कोणते तिकीट घेऊ हाती? या शुक्रवारी होणार प्रेक्षकांची गोची!

सौमित्र पोटे
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

आघाडीचे कलाकार असलेले.. चित्रपटाकडे पुरेशा गांभीर्याने पाहणाऱ्या दोन दिग्दर्शकांचे दोन चित्रपट 11 आॅगस्टला प्रदर्शित होतायत. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. पण एकाच दिवशी आल्यामुळे प्रेक्षकांचा मात्र मोठा प्राॅब्लेम झाला आहे. संवाद असता तर ही टक्कर टाळता आली असती असं सिनेरसिकांना वाटतं. 

पुणे : मराठी भाषेत अाता भरपूर चित्रपट बनू लागले आहेत. वर्षातून 52 शुक्रवार वाट्याला येत असताना मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या आता जवळपास शंभराच्या आसपास पोचली आहे. यात उत्सवांच्या आलेल्या सुट्ट्या, क्रिकेटचे मौसम, रिलीज होणारे बडे हिंदी चित्रपट, परीक्षा, पाऊस आदी कारणांमुळे किमान 10 शुक्रवार मोकळे जातात. उरलेल्या शुक्रवारांत मात्र चित्रपट रिलीज करण्याची घाई असते. तरीही गेल्या काही दिवसांपासून रिलीज झालेल्या चित्रपटांवर नजर टाकली, तर प्रदर्शित होणाऱ्या दोन तीन चित्रपटांत एक आघाडीच्या कलाकारांना घेऊन केलेला, एक दुय्यम फळीतल्या कलाकारांचा तर तिसरा लो बजेट असे चित्रपट रिलीज होताना दिसतात. यांचा प्रेक्षक वर्गही ठरलेला असतो. त्यामुळे तशी अडचण होत नाही.

येत्या शुक्रवारी मात्र मराठी प्रेक्षकांची गोची होणार आहे. कारण, या शुक्रवारी प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू आणि समीर विद्वांस दिग्दर्शित मला काहीच प्राॅब्लेम नाही हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही चित्रपटांची चांगली हवा असल्यामुळे हे चित्रपट एकमेकांची गर्दी कमी करतात की या दोघांना रसिक उत्तम प्रतिसाद देतात, ते पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

समीर विद्वांस यांने आपल्या कलाकृतीतून नेहमीच रसिकांना सशक्त असे काही दिलेले आहे. यामध्ये आवर्जून उल्लेख करायला हवा तो डबलसीट, वायझेड, टाईमप्लीज अशा चित्रपटांचा. दर चित्रपटागणिक समीरच्या चित्रपटाची हाताळणी अधिक सफाईदार होते आहे. रसिकांनीही या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याचा मला काहीच प्राॅब्लेम नाही हा चित्रपट आता येतो आहे. यात स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. या दोघांचं आपलं असं फॅनफोलोईंग असल्यामुळे सोशल मीडीयावर या चित्रपटाची चर्चा चांगली आहे. ट्रेलरमधूनही हा चित्रपट पाहायची उत्सुकता वाढते. दुसरीकडे अभिनेता प्रसाद ओक यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलेला कच्चा लिंबू हा चित्रपट येतो आहे. रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, मन्मीत पेम, सचिन खेडेकर अशी भक्कम स्टारकास्ट चित्रपटाला लाभली आहे. मंदार देवस्थळी यांनीही निर्माता म्हणून या चित्रपटावर आपला विश्वास दर्शवला आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही अनेकांचा कौतुकाचा विषय ठरला आहे. ब्लॅक अॅंड व्हाईट या रंगात ही फिल्म दिसणार आहे. 

अशा दोन्ही चांगल्या, चित्रकृती एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याने नेमका चित्रपट कोणता पाहायचा यावरून प्रेक्षकांची गोची होणार आहे. मराठी चित्रपट हीरीरीने पाहणाऱ्या काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रीयांवरून ही द्विधा मानसिकता स्पष्ट होते. 

महामंडळ हतबल- खरेतर मराठी चित्रपटांना थिएटर मिळवण्यासाठी करावा लागणारा खटाटोप पाहता सर्व निर्मात्यांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून तारीख वाटप करायला हवे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने यात हस्तक्षेप करावा असे अनेकांना वाटतं. पण ते अशक्य असल्याचं लक्षात आलं आहे. आपला चित्रपट कधी प्रदर्शित करायचा हा सर्वस्बी निर्मात्यांचा प्रश्न असतो. त्यातून वाद घडतात. त्यामुळे प्रत्येकाने सामंजस्याने घ्यायला हवं. तसं नाही झालं, तर मात्र महामंडळाचा नाईलाज असतो, असं महामंडळातल्या कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. 

एकाच दिवशी यायला नको होते : कच्चा लिंबू आणि मला काही प्राॅब्लेम नाही या दोन्ही चित्रपटांची हवा चांगली आहे. हे चित्रपट चुकवू नयेत असे आहेत. सहकुटुंब पाहावेत असे हे चित्रपट आहेत. पण बजेटचा विचार करता या आठवड्यात एक आणि पुढच्या आठवड्यात एक चित्रपट पाहू - लतिका देशमुख

कशाला येतात आमने सामने ?- कच्चा लिंबूची तारीख आधी ठरली होती. एमकेपीएन हा चित्रपट 28 तारखेला येणार होता, तो पुढे जाऊन 11 आॅगस्ट झाला. त्यामुळे कच्चा लिंबूचं आॅडिअन्स मारलं जाईल. त्यानंतरच्या शुक्रवारी या लोकांनी यायला हवं होतं. - श्याम जोशी 

 

 

  

Web Title: kachcha limbu and MKPN releasing same day 11 aug esakal news