सेटवरही आमची 'नोकझोक' : संकेत-नम्रता

Sanket Pathak Namrata Pradhan
Sanket Pathak Namrata Pradhan

जोडी पडद्यावरची : संकेत पाठक, नम्रता प्रधान

"छत्रीवाली' मालिकेमधली मधुरा आणि विक्रममधील सुरवातीची "नोकझोक' प्रेक्षकांना खूपच आवडली. आता आठ-दहा महिन्यांनंतर मालिकेत त्यांचं नातं लग्नापर्यंत येऊन पोचलं आहे. प्रत्यक्षात या भूमिका साकारणाऱ्या संकेत पाठक आणि नम्रता प्रधान या दोघांमध्ये मैत्रीचं छानसं नातं तयार झालं आहे. "आमची पहिली भेट झाली ती मालिकेच्या लूक टेस्टच्या वेळेस. त्यानंतर नम्रताचं सिलेक्‍शन झालं. तिची ही पहिलीच मालिका असल्यानं सुरवातीला ती फारशी बोलायची नाही. सगळं नुसतं निरीक्षण करायची. मला पण "अहो-जाओ' करायची. पण त्यामुळं मला आलेलं अवघडलेपण तिच्याच लक्षात आलं. दोन-तीन दिवसांनंतर आम्ही सीन्सची रिहर्सल करत असताना तिनं मला विचारलं, "मी तुला अरे-तुरे केलं तर चालेल का?' त्यावर मी खूप हसलो होतो आणि म्हटलं, "हो, प्लीज तू मला संकेतच म्हण !' त्यानंतर आम्ही दोघे जरा कंफर्टेबल झालो. हळूहळू आमच्यातला संवाद वाढला,'' संकेत सांगत होता.

नम्रता म्हणते, "माझा हा पहिलाच प्रोजेक्‍ट असल्यानं सुरवातीला मला संवाद म्हणायला, कॅमेरा अँगल्स समजायला खूप अडचणी यायच्या. तेव्हा संकेतनं मला खूपच मदत केली. तो माझ्याबरोबर खूप रिहर्सल करायचा. आजही मी जेव्हा जेव्हा अडखळते तेव्हा तो मला धीर देतो. मला चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन देतो. मालिकेत विक्रम आणि मधुरा सुरवातीच्या गैरसमजानंतर घट्ट मित्र झाले, तशीच आता आमच्यातही छान मैत्री झालीय.''

"आम्ही सेटवर पण खूप धमाल करतो. मी नम्रताची खूप मस्करी करतो. अनेक वेळा तिच्यावर प्रॅंक्‍स खेळले आहेत. बऱ्याचदा इव्हेंट्‌सना जाताना मी तिला चुकीचं ठिकाण सांगतो. म्हणजे जर का आम्हाला पुण्याला जायचं असेल, तर मी सांगतो सांगलीला जातोय. सगळ्यात मजेशीर म्हणजे एकदा शूटिंगच्या वेळेस तिचा सीन नसतानापण मी तिला दिग्दर्शकांनी सेटवर बोलावलं असल्याचं सांगितलं. तेव्हा तिचे सीन्स नसल्यानं ती जेवून घेणार होती. मला म्हणालीही, की आता माझा सीन नाहीये मला कॉस्च्युम पण चेंज करायचे आहेत. पण मी तिला छान बनवलं, सेटवरही मी सगळ्यांना या प्लॅनविषयी सांगितलं. ती सेटवर आल्यावर दिग्दर्शक तिला ओरडले, की तू अजून चेंज नाही केलं, लक्ष नसतं वगैरे. ती पार रडकुंडीला आली तेव्हा सगळ्यांनी हा प्रॅंक असल्याचं सांगितलं. त्यानंतर दिवसभर ती मला शोधत होती. पण मी काही हाताला लागलो नाही!''

संकेत मजेशीर किस्से सांगत होता. "हो! हा माझ्या खूप खोड्या काढतो, आम्ही दोघं मिळून इतरांना छळतो, पण मी त्याची फार मस्करी नाही करत. कारण आता आमच्यात मैत्री असली, तरी तो मला सीनियर आहे आणि तो मान मी त्याला दिलाच पाहिजे. माणूस म्हणून तो खूप चांगला आहेच, पण त्यापेक्षाही सहकलाकार म्हणूनही तो उत्तम आहे. पाहिल्या प्रोजेक्‍टमध्ये चांगला सहकलाकार मिळणं खूप आवश्‍यक असतं, म्हणून मी स्वतःला लकी समजते,'' नम्रता म्हणाली. "नम्रता खूप सच्ची आहे. एखादी गोष्ट तिला जमत नसेल किंवा समजली नाही तर ती ते स्पष्टपणे कबूल करते आणि ती शिकून घ्यायची तिची तयारीही असते. हा स्वभाव तिनं कधी बदलू नये, असं मला वाटतं,'' असं आपली मैत्रीण आणि सहकलाकर नम्रताबद्दल संकेत सांगतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com