नथिंग इज इम्पॉसिबल !

दीपिका वाघ 
मंगळवार, 11 एप्रिल 2017

64 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर दिग्दर्शित "कासव' या मराठी चित्रपटाने सुवर्णपदकावर बाजी मारली. यामुळे महाराष्ट्रात आनंदाला उधाण आले. कासव या चित्रपटासाठी नाशिकच्या तुषार गुंजाळ या तरुणाने सहाय्यक दिग्दर्शकाचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.

64 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर दिग्दर्शित "कासव' या मराठी चित्रपटाने सुवर्णपदकावर बाजी मारली. यामुळे महाराष्ट्रात आनंदाला उधाण आले. कासव या चित्रपटासाठी नाशिकच्या तुषार गुंजाळ या तरुणाने सहाय्यक दिग्दर्शकाचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. थिंक पॉझिटिव्ह, नथिंग इज इम्पॉसिबल असा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन तो जगत आहे. सुमित्रा भावे यांनी आतापर्यंत नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार केले. "कासव'मध्ये सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावताना तुषारचा अनुभव कसा होता, यासह इतर विषयांवर त्याने साधलेला संवाद. 

मूळचा नाशिककर असलेला तुषार मराठा हायस्कूलचा विद्यार्थी. पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन केटीएचएम महाविद्यालयात त्याचे शिक्षण झाले. त्यानंतर इंजिनिअरिंग, पुढे ऍनिमेशनही केले, पण घरात संगणक आल्यामुळे नाटक पाहण्याचे वेड लागले. एखाद्या कलाकारासाठी एवढे लक्षण पुरेसे असते. त्याला चांगला संशोधक व्हायचे होते, पण कलेचा पायाच वेगळा होता. तुषारचे वडील बाळासाहेब गुंजाळ मराठीचे प्राध्यापक असल्यामुळे लहानपणी त्याचेही बरचसे साहित्य वाचून झाले. साहित्याच्या पुस्तकातील चित्र व त्याला ऍनिमेशनचा टच, असे करत करत तुषारला कळलेच नाही, की तो कसा घडत गेला ते! घडायचा म्हणून घडत गेलो आणि नाटकात अभिनय करायला लागलो. लिहायला लागलो. यातून चित्रपटाचे माध्यम सापडले. 

पुण्याला आल्यानंतर दिग्दर्शक, नाट्यशिक्षक प्रदीप वैद्य यांच्या समूहात सामील झालो. ओळखी वाढल्या. इतरांच्या बदली (रिप्लेसमेंट) म्हणून बऱ्याचदा कामही केले. एकदा एकपात्री प्रयोगात (पीटीओ) प्रेस टर्नओव्हर केला आणि मला चांगले वाचता येत होते, लिहिता येते म्हणून कौतुक झाले. नाटकांत प्रवेश झाला. सह्याद्री वाहिनीवर "माझी शाळा' नावाची मालिका केली. "फिर जिंदगी' नावाची शॉर्ट फिल्म केली. माझे काम सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्यापर्यंत कोणीतरी पोचवले होते. त्यांनी याआधी माझे काम पाहिलेले होते, पण माझे काम त्यांच्यापर्यंत पोचवले म्हटल्यावर मी त्यांच्याबरोबर कामकाज करायला सुरवात केली, असेही तो सांगतो. 

गेल्या तीन वर्षांपासून सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्याबरोबर तुषार काम करत आहे. सुमित्राताई या स्वतः एक विद्यापीठ आहेत. त्यांचा जगण्याचा दृष्टिकोन व्यापक आहे. जो सर्वसामान्य माणसाच्या मुळाशी जाणारा असतो, असे त्याने सांगितले. आतापर्यंत सुमित्रा भावेंनी तयार केलेले चित्रपट हे वेगळ्या धाटणीचे आहेत. कधी माझ्यासमोर एखादा प्रश्‍न उभा राहिला, तर मी त्यांच्यासमोर मांडतो. त्याचे ते एका वाक्‍यात उत्तर देतात. यातून गेली तीन वर्षे मी कलाकार म्हणून खूप शिकत गेलो. सुमित्राताईंचे लेखन, त्यांची कामकाज करून घेण्याची पद्धत, चित्रपटाचा आशय ही एक लाइफलाइन प्रोसेस आहे, जी मी त्यांच्याकडून शिकत आहे. 

सध्यातरी "कासव'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तुषारला भारी वाटतेय. त्याच्या आवडत्या दिग्दर्शकांची यादी बरीच मोठी आहे. पण त्यातल्या त्यात उमेश कुलकर्णी, चैतन्य ताम्हणे, नागनाथ मंजुळे त्याचे आवडते दिग्दर्शक आहेत. तुषार सध्या झी युवा वाहिनीवरील कोठारे एन्टरटेन्मेंट प्रस्तुत "बनमस्का' या मालिकेचा निर्मिती संचालक (क्रिएटिव्ह डायरेक्‍टर) म्हणून काम करत आहे. त्याचबरोबर लेखन व दिग्दर्शित केलेली "एव्हरी डे' नावाची शॉर्ट फिल्म तयार करत आहे. 

Web Title: kasav movie director Tushar Gunjal interview