अभिनय करतच राहणार... 

संतोष भिंगार्डे 
शुक्रवार, 3 मार्च 2017

सोनी-बीबीसी अर्थ ही नवीन वाहिनी येत्या 6 मार्चपासून सुरू होत आहे. अभिनेत्री करिना कपूर-खान या वाहिनीची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर आहे. त्यानिमित्त तिच्याशी केलेली बातचीत... 

सोनी-बीबीसी अर्थ ही नवीन वाहिनी येत्या 6 मार्चपासून सुरू होत आहे. अभिनेत्री करिना कपूर-खान या वाहिनीची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर आहे. त्यानिमित्त तिच्याशी केलेली बातचीत... 

छोट्या पडद्यासाठी ब्रॅण्ड ऍम्बेसिडर बनण्याचा योग कसा काय जुळून आला? 
- सोनी आणि बीबीसी एकत्र येऊन ही नवीन वाहिनी लॉंच करीत आहेत. अशा वाहिनीचा एक भाग असणे ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारचा योग छोट्या पडद्यावर फारसा येत नाही. मी या वाहिनीचा एक भाग आहे याचा मला आनंद आहे. मला त्यांनी ऑफर दिली तेव्हा मी खूप एक्‍साईट झाले. मग मला त्यांनी सगळी माहिती पुरविली. मी खूप विचार केला आणि त्यांना होकार दिला. खरे तर मी बीबीसीवरील कार्यक्रम जसा वेळ मिळेल तेव्हा आवर्जून पाहिलेले आहेत. या वाहिनीवरील सर्व कार्यक्रम ऍडव्हेंचर आणि निसर्गाशी संबंधित असणार आहेत. तमीळ, तेलगू, हिंदी व इंग्रजी अशा चार भाषांमध्ये ही वाहिनी असणार आहे. 

 तुला स्वतःला ऍडव्हेंचरची किती आवड आहे? 
- हो... मी स्वतः वाईल्ड लाईफ आणि ऍडव्हेंचरची जबरदस्त फॅन आहे. "मै प्रेम की दिवानी हूँ' या चित्रपटाबरोबरच अन्य काही चित्रपटात मी ऍडव्हेंचर सीन्स केलेले आहेत. त्यामुळे मला याचा आनंद होतोय. ही वाहिनी खूप चांगली आहे. या वाहिनीवरील कार्यक्रम पाहिल्यानंतर सगळ्यांना असे वाटेल की अशा प्रकारचा अनुभव आपणही घेतला पाहिजे. सगळ्या कथा नवीन आहेत आणि आता मी या वाहिनीवरील कार्यक्रम पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.. 

एखाद्या वाहिनीची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर बनण्याचा ट्रेण्ड तू सेट करतेयस काय वाटतेय? 
- कोणत्या वाहिनीने कुणाला ब्रॅण्ड ऍम्बेसिडर बनवावे हा निर्णय त्या वाहिनीचा असतो. त्याबाबतीत मी जास्त काही बोलू इच्छित नाही; परंतु सध्याचा काळ बदललेला आहे. मोठा पडदा आणि छोट्या पडद्यामध्ये तीव्र स्पर्धा आहे. छोट्या पडद्यावरही चांगले कार्यक्रम आणि मालिका येत आहेत. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होतेय. अशा बदलत्या वातावरणात असे काही बदल (ब्रॅण्ड ऍम्बेसिडर) होणे अपेक्षित आहे. काळानुसार या गोष्टी बदलत आहेत. माझा स्वभाव खेळकर आहे. कदाचित त्याचमुळे मला सोनी-बीबीसी अर्थ या वाहिनीने ही जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. 

तू कशा पद्धतीने या वाहिनीचे ब्रॅण्डिंग करणार आहेस आणि हा करार किती वर्षांचा आहे? 
- कराराबद्दल जास्त काही बोलणार नाही; पण या वाहिनीचे ब्रॅण्डिंग आम्ही मोठ्या प्रमाणावर करणार आहोत. त्याकरिता आम्ही काही प्लॅन्स आखलेले आहेत. त्याबाबतीत आताच काही बोलणे उचित ठरणार नाही. मार्चनंतर सर्व गोष्टी उघड होतील. तरीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करणार आहोत. 

तुझ्या अभिनय कारकिर्दीला सतरा एक वर्षं झाली. याकडे तू कशा पद्धतीने पाहतेस? 
- मुळात अभिनयाची आवड मला पहिल्यापासूनच होती. त्यामुळे याच क्षेत्रात यायचे हे नक्की होते. या क्षेत्रात आल्यानंतर अनेक चढ-उतार आले. काही चित्रपट यशस्वी ठरले तर काही अयशस्वी; परंतु मी काही त्याचे दडपण घेतले नाही. जे चित्रपट अपयशी ठरले त्यातील चुका सुधारण्याचा प्रयत्न केला आणि माझी वाटचाल कायम ठेवली. विविध प्रकारचे चित्रपट आणि विविध भूमिका केल्या. अनेक चांगल्या दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबर काम केले. काही पुरस्कार मिळाले आणि कामाचे कौतुक झाले; परंतु मी अजूनही अभिनय सोडलेला नाही. मला अभिनय करायचाच आहे. अजूनही चांगल्या भूमिका करायच्या आहेत. त्या नक्कीच भविष्यात करीन, असा विश्वास आहे. 

सध्या बॉलीवूडचे स्वरूप बदलत आहे. त्याबद्दल तुला काय वाटते? 
- पूर्वी काय आणि आता काय चांगले चित्रपट नेहमीच येत आहेत. मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारे चित्रपट येत आहेत. "थ्री इडिएट्‌स', "दंगल' हे चित्रपट चांगला संदेश देणारे होते. महत्त्वाचे म्हणजे महिलाप्रधान चित्रपटांची संख्या वाढत आहे आणि प्रेक्षक अशा चित्रपटांचे चांगलं स्वागत करीत आहेत. वास्तववादी घटनांवर चित्रपट येताहेत. दिवसेंदिवस चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलत चालला आहे. ही चांगली बाब आहे. 

प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची संख्या वाढतेय. तेथील विषयही निरनिराळे आहेत. काय सांगशील? 
- मराठी, पंजाबी, मल्याळम या भाषांतील चित्रपट चांगले बनत आहेत. तेथील प्रेक्षकांची संख्याही वाढत आहे. प्रादेशिक भाषेतील सिनेमा मोठा होतोय. त्यांची चांगली चर्चा होतेय ही सुखद घटना आहे. मराठीतील "सैराट' या चित्रपटाबद्दल मी बरेच ऐकलेले आहे. हा चित्रपट मी पाहिलेला नसला तरी त्याची कथा मी ऐकलेली आहे. अनेकांनी मला त्याबद्दल सांगितलेले आहे. मराठी सिनेमा वाढतोय याचा आनंद आहे. 

तैमुरचे नाव बदलण्यासाठी तुझा पती सैफ अली खान तयार होता; पण तू त्याला तयार नव्हतीस हे खरे आहे का? 
- या प्रश्‍नावर करिनाने कोणतेही उत्तर देणे टाळले. 

Web Title: kareena kapoor khan interview