जयललिता यांच्या बायोपिकवर भाचीचा आक्षेप, चित्रपटाच्या अडचणीत वाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

कायम चर्चेत आणि वादात राहिलेल्या जयललिता यांच्यावरच्या या बायोपिकचं नावं आहे ‘थलाइवी’. मात्र शुटिंगपूर्वीच हा चित्रपट सध्या अडचणीत आला आहे.

मुंबई : बोल्ड आणि तितकीच स्पष्टवक्ती अशी ओळख असणारी बॉलिवूडची अभिनेत्री  म्हणजे कंगणा रणौत. कंगणा तिची मतं नेहमीच परखडपणे सर्वांसमोर मांडते.अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानामुळे ती चर्चेचा विषयही ठरते. बी-टाउनमध्ये 'क्वीन' म्हणूनच तिची ओळख आहे. सध्या ती एका खास चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट आहे तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आहे. कायम चर्चेत आणि वादात राहिलेल्या जयललिता यांच्यावरच्या या बायोपिकचं नावं आहे ‘थलाइवी’. मात्र शुटिंगपूर्वीच हा चित्रपट सध्या अडचणीत आला आहे.

 जयललिता यांची भाची जे.दीपा यांनी बायोपिकवर आक्षेप घेतला आहे. एवढच नाही तर, दीपा यांनी थेट मद्रास हायकोर्टात धाव घेतली आहे. शिवाय चित्रपटावर आक्षेप घेत स्थगिती देण्याची मागणीदेखील केली आहे. काही दिवसांपूर्वीच या बायोपिकची घोषणा झाली. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेत्री कंगणा रणावत दिसणार आहे. 
जे. दिपा मत व्यक्त करताना म्हणाल्या,' जयललिता या दिग्गज नेत्या होत्या. जर त्यांच्या खाजगी जीवनावर कोणता चित्रपट तयार होत असेल तर साहजिकच त्यांच्याशी निगडीत व्कतींचासुद्धा उल्लेख असणार. चित्रपटात माझा उल्लेख असल्यास मला त्याची माहिती देण्यात आलेली नाही. माझ्याविषयी चित्रपटात, कथेत किंवा संबादामध्ये उल्लेख असल्यास मला तो जाणून घेण्याचा अधिकार आहे.'

जयललिता यांच्यावर तयार होणाऱ्या एका वेबसिरीजवरही जे.दीपा यांनी आक्षेप घेतला आहे. अभिनेत्री ते तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपर्यंतचा जयललिता यांचा प्रवास बायोपिकमध्ये दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या शुटींगचा पहिला टप्पा कर्नाटकात पार पडणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगु आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये  रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ए.एल. विजय हे करत आहेत. या चित्रपटासाठी कंगणाला दररोज काही तास द्यावे लागणार आहेत आणि  सिनेमासाठी खास मेकअपदेखील करावा लागणार आहे. यासाठी 'प्रोस्थेटिक' मेकअपचा वापर करण्यात येणार आहे. 

कंगना सध्या या चिपटाच्या तयारीत पूर्ण बुडून गेलीय. सध्या मनालीच्या घरीच ती डान्सची प्रॅक्टीस करत आहे. प्रॅक्टीस दरम्यानचा एक व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये कंगणा कोरीओग्राफरसोबत डान्स करताना दिसतेय. गुलाबी रंगाचा टि-शर्ट आणि पॅंटचा सुट, त्याचसोबत वेणी असा अंदाजात कंगणा नक्कीच क्युट दिसते आहे. कंगणाचं इन्स्टाग्राम अकाउंट ती स्वत: बघत नाही तर, तिची टीम हे अकाउंट सांभाळते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayalalithaa's niece moves court to restrain release of her aunt’s biopic