संगीत राज्य नाट्य स्पर्धा यंदा कोल्हापुरात? 

संभाजी गंडमाळे
रविवार, 14 जानेवारी 2018

कोल्हापूर - राज्य नाट्य स्पर्धेत प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल होणारे केंद्र अशी ओळख निर्माण झालेल्या येथील केंद्रावर आता संगीत राज्य नाट्य स्पर्धाही रंगणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही. मात्र, एक ते 28 फेब्रुवारीअखेर ही स्पर्धा होईल, अशी शक्‍यता आहे.

कोल्हापूर - राज्य नाट्य स्पर्धेत प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल होणारे केंद्र अशी ओळख निर्माण झालेल्या येथील केंद्रावर आता संगीत राज्य नाट्य स्पर्धाही रंगणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही. मात्र, एक ते 28 फेब्रुवारीअखेर ही स्पर्धा होईल, अशी शक्‍यता आहे.

संगीत राज्य नाट्य स्पर्धेचा आजवरचा इतिहास पहाता गेल्या वर्षी ज्या जिल्ह्यातील नाटक पहिले येईल, त्या जिल्ह्यात पुढील वर्षीची स्पर्धा घेतली जाते. मात्र, तसा कुठेही लिखित नियम नाही. त्यामुळे यंदा हा अलिखित नियम बदलणार का, याकडे रंगकर्मींचे लक्ष लागून राहिले आहे. 

गेल्या वर्षी सांगलीत झालेल्या स्पर्धेत रत्नागिरीरीच्या राधाकृष्ण कलामंचने बाजी मारली होती. त्यामुळे यंदा रत्नागिरीत स्पर्धा होणार, असे सांस्कृतिक कला संचालनालयाचा "अलिखित' नियम सांगतो. मात्र, यंदा केंद्र कोल्हापुरात हलवण्याची माहिती मिळाल्याने रत्नागिरीतून त्याला विरोध होवू लागला आहे. त्यासाठी आंदोलनही उभे राहिले आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनाही त्यांनी साकडे घातल्यानंतर रत्नागिरी केंद्राची ग्वाही मिळाली असली तरी अद्यापही चित्र अस्पष्ट आहे. कोल्हापुरात स्पर्धा घ्यायची आणि पहिल्या पाच नाटकांचा महोत्सव रत्नागिरीमध्ये घेण्याचा पर्याय पुढे येवू शकतो. 

हौशी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रोटेशन पध्दतीने घेण्याचा निर्णय कला संचालनालयाने घेतल्यानंतर हौशी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरात झाली होती. त्यानंतर या स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येक वर्षी विविध केंद्रावर होते. याच पध्दतीने राज्य संगीत नाट्य स्पर्धेचा निर्णय कला संचालनालयाने घेतला असला तरी रत्नागिरी हे संगीत नाटकांसाठी शासनाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे केंद्र आहे. विक्रमी प्रेक्षक संख्या या केंद्रावर असते, अशी रत्नागिरीतील रंगकर्मींची भूमिका आहे. 

कलापूरची परंपरा 
कलापूर कोल्हापूरने संगीत नाटकांचा सुवर्णकाळ अनुभवला. मात्र, अलिकडच्या काळात मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंचच्या "संगीत सौभद्र' या नाटकाने दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर मोहोर उमटवली. चाळीसहून अधिक बक्षीसे या नाटकाला मिळाली. दोन वर्षापूर्वी संगीत राज्य नाट्य स्पर्धेत "संगीत स्वयंवर' सादर केले होते. या नाटकाला दुसऱ्या क्रमांकासह विविध पारितोषिकांनी गौरवण्यात आले होते. मात्र, यंदाच्या स्पर्धेत 28 नाटकांचा समावेश असून लोहिया मंचची एंट्री नाही. 

Web Title: Kolhapur News Music State Theater Competition