अक्षय कुमारने कंगनाला केला सिक्रेट कॉल; 'क्वीन'ने सांगितलं त्यामागील कारण 

स्वाती वेमूल
Thursday, 8 April 2021

"मला अक्षय कुमारसह काही बड्या कलाकारांचे फोन आणि मेसेजेस आले."

सतत वादग्रस्त विधान करून चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बहुचर्चित 'थलायवी' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरला आणि कंगनाच्या अभिनयकौशल्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांनीही कंगनाचं कौतुक केलं. मात्र काही जणांनी इतरांना घाबरून गुपचूप तिला फोन करून ट्रेलरची वाहवा केल्याचं कंगनाने सांगितलं. यामध्ये अभिनेता अक्षय कुमारचाही समावेश होता, असं तिने म्हटलं. बुधवारी ट्विट करत कंगनाने याबद्दलचा खुलासा केला. 'बॉलिवूडमधील वातावरण इतकं बिघडलेलं आहे की, माझं उघडपणे कौतुक केल्यानेही लोक अडचणीत येऊ शकतात', असं ती या ट्विटमध्ये म्हणाली. 

काय म्हणाली कंगना?
"बॉलिवूडमधील वातावरण इतकं प्रतिकूल झालं आहे की उघडपणे माझं कौतुक केल्यानेही लोक अडचणीत येऊ शकतात. मला अक्षय कुमारसह काही बड्या कलाकारांचे फोन आणि मेसेजेस आले. त्यांनी माझ्या थलायवी या चित्रपटाच्या ट्रेलरचं भरभरून कौतुक केलं. पण ते आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांच्या चित्रपटांचं जसं उघडपणे कौतुक करतात, तसं माझ्याबाबतीत करू शकले नाहीत. ही चित्रपट माफियांची दहशत आहे", असं कंगनाने एका ट्विटमध्ये म्हटलं. यावेळी आणखी एक ट्विट करत कंगनाने सिनेमा आणि इतर गोष्टींवरील तिची मतं यात गल्लत करू नये असंदेखील म्हटलंय. "कलेच्या बाबतीत इंडस्ट्रीने तत्वनिष्ठ राहावं अशी माझी इच्छा आहे. सिनेमाचा विषय असेल तर त्यात पॉवर प्ले आणि राजकारण आणून नये. राजकीय आणि आध्यात्मिक विषयांवरील माझ्या मतांमुळे मला छळाचं आणि धमक्याचं लक्ष्य बनवू नये. परंतु तसं होत असेल तर नक्कीच मी जिंकेन", असं ती पुढे म्हणाली. 

हेही वाचा : 'रामसेतू'च्या सेटवरील ४५ जणांना कोरोना; जाणून घ्या काय आहे सत्य?

मार्चमध्ये कंगनाच्या वाढदिवशी 'थलायवी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये कंगना जयललिता यांची भूमिका साकारत आहे. राम गोपाल वर्मा, हंसल मेहता यांसारख्या दिग्दर्शकांनी कंगनाचं कौतुक केलं. तर दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिनेदेखील कंगनाची स्तुती केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut says she got secret calls from Akshay Kumar and others praising Thalaivi