Laal Kaptaan Trailer : नागा साधूच्या रुपात सैफला पाहून तुम्हीही व्हाल थक्क !

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

सैफ अली खान 'लाल कप्तान' मधून एका दमदार भूमिकेसह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

मुंबई : गेल्या काही काळापासून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान चित्रपटांपासून दूर होता. आता मात्र तो एका दमदार भूमिकेसह आगामी चित्रपटामधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लाल कप्तान' असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याच्या ट्रेलरचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये सैफ नागा साधूच्या भूमिकेत दिसतोय. भयंकर आणि हिंसक रुपामध्ये तो दिसतो आहे. अघोरी साधू ते योद्धा असा त्याचा प्रवास ट्रेलरमध्ये दाखविण्यात आला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

ट्रेलरच्या सुरुवातीलाच अंगावर शहारा आणणारा सैफचा एक डायल़ॉग आहे, 'आदमी के पैदा होते ही काल भैंसे पर बैठकर चल पड़ता है उसे वापस लाने के लिए. आदमी की जिंदगी उतनी, जितना समय उस भैंसे को लगा उस तक पहुंचने में’. त्यानंतर सैफ एका व्यक्तीचा मृतदेह घोड्यावर बसून घेऊन जाताना दिसतो. कपाळी टिळा, डोळ्यात काजळ आणि मोठी दाडी असा त्याचा नागा साधूचा लूक थरकाप उडवणारा आहे. शिवाय ट्रेलरमध्ये सोनाक्षी सिन्हाचा आवाजही ऐकायला मिळतो. 

सैफ शिवाय या चित्रपटामध्ये जोया हुसैन, मानव विज, सिमोन सिंह आणि दीपक डोबरीयाल ही मंडळीदेखील दिसणार आहेत. अनुष्का शर्माच्या NH10 चं दिग्दर्शन करणाऱ्या नवदीप सिंह यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. येत्या 10 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी सैफ बहुचर्चीत वेब सिरीज 'सेक्रेड गेम्स' च्या दुसऱ्या सिझनमधून दिसला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laal Kaptaan Trailer Saif Ali Khan looks fierce as Naga Sadhu