#MarathiBiggBoss 'असा' आहे बिगबॉसविजेत्या मेघा धाडेचा रोमांचकारी प्रवास...

सोमवार, 23 जुलै 2018

अगदी पहिल्या दिवसापासून फक्त बिग बॉस जिंकण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मेघाचे स्वप्न काल (ता. 22) सत्यात उतरले. तिचा बिग बॉसच्या घरातला प्रवासही तितकाच रोमांचकारी ठरला. 

हिंदी बिग बॉसला दरवर्षीच भरघोस प्रतिसाद मिळतो, याच पार्श्वभूमिवर 'मराठी बिग बॉसचा' चालू झाले व यशस्वीही झाले. 15 एप्रिलला 15 कलाकार स्पर्धकांसोबत चालू झालेले मराठी बिग बॉस हे तीन महिन्यांनंतर अखेरीस 6 स्पर्धकांवर येऊन ठेपले आणि पूर्ण पर्वात गाजत असलेली अभिनेत्री मेघा धाडे हिनेच बिग बॉसच्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. अगदी पहिल्या दिवसापासून फक्त बिग बॉस जिंकण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मेघाचे स्वप्न काल (ता. 22) सत्यात उतरले. तिचा बिग बॉसच्या घरातला प्रवासही तितकाच रोमांचकारी ठरला. 

megha

15 कलाकारांसह स्पर्धेत सहभागी झालेली मेघा ही पहिल्या दिवसापासूनच जिंकण्यासाठी खेळत होती, तसे तिने जाहिर ही केले होते. त्यामुळे तिला घरातल्या सभासदांच्या टिकांनाही तोंड द्यावे लागले. घरात तिच्यावर अनेक आरोप झाले, भांडणे झाली, तिला एकटे पाडण्यात आले यातही तिच्यातील मजबूत बाजूच समोर आली. सुरवातीपासून सई लोकूर, पुष्कर जोग आणि मेघाची अगदी घट्ट मैत्री जमली होती. घरात येणारे टास्क, कॅप्टनशीपसाठी केलेली व्यूहरचना, इतरांबद्दल गॉसिप्स, एकमेकांवरील प्रेम, मैत्री या तिघांनी अगदी सच्चेपणाने अनुभवली. 

bigg boss

मेघा बेधडक, बिनधास्त, बोलकी असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस पडत गेली. घरात सकाळी उठल्यापासून बिग बॉसने लावलेल्या गाण्यावर नाचणे, गुड मॉर्निंग बिग बॉस म्हणणे ते रात्री झोपेपर्यंत स्वयंपाकघरात व्यस्त असणे अशी मेघाची अनेक रूपं प्रेक्षकांना भवाली. तसेच बिग बॉसची मोठी चाहती असल्याने ती घरात येण्यापूर्वीच सगळा अभ्यास करून आली होती. त्यामुळे घरात कसे वावरायचे, वेशभूषा कशी हवी, घरात खेळताना स्ट्रॅटेजी कशी हवी, टास्क कसे जिंकायचे यावर तिचे पूर्ण लक्ष असायचे. अनेकदा घरातल्या इतर सदस्यांसाठी काही टास्क कळण्यापूर्वीच मेघा तो टास्क जिंकून रिकामी झालेली असायची. त्यामुळे अनेकदा घरातले इतर सदस्य तिच्यावर नाराज असायचे, तसेच काहींना तिचा हेवा वाटायचा. तिचे जेवढे बिग बॉसच्या घरावर प्रेम होते, त्याहून जास्त तिचे घरातल्या स्वयंपाकघरावर प्रेम होते. सर्वांना आनंदाने जेवू घालणे हे तिचे आवडीचे काम होते. 

megha

100 दिवसांमध्ये असेही काही दिवस आले, ज्यात घरात दोन ग्रुप पडले, मग पुढचे काही दिवस या दोन ग्रुपमध्ये तणाव, भांडणे, वादावादी, जिंकण्यासाठी चढाओढ सुरू झाली. यातही न खचता मेघाने बाजी मारली. ती सहभागी असलेले जास्तीत जास्त टास्क तिने जिंकले. मेघाची 'हार न मानण्याची वृत्ती व कायम जिंकण्याचा ध्यास' तिला उपयोगी पडला. काही दिवसांनी तिचे जिवाभावाचे मित्र सई व पुष्करही तिच्यापासून दुरावले. पण या काळात तिला शर्मिष्ठा राऊत या वाईल्ड कार्ड एन्ट्रीने घरात आलेल्या मैत्रीणीची साथ मिळाली. एकीकडे मित्र दुरावल्याचे दुःख, तर दुसरीकडे बिग बॉस जिंकण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या मेघाने काही काळ सगळे बाजूला ठेवून यशावर लक्ष केंद्रित केले व अखेरीस ते ध्येय गाठले. 

मराठी चित्रपटसृष्टीत काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलेल्या मेघा धाडेच्या खऱ्या आयुष्यातही तिला अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले. तसेच चित्रपटसृष्टीपासून दूर जावे लागले. तिच्या करिअरला अवघड वळण मिळाले. मेघाला आयुष्यात सगळ्यात मोठ्या घटनेला सामोरे जावे लागले ती म्हणजे, लहान वयात, लग्नाआधी गरोदर राहिल्यामुळे झालेल्या टीका. परंतु या परिस्थितही न खचता तिने मुलीला वाढवले व उत्तम आयुष्य दिले. त्याचबरोबर स्वतःचे करिअर घडविण्यातही तिने मागे-पुढे पाहिले नाही. तिने काही चित्रपटांची निर्मिती ही केली आहे. दरम्यान आयुष्य मार्गी लागल्यानंतर मेघाने पुन्हा लग्न केले. तिचे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये उपाध्यक्ष आहेत.

चित्रपटसृष्टीतही तितक्या नावारूपास न आलेल्या मेघाला बिगबॉसमुळे वेगळीच कलाटणी मिळाली. बिगबॉसमुळे तिचं नाव घराघरात पोहोचलं. बिगबॉस संपल्यानंतर आता तिचे पुढचे प्लॅन्स काय असतील याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: life of marathi bigg boss winner megha dhade