मी मेघनाजी आणि आलियाचा चाहता... 

तेजल गावडे 
गुरुवार, 3 मे 2018

"मसान', "रमण राघव', "लव पर स्क्वेअर फूट' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयकौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता विकी कौशल आता मेघना गुलजार दिग्दर्शित "राझी' चित्रपटात झळकणार आहे. त्यानिमित्ताने त्याचाशी मारलेल्या गप्पा..

"मसान', "रमण राघव', "लव पर स्क्वेअर फूट' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयकौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता विकी कौशल आता मेघना गुलजार दिग्दर्शित "राझी' चित्रपटात झळकणार आहे. त्यानिमित्ताने त्याचाशी मारलेल्या गप्पा... 

"राझी' चित्रपटाबद्दल व तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांग... 
- "राझी' चित्रपट हा "कॉलिंग सहमत' या पुस्तकावर आधारित आहे; पण मला दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी हे पुस्तक वाचण्यास मनाई केली होती. या पुस्तकातून मेघना यांनी स्वतःची कथा तयार केली होती. त्यांनी कथेची पार्श्‍वभूमी समजावून सांगितली होती. यात मी पाकिस्तानी आर्मीमधील मेजर इक्‍बाल सय्यदची भूमिका साकारलीय. इक्‍बाल आर्मी कुटुंबातील आहे. त्याचं लग्न एका काश्‍मिरी मुलीसोबत होतं. त्याला माहीत नसतं, की त्याची पत्नी गुप्तहेर असते. 1971 मध्ये जेव्हा भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होणार असतं, त्या वेळचा काळ दाखवला आहे. त्या वेळी दोन्ही देशात तणावाचं वातावरण होतं. इक्‍बाल त्याचं काम आणि पत्नीबरोबरचे नातेसंबंध कसे काय सांभाळतो, अशीच या चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते. 

vicky kaushal

या भूमिकेसाठी काय तयारी केली? 
- मेघना यांच्यासोबत मी इक्‍बालच्या भूमिकेबद्दल बोलत असताना सर्वात पहिल्यांदा त्यांनी भूमिकेसाठी मला भाषेवर काम करावं लागेल, असं सांगितलं. या भूमिकेसाठी मला उर्दू भाषा शिकावी लागणार होती. कारण प्रेक्षकांना पाहताना मी जबरदस्ती उर्दू बोलतोय असं वाटलं नाही पाहिजे. आम्ही एकेक ओळीवर काम केलं. पात्राला किती उर्दू आली पाहिजे आणि किती नाही, यावर बारकाईनं लक्ष दिलं गेलं. कारण इक्‍बाल आर्मीत मेजर आहे. पण तो एक कलाकारदेखील आहे. त्याला गाणी ऐकणं व कविता ऐकवायला फार आवडत असतं. 

या चित्रपटाचा अनुभव कसा होता? 
- मी मेघनाजी आणि आलिया या दोघांचा खूप मोठा चाहता आहे आणि त्या दोघांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. मेघना या खूप धाडसी दिग्दर्शिका आहेत. त्या कोणत्याही कथेची निवड करतात त्याला सांगण्यासाठी धाडस व जबाबदारीची गरज असते. मेघनाजी कथेत स्वतःला इतकं सामावून घेतात की त्या स्वतः कथेत जगू लागतात. आलिया इतकी मोठी कलाकार आहे. पण ती ही बाब अजिबात समोरच्याला जाणवू देत नाही. तिच्याकडूनही खूप काही शिकायला मिळालं. ती उत्तम अभिनेत्री आहे. सेटवर ती ऍक्‍शन म्हणण्यापूर्वी मस्तीखोर, खोडकर भूमिकेत असायची आणि ऍक्‍शन म्हणल्यावर लगेच ती पूर्णपणे स्वतःला पात्रात सामावून घ्यायची. 

vicky alia

"मसान' चित्रपटामुळे तुझ्या करियरला नवीन दिशा मिळाली, असं तुला वाटतं का? 
- मला लोक "मसान बॉय' म्हणतात. मी आज जे काही आहे ते "मसान' चित्रपटामुळे. "मसान'मुळे माझ्यासाठी अनेक मार्ग खुले झाले. मला ज्या लोकांना भेटायचे होते त्यांना भेटण्याचा मार्ग खुला झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर मला लोकांनी फोन करून भेटायला बोलावलं. लोक मला म्हणतात, की आता तुझ्यासाठी माझ्याकडे चित्रपट नाही. पण जेव्हा कोणता चित्रपट असेल तेव्हा तुला आवर्जून बोलवू. माझ्यासाठी ही बाब खूप महत्त्वपूर्ण आहे. 

तुझा भाऊही तुझ्या पावलांवर पाऊल ठेवतोय, तर काय सांगशील त्याबद्दल? 
- माझा भाऊ सनी कौशल लवकरच चित्रपटात झळकणार आहे. तो अक्षयकुमारच्या "गोल्ड' चित्रपटात दिसणार आहे. त्यानंतर तो कबीर खानच्या एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. 

आगामी चित्रपट कोणते? 
- "मनमर्जिया'चं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होईल. याबद्दल इतकंच सांगू शकतो, की हा पंजाबमधील एका कुटुंबावर आधारित रोमॅंटिक ड्रामा चित्रपट आहे. संजय दत्त यांच्या बायोपिक "संजू'मध्ये काम करायला मिळाल्यामुळे माझं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालं. मला राजकुमार हिराणीसारख्या मोठ्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाली. "संजू' हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. त्यातील कामही प्रेक्षकांना नक्की आवडेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: interview of vicky kaushal for upcoming film raazi