आम्हाला आधी दाखवा मगच परवानगी: काॅंग्रेसचा इशारा

Congress Demands special screening of The Accidental Prime Minister
Congress Demands special screening of The Accidental Prime Minister

मुंबई : 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'वरून देशभरात विविध चर्चा झडत असताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित 'द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या आगामी चित्रपटाविरोधात काँग्रेसनेच दंड थोपटले आहेत.

अनुपम खेर अभिनित या चित्रपटाचा ट्रेलर आज झळकला. त्यानंतर लगेचच 'आम्हाला प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट दाखवा' अशी मागणी महाराष्ट्रातील युवक काँग्रेसने केली आहे. 

'आम्हाला हा चित्रपट प्रदर्शनाआधीच दाखवावा. त्यातील आक्षेपार्ह भाग वगळावा. या दोन गोष्टी न करता निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित केल्यास ते जाणूनबुजून आमच्या भावना दुखावत आहेत, असे समजले जाईल. असे केल्यास देशभरात या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी इतर मार्ग अवलंबिले जातील आणि त्यासाठी चित्रपटाची टीमच जबाबदार असेल', असा इशारा देण्यात आला आहे.

'सत्य घटनांची मोडतोड केली गेली आहे, असे या चित्रपटाचा ट्रेलर पाहून लक्षात येत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे चित्रिकरण त्यांची प्रतिमा मलीन करणारे आहे.' 

दहा वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषविणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीवर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्याही व्यक्तिरेखा आहेत. हा चित्रपट 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 

चित्रपटाचा ट्रेलर झळकल्यानंतर महाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे सत्यजित तांबे यांनी पत्रक काढून भूमिका स्पष्ट केली. 'सत्य घटनांची मोडतोड केली गेली आहे, असे या चित्रपटाचा ट्रेलर पाहून लक्षात येत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे चित्रिकरण त्यांची प्रतिमा मलीन करणारे आहे. काँग्रेस पक्षाला हे कदापि मान्य होणार नाही', असे या पत्रकात म्हटले आहे. 

'कुठल्याही वेब सीरिजमधील चित्रिकरणामुळे सत्य बदलणार नाही. मालिकेतील काल्पनिक पात्राच्या विचारांमुळे सत्य बदलू शकत नाही'

'युवक काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने मी विनंती करतो, की प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दाखविला जावा. या चित्रपटात कोणताही असत्य भाग किंवा कथा असल्यास तो भाग चित्रपटातून वगळला जावा. आम्ही चित्रपट पाहिल्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेऊ शकतो', असेही त्यात नमूद केले आहे. 

विशेष म्हणजे, यापूर्वीच्या काही चित्रपटांसंदर्भातील वादांमध्ये भाजपवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपल्याचे आरोप काँग्रेसने केले होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आधारित एका वेब सीरिजसंदर्भातही अशाच प्रकारचे वाद निर्माण झाले होते. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत अशा चित्रपट किंवा मालिकांना महत्त्व देत नसल्याचे सांगितले होते. 'माझे वडील या देशासाठी जगले आणि देशासाठीच मरण पत्करले. कुठल्याही वेब सीरिजमधील त्यांच्या चित्रिकरणामुळे सत्य बदलणार नाही. मालिकेतील काल्पनिक पात्राच्या विचारांमुळे सत्य बदलू शकत नाही', असे राहुल गांधी म्हणाले होते. 

दिग्दर्शक मधुर भांडारकर 'इंदू सरकार' या चित्रपटावरही काँग्रेसने यापूर्वी आक्षेप घेतला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधामुळे भांडारकर यांना पुण्यासह काही शहरांमधील कार्यक्रम रद्दही करावे लागले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com