करायला मला खूप आवडतं. या वेळेस व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं आम्ही बाहेर फिरायला जाणार आहोत. गेले वर्षभर आम्ही दोघंही खूपच व्यग्र होतो, म्हणावा तसा क्वालिटी टाइम आम्हाला मिळाला नाही. साखरपुड्याच्या दहा दिवस आधीपर्यंत मिताली पुण्यात शूटिंग करत होती. त्यामुळे काम, फोन, स्ट्रेस या सगळ्यापासून लांब, निवांत ठिकाणी जावं असं ठरवलंय. प्लॅनिंग, बुकिंग अर्थातच मी केलंय!''

व्हॅलेंटाइन डे म्हटल्यावर गुलाब, गिफ्ट्‌स देणं आलंच. आम्ही सतत एकमेकांना काही न काहीतरी गिफ्ट्‌स देतच असतो, पण गेल्या वर्षी सिद्धार्थनं दिलेलं गिफ्ट खूप स्पेशल होतं. मी "हॅरी पॉटर'ची खूप मोठी चाहती आहे. त्यांची लिमिटेड एडिशन असलेली बुक्‍स काही केल्या मिळत नव्हती. सिद्धार्थनं ती मिळवली आणि मला दिली, असं मिताली सांगते. यावर सिद्धार्थ सांगतो, ""मितालीनं मला दिलेला इन्स्टंट फोटो येणारा इंसटॅक्‍स कॅमेरा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मला लहानपणापासून असा कॅमेरा हवा होता. लहानपणी खूप आवडणारा हा कॅमेरा काही कारणानं घ्यायचा राहून गेला होता. पण यातलं काहीही मितालीला माहिती नसताना तिनं मला हा कॅमेरा देऊन माझी बालपणीची इच्छा पूर्ण केली. त्या दिवशीच मला कळलं, "येस्स, शी इज द वन फॉर मी!' हिच्याशीच लग्न करायचं! यावर्षी काय गिफ्ट द्यायचं हे अजून दोघांचंही ठरलेलं नाही, पण ते नक्कीच स्पेशल असेल!''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interview of Mitali Mayekar and Siddhartha chandekar in Maitrin supplement on Valentine day