संगीत कलेने माणूस बनतो संवेदनशील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मार्च 2019

गुहागर, देवरूख, मालवण, पनवेल, पेठ आणि महाराष्ट्रात अनेक तालुक्‍याच्या ठिकाणी अशा कार्यशाळा झाल्या आहेत. संगीतकलेसाठी चांगला श्रोता निर्माण करण्यासाठी शासनाचा हा प्रयत्न आहे. भविष्यात यातून चांगले कलाकारही घडतील.

रत्नागिरी - संगीतकलेमुळे माणूस संवेदनशील बनतो. प्रत्येकानेच काही गायक, वादक व्हायला हवे असे नाही. रसिक श्रोतेसुद्धा तयार होणे आवश्‍यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मैफल, संगीत कार्यक्रमांचा लाभ घेतला पाहिजे. याकरीता सांस्कृतिक कार्य संचालनालय पुलं-गदिमा-बाबूजींच्या जन्मशताब्दीनिमित्त लेखन, काव्य, संगीत यावर कार्यशाळा घेत आहे. यामुळे ग्रामीण, निमशहरी भागातील मुलांनाही संधी मिळत आहे, अशी माहिती या उपक्रमाच्या राज्य समन्वयक डॉ. कस्तुरी पायगुडे-राणे यांनी दिली.

किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँसाहेबांच्या जयंतीनिमित्त डॉ. राणे यांची मैफल आयोजित केली होती. तत्पूर्वी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, गुहागर, देवरूख, मालवण, पनवेल, पेठ आणि महाराष्ट्रात अनेक तालुक्‍याच्या ठिकाणी अशा कार्यशाळा झाल्या आहेत. संगीतकलेसाठी चांगला श्रोता निर्माण करण्यासाठी शासनाचा हा प्रयत्न आहे. भविष्यात यातून चांगले कलाकारही घडतील.

लहान मुलांनी विविध प्रकारचे संगीत ऐकले पाहिजे. शास्त्रीय संगीताची विद्यापीठे भारतात आहेत. प्रत्येक घराण्याची शैली वेगवेगळी आहे. मी पुणे विद्यापीठात बीए, एमएच्या विद्यार्थ्यांना संगीत शिकवते. शास्त्रीय संगीतासाठी अनेक वर्षे गुरुकडून शिकावे लागते, रियाज करावा लागतो.

बंदिशींचा तौलनिक अभ्यास करून केलेल्या प्रबंधास सावित्रीबाई फुले विद्यापीठाने विद्यावाचस्पती पदवी प्रदान केली. त्यांनी लंडन, बर्मिंगहॅम, ऑक्‍सफोर्ड इथे कला सादर केली आहे. अमेरिकेत मिशिगन येथील होप युनिव्हर्सिटीमध्ये २ वर्षे भारतीय शास्त्रीय संगीत शिकवत होत्या.

नाळ रत्नागिरीशी जुळलेली
डॉ. राणे यांचा जन्म रत्नागिरीतील परकार रुग्णालयात झाला. त्यांचे आजोबा त्यावेळी येथे बांधकाम खात्यात अधिकारी होते. त्यामुळे त्यांची नाळ रत्नागिरीशी जुळली आहे. आज मैफल सादर करताना आनंद वाटल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी २००९ मध्ये त्यांनी खल्वायनची मासिक संगीत मैफल रंगवली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kasturi Paygude Rane comment