कुसूर : उत्कृष्ट नाट्यप्रयोग

amol palekar
amol palekar

नाटकामध्ये गोष्ट असते. गिरीश कार्नाड यांनी तर तसे वेळोवेळी हिरिरीने म्हटले आहे.

पण, गोष्ट सांगण्यासाठी नाटक नसते. तसे तर कादंबरी, काव्य आणि नाटक यांच्याप्रमाणे कथालेखन हादेखील एक स्वतंत्र वाङ्‌मयप्रकार मानला गेला आहेच, तर नाटकामध्ये गोष्टीचे महत्त्व ते किती? आणि गोष्ट म्हटली तरी ती फक्त गोष्टच सांगते, असे थोडेच आहे? इसापच्या गोष्टी गोष्टीपलीकडले आणखी बरेच काही सांगू पाहतात हे आपण जाणतो. तीच गोष्ट पंचतंत्राची. म्हणूनच नाटकामध्ये केवळ एक गोष्ट असते हे काही खरे नाही आणि नाटकामधली गोष्ट सांगू पाहणाऱ्यांची किती तारांबळ उडते तेही आपल्याला माहीत आहे. खानोलकरांच्या नाटकांच्या गोष्टी येतील सांगता? किंवा महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाट्यत्रयीची? 

तर संध्या गोखले यांच्याही ‘कुसूर’ या हिंदी नाटकाची गोष्ट सांगण्याचा किंवा इथे वाचण्याचा आपण प्रयत्न करू नये, हे उत्तम.

आता नाट्यप्रयोगाबद्दल. कोणताही नाट्यप्रयोग सुरू असताना सगळे प्रेक्षक मिळून नाटकाचा अनुभव घेत असतात आणि त्यांना त्याचे काही एक आकलनही होत असते. टाळ्यांचा कडकडाट किंवा प्रेक्षागृहातली प्रगाढ शांतता, हास्याचे फवारे उदाहरणार्थ. पण हेही तितकेच खरे की इतरांसमवेत नाट्यप्रयोग पाहत असताना प्रत्येक प्रेक्षक त्याच वेळी त्याच नाटकाचा त्याचा म्हणून एक स्वतंत्र अनुभव घेत असतो. त्याचा त्या नाटकाशी एका पातळीवर स्वतंत्र संवाद सुरू असतो. त्याच्या नेणीवेतल्या अनेक गोष्टी(!) जाग्या होतात आणि त्याला त्या नाटकाचा खास त्याचाच असा एक स्वतंत्र अनुभव येत राहतो. तो तो प्रेक्षक त्याच्याही नकळत स्वतःला सामोरा जात असतो.

या ना त्या अपराधीपणाची घुसमटविणारी भावना केंव्हातरी आपल्याला झालेली असते. पण आयुष्याच्या धकाधकीत ती भावना क्षीण होत जाते आणि आपण आपले जगत राहतो. ध्यानीमनी नसताना अचानक जुनी जखम भळभळा वाहू लागते. कुठेतरी कोणाजवळ तरी आपण आपला प्रमाद, गुन्हा कबूल करून मन मोकळे करू शकलो तर आणि तरच तोपर्यंत वाहिलेले ओझे उतरते आणि कसे अगदी हलके वाटते. पर्सिवल वाईल्डच्या The Hour of Truth या एकांकिकेमधील जॉन ग्रेहमने नाही का त्याने भ्रष्टाचार केल्याचे कबूल करण्याचे, सत्य सांगण्याचे अखेरीला ठरविले? संध्या गोखले यांनी लिहिलेल्या कुसूरच्या नाट्यप्रयोगामध्ये म्हटले तर या वाटेने एक गोष्ट उलगडत जाते. नाटकातली आणि कदाचित ज्या त्या प्रेक्षकाची.

पण कोणापाशी तरी आपली चूक, आपला गुन्हा कबूल केल्याने व्यक्तीच्या मनावरचे ओझे हलके झाल्याच्या क्षणाची तीव्रता जाणवायची तर आधी त्या व्यक्तीच्या हातून भूतकाळात घडलेल्या प्रमादाची त्याच्या मनातली सल क्रमाक्रमाने तीव्र होत जाऊन ती असह्य झाल्याच्या निदान खुणातरी प्रेक्षकांसाठी नाटकामध्ये असायला पाहिजेत.

एका घटनेचे निमित्त होऊन स्वतःचा गुन्हा कबूल केल्याक्षणी मनावरचे मणामणाचे ओझे उतरल्याने कोणा व्यक्तीला होणारा परमानंद आपल्याला जाणवायचा तर त्या व्यक्तीने त्या आधी जे काही सोसले असेल त्याची काहीतरी कल्पना आपल्याला असायला हवी. परिणाम जितका महत्त्वाचा, तितकीच प्रक्रियाही महत्त्वाची. कसूरमध्ये ती प्रक्रिया येत नाही. म्हणूनच ते घनदाट होत नाही.   

रंगमंचावर दिसतात एका खोलीच्या दोन भिंती, एकमेकींना रंगमंचाच्या मध्यभागी कोन करून उभ्या असलेल्या. बेताचे आकारमान असलेल्या त्या काहीशा अंधाऱ्या खोलीमध्ये नजरेत भरते मोठे टेबल आणि त्यावर ठेवलेले पाच सहा टेलिफोन्स. बाहेरून जसजसे एकसारखे फोन येत राहतात, तसतसे तिथले लाल दिवे उघडझाप करीत राहतात. वृद्धपणाकडे झुकलेली एक व्यक्ती एकापाठोपाठ एक फोन घेत आहे. पलीकडच्या व्यक्तीचे बोलणे काळजीपूर्वक ऐकून लगेचच दुसऱ्या फोनवरून कोणाकोणा सहकाऱ्यांना सूचना देत आहे. टेलिफोनवरच्या संभाषणातून उलगडत जातात कौटुंबिक नातेसंबंधातले अटळपणे निर्माण झालेले ताणतणाव. या वातावरणाशी विरोध साधतो खोलीबाहेरचा अफाट अवकाश. रंगमंचावर वरच्या बाजूला असलेल्या झालरी काढून उंचावरून पाच सहा पडदे जमिनीच्या दिशेने सोडलेले नजरेत भरत होते. ते सगळे मिळून बाहेरच्या अक्राळविक्राळ जगाची कल्पना देऊ पाहत होते. अर्थात अमूर्त शैलीतल्या चित्राप्रमाणे त्याबद्दलचे प्रत्येकाचे आकलन वेगळे असू शकते.

नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन आणि त्या वृद्ध व्यक्तीची भूमिका अमोल पालेकर यांनी केली. दोन दशकांपेक्षाही अधिक काळानंतर ते रंगभूमीवर नट म्हणून येताहेत, यावर विश्‍वास बसणार नाही इतक्‍या सफाईदारपणे त्यांनी भूमिका साकारली. नखशिखांत अभिनयामधून संपूर्ण व्यक्तीरेखा त्यांनी उभी केली. त्यामध्ये त्या व्यक्तीचे विशिष्ट सवयीचे चालणे, संथपणे कॉफी तयार करणे होते. दोन हातात मग घट्ट पकडून कॉफीचे हळूहळू घोट घेणे, मानसिक थकवा आल्यानंतर खुर्चीतच डोळे मिटून मान मागे झुकवून विश्रांतीचा प्रयत्न करणे होते. दोन्ही खांदे मागच्या बाजूला ताणून उभ्या उभ्या व्यायाम करणे होते, टेलीफोन घेतानाची वृद्धाची लगबग होती, आणि केंव्हातरी जसे डाफरणे होते, धीरही देणे होते, तसेच टेबलावर एक गाल विसावून ढसढसा रडणेही होते. असे सगळे आणि आणखी खूप काही अमोल पालेकर यांनी अंतराअंतराने पुरवून पुरवून केले यामध्ये त्या अभिनयाचे सौंदर्य होते.

तसे म्हटले तर कुसूर हा एकपात्री प्रयोग म्हणता येईल. पण ते खरे नाही. स्तानिस्लावस्कीने केव्हाच सांगून ठेवले आहे की ‘roles are never small; actors are small!’ कुसूरच्या प्रयोगामध्ये ज्यांनी पूरक भूमिका स्वीकारल्या त्या नरेश सूरी, सिद्धेश धुरी, अश्‍विनी परांजपे, प्रीत माथूर ठाकूर, आशिष मेहता आणि नील पाटकर यांचा इथे उल्लेख करायलाच हवा. त्यातही नरेश सूरी यांचा दर्दभरा आवाज आणि सहजाभिनय लक्ष वेधणारा होता. 

संध्या गोखले यांनी लिहिलेल्या नाटकाबद्दल काहीसे असमाधान असले तरी नेपथ्य संकल्पना, वेशभूषा रचना आणि निर्मिती संकल्पना व सहदिग्दर्शन- अशी मोठीच जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली याचीही स्वतंत्र दखल घेऊ या. आयुष्यातले श्रेयस्‌ म्हणून काही असेल तर ते मिळाल्याच्या समाधानात ती वृद्ध व्यक्ती नाटकाअखेरी त्या खोलीमधून निघून बाहेरच्या नेहमीच्या जगात जाते. वाटत होते, अमोल पालेकर जसे विंगेच्या आत असलेल्या बाहेरच्या जगातून या लहानशा खोलीमध्ये आले, तसे नाटक संपताना ते आता विंगेमध्ये म्हणजे बाहेरच्या जगामध्ये जातील. पण तसे न करता, पालेकर बालगंधर्व रंगमंचाच्या पायऱ्या उतरून थेट प्रेक्षागृहामध्ये आले आणि प्रेक्षकांमधून ते मागील दाराकडे संथपणे गेले. 

अशा परिणामकारक ठरू पाहणाऱ्या निर्गमनाची ‘एक्‍झिट’ची आवश्‍यकता नव्हती. आणि प्रेक्षागृहाच्या मागच्या दारापाशी पालेकर गेल्यानंतर इतर कलाकार व सहायक रंगमंचावर येत असताना, पालेकरांनी यू टर्न करून आता पालेकर म्हणून पुन्हा प्रेक्षकांमधून त्यांचे अभिवादन स्वीकारत रंगमंचावर जावे हे तर फारच परिणामकारक ठरू पाहणारे झाले.

माधव वझे 
vazemadhav@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com