लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ट्रीओसे प्लाझा येथे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

'लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भारत 2018' चे आयोजन ट्रीओसे प्लाझा यांनी केले असून माधव तोडी हे या महोत्सवाचे संचालक आणि विवेक वासवानी हे या महोत्सवाचे प्रमुख आहेत.

पुणे : विविध चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी तिसरा लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 7 ते 9 सप्टेंबर 2018 दरम्यान लोणावळा येथील ट्रीओसे प्लाझा येथे आयोजित करण्यात येत आहे. अल्ट्रा मीडिया आणि इंटरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुशील कुमार अगरवाल हे या महोत्सवाचे मुख्य आश्रयदाते असून 18 चित्रपट, 2 कुशल चित्रपट निर्मात्यांच्या चर्चासत्रासह 3 कार्यशाळा ही या महोत्सवाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. याचबरोबर भारतीय चित्रपटसृष्टीत बहुमोल योगदान देणारे प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या सहा चित्रपटांचे आणि त्यांच्यावरील लघुपटाचे सादरीकरण होणार आहे.  

'सुजाता, बंदिनी, मधुमती' यांसारखे बिमल रॉय यांचे अभिजात चित्रपट, 'न्यूड, कच्चा लिंबू, डॉ. रखमाबाई' यांसारखे मराठी चित्रपट LIFFI मध्ये दाखविण्यात येतील. दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्याशी त्यांचे लक्षणीय चित्रपट लाईफ इज गुड आणि डॉ. रखमाबाई यांवर संवादात्मक चर्चा होणार आहे. दिग्दर्शक आणि निर्माते विवेक वासवानी प्रसारमाध्यमातील विद्यार्थ्यांसाठी विचारप्रवर्तक कार्यशाळा आयोजित करणार आहेत. खास लोकाग्रहास्तव LIFFI 2016 मध्ये दाखविण्यात आलेला रफ बुक हा त्यांचा चित्रपट यावेळी पुन्हा दाखविण्यात येणार आहे. LGBTवरील 'इव्हिनिंग शॅडोज', 'द जीनियस-रामानुजन' आणि अॅनिमेटेड चित्रपट 'द स्टोलन प्रिन्सेस' अशा विविध तऱ्हेच्या प्रेक्षकांसाठी हे चित्रपट दाखविण्यात येतील.

'लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भारत 2018' चे आयोजन ट्रीओसे प्लाझा यांनी केले असून माधव तोडी हे या महोत्सवाचे संचालक आणि विवेक वासवानी हे या महोत्सवाचे प्रमुख आहेत. महोत्सवाची नांदी म्हणून बिमल रॉय यांच्या चित्रपट पोस्टर, छायाचित्रे, स्मृतीचिन्हे आणि वस्तूंचे प्रदर्शन 1 सप्टेंबर पासून ट्रीओसे प्लाझा येथे सुरु होणार आहे. त्यांच्या कन्येने त्यांच्यावर लिहिलेली/संपादन केलेली पुस्तके येथे विशेष किंमतीत विक्रीस उपलब्ध असणार आहेत.
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lonavla International Film Festival At Triose Plaza Lonavala