करीनाला वाटते तैमूरने बनावे क्रिकेटपटू 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

तैमूरने आजोबा मन्सूर अली खान ऊर्फ टायगर पतौडी यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटचे मैदान गाजवावे अशी इच्छा असल्याचे त्याची आई आणि अभिनेत्री करिना कपूर हिने नुकतेच सांगितले. 

नवी दिल्ली : तैमूरने आजोबा मन्सूर अली खान ऊर्फ टायगर पतौडी यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटचे मैदान गाजवावे अशी इच्छा असल्याचे त्याची आई आणि अभिनेत्री करिना कपूर हिने नुकतेच सांगितले. दुडुदूडु धावण्याचा "माईलस्टोन' पार करण्याच्या आतच तैमूर 'सोशल मीडिया सुपरस्टार' झाला आहे. तो आता केवळ दोन वर्षांचा आहे. 

आजी शर्मिला टागोर, वडील सैफ अली खान आणि अर्थातच आई म्हणजे स्वतः आपण रुपेरी पडद्यावर चमकत असलो तरी तैमूरने क्रिकेटपटू बनलेले आपल्याला आवडेल असे करीनाने एका "डान्स शो'दरम्यान सांगितले. करीनाने भारताचे पहिले विश्‍वकरंडक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबरोबरील संभाषणाचीही माहिती दिली. तैमूरबद्दल आई म्हणून करीनाची अपेक्षा कळताच कपिल भारावून गेले आणि त्यांनी एक बॅट "ऑटोग्राफ' करून तिला भेट दिली. 

अलीकडेच तैमूरचा "टिम इंडिया'च्या जर्सीमधील फोटो व्हायरल झाला होता. विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरविल्यानंतर तैमूरच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. "सॅल्यूट' करतानाची त्याची हसतमुख छबी इन्स्टावर पोस्ट करण्यात आली होती. या विजयाचा अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली होती. तैमूर हा बालक असला तरी त्याचे फेसबुक आणि इन्स्टावर अकाऊंट आहे. त्याला हजारो फॉलोअर्स आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kareena Kapoor Khan wants Taimur Khan to become a cricketer