Jiah Khan Death | या सहा पानी पत्रातच दडलयं जियाच्या आत्महत्येचं गुढ Jiah Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jiah Khan

Jiah Khan Death : या सहा पानी पत्रातच दडलयं जियाच्या आत्महत्येचं गुढ

Jiah Khan Case : 'निशब्द' आणि 'गजनी' सारख्या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या जिया खानने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आत्महत्या केली. ही गोष्ट 3 जून 2013 ची आहे, जेव्हा फ्लॅटवर तिचा मृतदेह पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 6 पानी सुसाईड नोट जप्त केली आहे. जियाचे पत्र मिळाल्यानंतर अभिनेता सूरज पांचोलीला अटक करण्यात आली. मात्र, काही वेळाने त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

मात्र आज, दहा वर्षांनंतर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालय अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी आज कोर्टाने निकाल दिला. आज संपुर्ण देशाच लक्ष जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या कोर्टाने दिलेल्या निकालाकडे लागून होते. याप्रकरणात आज निकाल देताना न्यायालयाने सांगितले की, सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिया खानने तिच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले होते ते आम्ही तुम्हाला सांगतो.

जिया खानच्या फ्लॅटमधून अभिनेत्रीचा मृतदेह सापडला तेव्हा अभिनेत्रीने लिहिलेली सहा पानी सुसाईड नोटही तिथे सापडली. या सुसाईड नोटमध्ये जिया खानने तिच्या हृदयातील सर्व वेदना लिहून ठेवल्या होत्या, ज्यासाठी ती टेन्शनमध्ये होती. विशेष म्हणजे त्यातील प्रत्येक गोष्ट सूरज पांचोलीबद्दल होती. जिया खानने लिहिले की, 'हे कसे सांगू ते कळत नाही. पण आता गमावण्यासारखे काही उरले नाही. म्हणूनच सर्व काही सांगण्याची हीच योग्य वेळ आहे.

असो, मी आधीच सर्व काही गमावले आहे. जर तुम्ही हे वाचत असाल तर याचा अर्थ मी एकतर मी गेले आहे किंवा त्यासाठी तयारी करत आहे. मी आतून खूप तुटले आहे. तुला हे माहित नसेल पण तुझा माझ्यावर इतका प्रभाव पडला की मी तुझ्या प्रेमात पडले आणि त्या प्रेमात मी स्वतःला पूर्णपणे विसरले, स्वतःला हरवून बसले. पण तूच मला रोज छळायचास, त्रास द्यायचास.

जिया पुढे लिहिते, 'आता मला माझ्या आयुष्यात प्रकाशाची एक लकीरही दिसत नाही. सकाळी डोळे उघडतात, पण अंथरुणातून उठल्यासारखं वाटत नाही. असे दिवस होते जेव्हा मी माझे सर्व काही, माझे भविष्य तुझ्याबरोबर पहायचे. आपण एकत्र राहू अशी आशा होती. पण तू माझ्या त्या स्वप्नांचा चुराडा केलास. आता आतून मेल्यासारखं वाटतंय.'

मी कधीच कोणावर इतकं प्रेम केलं नाही, कधी कोणाची इतकी काळजी घेतली नाही. पण त्या बदल्यात मला काय मिळालं, तुझं खोटं, तुझी बेवफाई. मी तुला भेटवस्तू आणत राहिले, तुझ्या नजरेत सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला, पण तुला काही फरक पडत नाही. गरोदर राहण्याची भीती होती, तरीही न डगमगता सर्वकाही तुझ्या हाती दिले. पण या सगळ्या ऐवजी तू मला त्रास दिलास. या वेदनांनी मला पूर्णपणे मारले. माझा आत्माही उद्ध्वस्त झाला आहे.'

'आता परिस्थिती अशी झाली आहे की, ना जेवता येत ना झोपता येत आहे, विचारही करता येत नाही, काही करता येत नाही. सर्व काही माझ्या पकडीतून निसटत आहे. आता करिअरचा विचारही केला जात नाही. जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटते तेव्हा माझ्यात उत्साह, अपेक्षा आणि शिस्त होती. मग मी तुझ्या प्रेमात पडले मला वाटले की आता माझ्यातील सर्वोत्तम गुणांना जगात आश्रय मिळेल.'

'नशिबाने आपल्याला जवळ का आणले ते मला कळत नाही. मला ना तुझ्या डोळ्यात प्रेम दिसले ना आपल्या नात्याची बांधिलकी. दररोज माझी भीती वाढत गेली की तु मला मानसिक किंवा शारीरिक त्रास देऊ शकतो. तुझे जीवन फक्त महिला आणि पार्टीभोवती फिरत होते, तर माझे जीवन आणि काम तुझ्याभोवती फिरत होते. मी इथे राहिले तर मला तुझी आठवण येईल, मला तुझी गरज जाणवेल. म्हणूनच मी माझ्या दहा वर्षांच्या कारकिर्दीला आणि त्यातून विणलेल्या स्वप्नांना निरोप देत आहे.'

जिया खानची प्रेमात फसवणूक झाली होती. ती लिहिते, 'मी तुला कधीच सांगितले नाही पण मला तुझ्याबद्दल एक मेसेज आला आहे. त्या मेसेजमध्ये मला सांगण्यात आले होते की, तु माझी सतत कशी फसवणूक करत आहे.

पण मी त्याकडे लक्ष दिले नाही, तुझ्यावर विश्वास ठेवला. मी कधीही आउटिंगला गेले नाही, कधीही कोणासोबत गेले नाही कारण मी एक निष्ठावान व्यक्ती आहे. माझ्या इतकं प्रेम दुसरी कोणतीही स्त्री तुझ्यावर करू शकत नाही आणि मी हे माझ्या रक्ताने लिहून देऊ शकते.'

पुढे, अभिनेत्रीने लिहिले, 'येथे माझ्यासाठी गोष्टी अधिक चांगल्या होत आहेत असे वाटत होते, परंतु हृदय तुटल्यामुळे तुम्हाला सतत वेदना होत असतील तर या सर्व गोष्टींनी काही फरक पडत नाही. तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला शिवीगाळ करते, धमकावते, मारहाण करते आणि इतर मुलींसाठी तुमची फसवणूक करते हे दुखावते.

मी तुझ्यावर प्रेम करत होते म्हणूनच तुझ्या घरी यायचे. पण मध्यरात्री तुझा मूड बदलला की तू मला बाहेर काढायचा. तू रात्रंदिवस माझ्या तोंडावर खोटे बोलत असत. तू माझ्या कुटुंबाचा अपमान करायचा. मी तुला भेटण्यासाठी तरसायचे आणि वेड्यासारखे तुझ्या गाडीच्या मागे यायचे. पण तू माझ्या बहिणीलाही भेटला नाहीस, तर मी तुझ्या बहिणीसाठी इतक्या भेटवस्तू आणायचे.'

पुढे जिया खानने लिहिले, 'आता मला श्वास घेण्याचेही कारण उरले नाही. मला फक्त प्रेम हवे होते. त्याच्यासाठी, तुझ्यासाठी, मी सर्व काही केले. आपल्या दोघांचा विचार करून मी काम करायचे. पण तू कधीच माझा साथीदार नव्हतास.'

'आता माझे भविष्य नष्ट झाले आहे, माझा आनंद माझ्यापासून हिरावून घेतला गेला आहे. पण तू माझ्या प्रेमाची, माझ्या काळजीची कधीच पर्वा केली नाहीस. नेहमी तू मला मारले आहे. यामुळे माझ्यात आत्मविश्वास नाही, स्वाभिमान नाही, माझ्यात जी काही प्रतिभा होती, जी काही महत्त्वाकांक्षा होती, ती सर्व तू तुझ्या कृत्ये हिसकावून घेतलीस.'

पुढे अभिनेत्रीने लिहिले, 'तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस. मी दहा दिवस तुझी वाट पाहिली आणि त्या ट्रिपमधून मला भेटवस्तू विकत घेण्याची तसदीही घेतली नाही हे विचार करून खूप वेदना होतात. गोवा ट्रिप माझ्या वाढदिवसाची भेट होती. तू माझी फसवणूक केलीस, तरीही मी तुझ्यावर पैसे खर्च करत राहिले. मी गर्भपात करून घेतला आणि त्याच्या वेदना सहन करत राहिले. मी तुझा वाढदिवस खास बनवण्यासाठी किती काही केले, पण मी परत आल्यानंतर तू माझी ख्रिसमस आणि वाढदिवसाची पार्टी उध्वस्त केली.'

'व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीही तू माझ्यापासून दूर राहिलास. आपल्या नात्याला एक वर्ष पूर्ण होताच तू माझ्याशी लग्न करशील असे वचन दिले होते. पण नाही, तुला आयुष्यात फक्त पार्टी आणि स्त्रिया हव्या होत्या. मला आयुष्यात फक्त एकच गोष्ट हवी होती आणि ती म्हणजे तू. पण तू माझे सर्व सुख हिरावून घेतलेस. मी कोणत्याही स्वार्थाशिवाय तुझ्यावर पैसे खर्च केले. मी तुझ्यासाठी रडले तेव्हा तुला काहीच वाटत नव्हते. इतकं झाल्यावर माझ्यासाठी या जगात जगण्याचं काहीच कारण उरलं नाही.'

या वेदनादायक पत्राचा शेवट करताना जिया लिहिते, 'मला फक्त एवढेच हवे होते की मी तुझ्यावर जसे प्रेम करते तसे तू माझ्यावर प्रेम कर. मी आपल्या भविष्याची स्वप्ने पाहिली, तुझ्या यशाची स्वप्ने पाहिली. पण आता मी ही जागा सोडत आहे आणि माझ्याकडे फक्त तुटलेली स्वप्ने आणि पोकळ आश्वासने आहेत. मला आता झोपायचे आहे... अशी झोप, ज्यातून मला कधीच उठायचे नाही. माझ्याकडे सर्व काही होते, पण आता माझ्याकडे काहीच नाही. तुझ्यासोबत असूनही, मी एकटी होते.'

टॅग्स :actressEntertainment news