मुंबईचा छोकरा..

ishaan khattar
ishaan khattar

शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टर माजिद मजिदी यांच्या "बियॉण्ड द क्‍लाऊडस्‌' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. त्याच्या या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या एकूण प्रवासाबद्दल त्याच्याशी केलेली बातचीत- 

चित्रपटसृष्टीत येण्याचा तुझा खरोखर विचार होता की भाऊ इंडस्ट्रीत आहे म्हणून तू आलास? 
- चित्रपटसृष्टीत येण्याचा माझा लहानपणापासूनच पक्का विचार होता. वयाच्या तिनेक वर्षांपासूनच मी विविध चित्रपट पाहत होतो. माझ्या आईबरोबर (नीलिमा अझीम) मी कित्येक चित्रपट पाहिले आहेत. विविध चित्रपट महोत्सवांत आईबरोबर हजेरी लावलेली आहे. केवळ हिंदीच नाही, तर विविध भाषांतील चित्रपटांचा आनंद मी घेतला आहे. मी जेव्हा आठ वर्षांचा होतो, तेव्हा माझ्या भावाने चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्याचे जेथे जेथे शूटिंग असायचे, तेथे तेथे मी जात असे. चित्रपटाशी संबंधित विविध डिपार्टमेंटमध्ये काय चाललेले आहे, कोणते काम कशा पद्धतीने होत आहे, याचे बारीक निरीक्षण मी सेटवर जाऊन करीत असे. सिनेमॅटोग्राफर्सशी चर्चा करीत असे. परदेशी चित्रपट पाहून त्याचा अभ्यास केला आहे. त्यामुळे चित्रपट क्षेत्रातच करिअर करण्याचे माझे स्वप्न होते हे नक्की. 

आई आणि भावाचे बहुतेक चित्रपट तू पाहिले आहेस का? 
- माझ्या भावाचे सगळेच चित्रपट मी पाहिलेले आहेत; मात्र आईचे काम सगळेच पाहिलेले नाही. तिचे मी थोडेच काम पाहिलेले आहे; मात्र चित्रपट तसेच अन्य विषयांवर नेहमीच आईबरोबर चर्चा केली आहे आणि आताही करीत असतो. त्यामुळे माझी फिल्मी तालीम घरीच झाली आहे. आईने आम्हा दोघा भावांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. माझ्या आईच्या लोकप्रिय मालिकेची डीव्हीडी दोनेक वर्षांपूर्वी मी कशीबशी मिळवली आणि जेव्हा तिचे काम पाहिले, तेव्हा थक्क झालो. माझ्यासाठी आई आणि भाऊ दोन्ही प्रेरणास्थान आहेत. 

"बियॉण्ड द क्‍लाऊडस्‌' पाठोपाठ तुझा "धडक'ही येत आहे. दोन मोठे चित्रपट आणि दोन्हीतील भूमिका वेगळी. याबद्दल तू काय सांगशील? 
- खरे तर अशा प्रकारची संधी सगळ्यांना मिळत नाही. मला ही मिळाली त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो. माजीद माजिदी यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळेल, असे स्वप्नसुद्धा मी पाहिलेले नव्हते. ते मुंबईत आले होते आणि त्यांनी मला भेटायला बोलावले. मी गेलो. तोपर्यंत त्यांना माझा भाऊ या इंडस्ट्रीत आहे हे माहीत नव्हते. त्यांनी मला दोनच प्रश्‍न विचारले आणि बाहेर बसा असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्यांदा बोलावून काही मूडस्‌ शूट करायचे असे सांगितले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी काही मूडस्‌ शूट झाले आणि हा चित्रपट मला मिळाला. या चित्रपटात मी आमीर नावाची भूमिका साकारत आहे. हा आमीर मुंबईचा मुलगा असतो. तो रफ ऍण्ड टफ आहे. वयाच्या तेराव्या वर्षी त्याची आई त्याला सोडून गेलेली असते. तो समजूतदार असला, तरी त्याच्या आयुष्यात कशा प्रकारची संकटे येतात आणि त्यावर तो कशा पद्धतीने मात करतो हे या चित्रपटात दाखवले आहे. "धडक' हा एक वेगळाच चित्रपट. यामध्ये माझ्याबरोबर जान्हवी कपूर आहे. पहिल्या चित्रपटासाठी माझी ऑडिशन घेण्यात आली तर "धडक' चित्रपटासाठी करण जोहर यांनी मला त्यांच्या ऑफिसात बोलावले आणि साईन केले. हे दोन्ही चित्रपट माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण मला रिऍलिस्टिक चित्रपट आवडतात. 

"धडक' हा मराठीतील लोकप्रिय चित्रपट "सैराट'चा रिमेक आहे, तू "सैराट' पाहिला आहेस? 
- "धडक' करण्यापूर्वी एक नाही तर दोन वेळा "सैराट' चित्रपट पाहिलेला आहे. त्यातील सगळ्याच कलाकारांचा अभिनय मला आवडलेला आहे. हा चित्रपट उत्तम होता; मात्र आकाश ठोसरला भेटलेलो नाही. 

"बियॉण्ड द क्‍लाऊडस्‌' हा तुझा पहिलाच हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहे. मनात कशा प्रकारचे विचारचक्र सुरू आहे? 
- मला कोणत्याही प्रकारचे टेन्शन नाही; मात्र चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे. प्रत्येक शुक्रवार हा कलाकारासाठी खूप मोठा दिवस असतो ही गोष्ट जरी खरी असली, तरी 20 एप्रिल रोजी येणारा फ्रायडे हा मला नेहमीसारखाच वाटतो आहे. माझ्यासाठी तो स्पेशल डे वगैरे आहे असे काही मी म्हणणार नाही. 

माजीद माजिदी यांचे चित्रपट तू पाहिले आहेस का? त्यांच्याबरोबर काम करण्याची तुला संधी मिळाली याबद्दल तुझ्या आईची प्रतिक्रिया काय होती? 
- त्यांचे चारच चित्रपट पूर्वी मी पाहिलेले होते; मात्र त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळली तेव्हा सगळेच चित्रपट पाहिले. त्यांची काम करण्याची पद्धत... अशा सगळ्याच गोष्टी पाहिल्या. ते ग्रेट आणि ग्रेट डिरेक्‍टर आहेत. त्यांचे व्हिजन खूप मोठे आहे. कथा सांगण्याची त्यांची पद्धत चांगली आहे. बियॉण्ड... चे चित्रीकरण बहुतेक मुंबईत झाले आहे. कारण ही कथा मुंबईची आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये मुंबई पाहिली असली, तरी माजीद माजिदी यांनी निवडलेली लोकेशन्स अनोखी आहेत. रिअल लोकेशन्सवर चित्रीकरण झाले आहे आणि अशा ठिकाणी चित्रीकरण करणे मजेशीर असते, परंतु आम्ही निवडलेली लोकेशन्स वेगळी आणि युनिक आहेत. माजीद माजिदी यांनी बिनधास्त आणि बिनदिक्कतपणे चित्रीकरण केले. आम्हाला कसलाही त्रास झाला नाही. माजीद माजिदी यांच्या दृष्टिकोनातून मुंबई दिसणार आहे. माझी आई माजीद माजिदी यांची मोठी फॅन आहे. तिला जेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करीत आहे असे समजले, तेव्हा ती खूपच खुश झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com