नाट्यरसिकांनी भरलेले थिएटर नटाचे जीवनसत्व - विजय कदम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

आजरा - रंगभूमीने खुप काही दिले. जीवनात कसे वागायचे, जगायचे हे शिकवले. प्रायोगिक, सामाजिक व ऐतिहासिक असे कोणतेही नाटक असो; नाट्यरसिकांनी भरलेले थिएटर हे नटाचे जीवनसत्व असते. त्याचा मोठा खुराक असतो, असे मत प्रसिध्द अभिनेते विजय कदम यांनी व्यक्त केले. 

आजरा - रंगभूमीने खुप काही दिले. जीवनात कसे वागायचे, जगायचे हे शिकवले. प्रायोगिक, सामाजिक व ऐतिहासिक असे कोणतेही नाटक असो; नाट्यरसिकांनी भरलेले थिएटर हे नटाचे जीवनसत्व असते. त्याचा मोठा खुराक असतो, असे मत प्रसिध्द अभिनेते विजय कदम यांनी व्यक्त केले. 

येथील (कै) रमेश टोपले राज्यनाट्यमहोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नवनाट्यमंडळाचे अध्यक्ष अशोक चराटी, अभिनेत्री अंशुमाला पाटील, महोत्सवाचे अध्यक्ष चंद्रशेखर फडणीस, डॉ. अनिल देशपांडे प्रमुख उपस्थित होते. या नाट्यमहोत्सवात साईकल मंच कुडाळ निर्मित "अशुध्द बीजापोटी' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. 

नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष श्री. फडणीस यांनी स्वागत व प्रास्ताविकात केले. श्री. कदम म्हणाले, ""बारा वर्षापुर्वी एका नाटकाच्या प्रयोगाला येथे आलो असताना येथील नाट्यरसिकांकडून मिळालेली दाद विसरु शकत नाही. येथील नाट्यमहोत्सवाचे वेगळेपण ऐकून होतो. नाटकांना मिळणारा रसिकांचा प्रतिसाद खुप काही सांगून जातो.'' (कै) टोपले यांच्या स्नुषा सोनाली टोपले यांच्या "मैत्री अपूर्णांकाशी' या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. केदार देसाई, शंकर टोपले, सोनाली टोपले यांनी मनोगत व्यक्त केले.

विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. प्रायोजक, सह प्रायोजक यांचाही सत्कार झाला. व्ही. एस. कुलकर्णी यांनी मदतीचा एकावन्न हजारांचा धनादेश संयोजकांना दिला. या वेळी डॉ. अंजनी देशपांडे, आय. के. पाटील, जनार्दन टोपले, राजेश टोपले, दिनेश टोपले, मधुकर क्रमित यासह मान्यवर उपस्थित होते. पी. बी. पाटील, स्वरदा फडणीस यांनी सुत्रसंचालन केले.

या वेळी स्वयंसिध्दा कोल्हापूर या संस्थेचे "सावित्रीच्या लेकी' हे नाटक सादर झाले. लोकरंगमंच, सातारा निर्मित ""बैल- अ-बोल बाला' नाट्यशुभांगी, जयसिंगपूर निर्मित "इथे ओशाळला मृत्यू' यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. दिग्दर्शनातील प्रथम तीन विजेते असे - केदार देसाई (अशुध्द बीजापोटी), राजीव मुळे (बैल- अ-बोल बाला), सुभाष टाकळीकर (इथे ओशाळला मृत्यू). स्त्री अभिनय- सानिका कुंटे "जीया' (अशुध्द बीजापोटी), अधित्री वडोदकर "मिथाली' (द गिफ्ट), वैशाली घाटगे "शेतकऱ्याची पत्नी' (बैल- अ- बोल बाला). पुरुष अभिनय- केदार देसाई "अल्ताफ' (अशुध्द बीजापोटी), दिपक देशमुख "सुलतान्या बैल' (बैल- अ- बोलबाला), अमोल शिंदे "रविंद्र (अशुध्द बीजापोटी) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. 

वेगवेगळी नाटके हेच शिबीर 
नाटकांसाठी स्वतंत्र शिबीर घेण्याची गरज नाही. या महोत्सवात सादर होणारी वेगवेगळी नाटके हेच अभिनय शिकणाऱ्यांना मोठे शिबीर असल्याचे श्री. कदम यांनी नमुद केले. 

सुसज्ज नाट्यगृहाची गरज 
आजऱ्यात सुसज्ज नाट्यगृह उभारण्याची गरज आहे. त्यासाठी लागेल ते सहकार्य आपण करू अशी ग्वाही अंशुमाला पाटील यांनी दिली. 

Web Title: Kolhapur News Vijay kadam comment