बालनाट्यांचं जग... 

चिन्मयी खरे  
मंगळवार, 2 मे 2017

मुलांच्या विश्‍वात रमताना आपणही लहान होतो. आपणही त्यांच्यासारखे लाडे-लाडे बोलू लागतो. मुलांशी संवाद साधण्याचा आपला हा एक वेगळा प्रयत्न असतो. असाच प्रयत्न बालनाट्यातून होत असतो. मुलांचा व्यक्तिमत्त्व विकासच या बालनाट्यातून होत असतो. त्यामुळे बालनाट्यांकडे संस्कार केंद्र म्हणूनही पाहिलं जातं, त्याविषयी... 

मुलांच्या विश्‍वात रमताना आपणही लहान होतो. आपणही त्यांच्यासारखे लाडे-लाडे बोलू लागतो. मुलांशी संवाद साधण्याचा आपला हा एक वेगळा प्रयत्न असतो. असाच प्रयत्न बालनाट्यातून होत असतो. मुलांचा व्यक्तिमत्त्व विकासच या बालनाट्यातून होत असतो. त्यामुळे बालनाट्यांकडे संस्कार केंद्र म्हणूनही पाहिलं जातं, त्याविषयी... 

सध्या शाळकरी मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. पूर्वी अशा सुट्या लागल्या की, मुलं दिवसभर हुंदडत. आता त्यांना शिबिरात अडकवतात. मग ते खेळाचे शिबिर असो वा हस्तकला किंवा चित्रकलेचे क्‍लासेस. मुलांनी सुट्यांचा सदुपयोग करावा, अशी पालकांची इच्छा त्यामागे दिसते; पण या सगळ्यात असं वेगळं एक शिबिर असतं ते म्हणजे बालनाट्य शिबिर. या बालनाट्य शिबिरातली मजा, गंमत-जंमत अजूनही कमी झालेली नाहीय. कारण जगाच्या रंगभूमीवर आत्मविश्‍वासनं उभं राहण्याचं शिक्षण तिथे मिळत असतं! 

मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या की, विविध रंगमंदिरांमध्ये बालनाट्यांचे प्रयोग सुरू होतात. त्यात काम करणारे अभिनेते ही शिबिरार्थीच असतात बहुतेकदा... या बालनाट्यांचे विषयही तसे मजेशीरच असतात. लहान मुलांना काहीतरी शिकायला मिळेल किंवा त्यांच्यापर्यंत चांगल्या गोष्टींचा संदेश जावा, या हेतूने या बालनाट्यांचं लिखाण केलेलं असतं. सध्याचा नवा ट्रेंड म्हणजे कार्टुनवर आधारित बालनाट्ये. यात त्यांचे लाडके डोरेमॉन, निंजा हतोडी, स्पॉंजबॉब, छोटा भीम अशी वेगवेगळी पात्र असतात आणि या कार्टुन्सभोवती नाटकाची सगळी संहिता फिरते. अनेक ठिकाणी ही बालनाट्य शिबिरे भरवली जातात. अनेक दिग्गज आहेत जे वर्षानुवर्षे ही बालनाट्य शिबिरे भरवत आहेत. अरूंधती भालेराव हे त्यातलेच एक नाव. त्या बालनाट्य दिग्दर्शिका आहेत. त्यांच्याशी गप्पा मारताना त्या म्हणाल्या, "मी ड्रॅमॅटिक्‍सचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे आणि त्यात डॉक्‍टरेटही मिळवली आहे. गेली 15 वर्ष मी महिला आणि मुलांसाठी काम करतेय. माझा मुख्य उद्देश हा की रंगभूमी ही फक्त मेकअप करून अभिनय करण्यासाठी नाही, तर अभिनयाशी संबंधित असलेल्या देहबोली, आवाज, संवाद कौशल्य, शब्दांची फेक, उच्चार, आघात, हावभाव हे शिकण्याचे एक माध्यम आहे. या गोष्टी फक्त अभिनय करतानाच नाही, तर सामान्य जीवन जगतानाही आपल्याला उपयोगी पडू शकतात. त्यामुळे अभिनयातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असं माझं ठाम मत आहे. जेव्हा मुलं माझ्याकडे ऍडमिशनला येतात, तेव्हा मी त्यांच्या पालकांना स्पष्ट सांगते की, मी तुमच्या मुलाला आमीर खान किंवा मुलीला करिना कपूर बनवू शकत नाही. पण, माणूस म्हणून घडवण्याच्या प्रक्रियेत ज्या ज्या गोष्टी लागतात; उत्तम वाचन, उत्तम बोलणं, जीवन जगताना लागणारी स्पष्टता, देहबोली, आवाज, मनुष्य म्हणून जगताना विकासाची आस या गोष्टी मी त्यांना नक्कीच शिकवू शकते. 
सध्या सुट्टी संपेपर्यंत अनेक नाट्यगृहांमध्ये अशीच वेगवेगळ्या विषयांवरची बालनाट्ये पाहायला मिळतात. कित्येक पालक आपल्या मुलांना नाटक म्हणजे काय? हे दाखविण्यासाठीही बालनाट्य पाहायला घेऊन जातात. त्यामुळे जोपर्यंत मुलांमध्ये काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आहे आणि मोठ्यांमध्येही मुलांना काहीतरी चांगलं देण्याची इच्छा आहे तोपर्यंत या बालनाट्यांची मांदियाळी दर वर्षी छोट्यांच्या भेटीला येतच राहील. 

 

Web Title: kids drama school