
रजनीकांत वयाच्या 69व्या वर्षी अखेर निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात आपला नवीन पक्ष काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मुंबई - रजनीकांत या व्यक्तिमत्वाविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. जगात सर्वात प्रभावशाली व्यक्तिंच्या यादीत रजनीकांतचे नाव घेतले जाते. असा हा महान अभिनेता आता राजकीय पक्षात प्रवेश करणार आहे. अद्याप त्यानं त्या पक्षाच्या नावाची घोषणा केलेली नाही. त्याला अजून अवकाश असला तरी, त्याच्या राजकीय प्रवासाविषयी विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कलाकारांना राजकारणाचे काही वावडे नाही हे आतापर्यत राजकारणात प्रवेश केलेल्या अनेक कलाकारांकडे पाहिल्यावर कळते. आता त्यात थलाईवा अर्थात रजनीकांतच्या नावाची भर पडली आहे. सोशल मीडियावरुन त्यानं ती घोषणा केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आताच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून रजनीकांत राजकारणात सक्रिय आहे. मात्र त्याला एखाद्या मुरब्बी राजकारण्यासारखं राजकारण केलं नाही. नव्या राजकीय पक्षाच्या घोषणेनंतर त्यानं आपल्या भूमिकेविषयी काही नवीन आडाखे बांधले आहेत का हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.
रजनीकांत वयाच्या 69व्या वर्षी अखेर निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात आपला नवीन पक्ष काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. नवीन पक्षाची औपचारिक घोषणा 31 डिसेंबर रोजी केली जाणार असल्याचे सांगत आम्ही यासाठी अतिशय मेहनत घेऊ आणि जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.रजनीकांत मागील काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात येत असल्याचे त्यांनी आज पहिल्यांदाच जाहीर केले.
स्वत:चा पक्ष काढण्याबरोबरच ते विधानसभा निवडणूक लढवणार असून या निमित्ताने तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री होत आहे. याआधीही तामिळनाडूमधल्या सिने विश्वातील कलाकारांनी राजकारणात उतरून यश संपादन केले आहे. रजनीकांत यांनी मागील वर्षीच अभिनेता कमल हसन यांच्या पक्षाबरोबर युती कऱणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी रजनी यांनी म्हटले होते की,'राज्याच्या जनतेच्या हितासाठी जर कमल हसन यांच्याबरोबर युती करावी लागली तर आम्ही जरूर एकमेकांना साथ देऊ.' अशाच काही कलाकारांच्या राजकीय प्रवासाची ओळख करुन घेऊया.
डॉ. एमजी रामचंद्रन-
एमजीआर नावाने प्रसिद्ध असलेले रामचंद्रन तामिळ चित्रपटांतील अतिशय मोठे नाव होते. कलाविश्वातून सर्वप्रथम त्यांनीच राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी सुरूवातीला सीएन अन्नादुराई यांच्या द्रमुक मध्ये प्रवेश केला. अन्नादुराई यांच्या निधनानंतर आपले मित्र करूणानिधी यांच्याशी मतभेद होऊन त्यांनी 'अन्नाद्रमुक' या नावाने आपला नवीन पक्ष स्थापन केला. ते 1977 ते 80 आणि 1980ते 84 असे दोनवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते.
एम करूणानिधी-
तामिळ चित्रपटांमध्ये स्क्रीन प्ले राइटर म्हणून कारकिर्दीला सुरूवात केली. कित्येक चित्रपटांच्या पटकथांचे लेखन केल्यानंतर द्रमुख पक्षात प्रवेश करून तब्बल पाच वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भुषविले आहे.
विजयकांत-
विजयकांत हे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्यांनी देसीय मुरपोक्कु द्रविड़ कड़गम (DMDK) नावाने आपला पक्ष स्थापून 2011च्या विधानसभा निवडणुकीत 29 जागाही जिंकल्या. ते आता आपल्या पक्षाचे महासचिव आणि आमदारही आहेत.
जयललिता-
तामिळ चित्रपटांतील आपल्या काळाची एक आघाडीची अभिनेत्री म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होत्या. MGRसोबत कित्येक चित्रपटांतून काम करत राजकारणात प्रवेश केला. अन्नाद्रमुकधून राजकीय कारकिर्दीला सुरूवात करून पुढे 4 वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला.
कमल हसन-
अभिनेता म्हणून केवळ दक्षिणेतच नव्हे तर सबंध भारतभरात हसन यांची ख्याती आहे. चित्रपटांचे निमार्ते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक चांगले चित्रपट केले आहेत. 2018 मध्ये त्यांनी राजकारणाला सुरूवात करत 'मक्कल निधि मय्यम' नावाने नवा पक्ष स्थापन केला.