Kedar Shinde: बाबा.. मी कशाचीच परतफेड कधीच करू शकत नाही.. चित्रपट प्रदर्शित होताच केदार शिंदे यांची भावूक पोस्ट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kedar Shinde shared emotional post for shahir sable after maharashtra shaheer movie release

Kedar Shinde: बाबा.. मी कशाचीच परतफेड कधीच करू शकत नाही.. चित्रपट प्रदर्शित होताच केदार शिंदे यांची भावूक पोस्ट..

Maharashtra Shaheer Director Kedar Shinde : केदार शिंदेंच्या 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता होती. अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा आज २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.

शाहीरांचा खडतर प्रवास, त्यांची जिद्द, त्यांचे राजकीय कार्य आणि एकूणच संगीत विश्वातील कारकीर्द याचा आढावा या चित्रपटातून घेण्यात आला आहे. शाहिरांच्या आयुष्यात आलेले दिग्गजही या चित्रपटातून आपल्याला भेटणार आहेत. असा बहुचर्चित सिनेमा आज रिलीज झाला असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

'महाराष्ट्र शाहीर' रिलीज होताच चित्रपटाचे दिग्दर्शक आणि शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी शाहीर साबळे यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अत्यंत हळवी अशी ही पोस्ट असून या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहेत.

(Kedar Shinde shared emotional post for shahir sable after maharashtra shaheer movie release )

या पोस्ट मध्ये केदार शिंदे यांनी शाहीर साबळे यांचा अगदी जुना फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये शाहीर साबळे त्यांच्या पत्नी केदार शिंदे त्यांचे कुटुंब आहे. अत्यंत जुना फोटो त्यांनी शेयर केला आहे. सोबतच त्यांनी आपल्या आजोबांना एक साद घातली आहे.

केदार म्हणतात, 'बाबा.. तुम्ही जे आम्हाला दिलं आहे, तुमचे संस्कार, तुमची परंपरा, कलेप्रती असलेली तुमची निष्ठा, सचोटी, एक कलाकार म्हणून कसं जगायचं ह्याचे धडे.. त्या कशाचीच परतफेड आम्ही कधीच करू शकत नाही.. '

'पण तुम्ही आमच्यासाठी उघडुन दिलेल्या ह्या विशालकाय जलाशयातल्या काही घागरी आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी उपसून काढल्या आहेत.. ह्या गढूळ वातावरणात त्या स्वच्छ पाण्याची चव त्यांना भावेल.. त्यांचा आत्मा शांत होईल.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची मनोरंजनाची तहान सुद्धा भागेल..'

पुढे ते म्हणतात, 'हा चित्रपट आम्ही केलेला नाही.. हा तुमचाच चित्रपट आहे.. तुम्हीच घडवून आणला आहे.. आज पासून हा प्रेक्षकांच्या स्वाधीन होतोय.. तुम्ही ह्या महाराष्ट्राला जितकं प्रेम दिलं तितकंच प्रेम हा महाराष्ट्र तुम्हाला देईलच ही खात्री आहे आम्हाला..'' अशी पोस्ट त्यांनी शेयर केली आहे.