
Prasad Khandekar: केईएम रुग्णालयात तीन महिने उपचार अन्.. प्रसाद खांडेकरने सांगितला ‘तो’ प्रसंग..
Prasad Khandekar: महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद आणि नम्रता संभेराव (Namrata Sambherao) या दोघांची जोडी महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मध्ये हिट आहे.
प्रसादची केवळ अभिनय करत नाही तर तो उत्तम लेखक आहे. त्यांचे 'कुर्रर्रर' हे विनोदी नाटक सध्या जोरदार सुरू आहे. या शिवाय प्रसाद 'एकदा येऊन तर बघा…रिटर्न जाणारच नाही’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.
प्रसाद साठी इथपर्यंतचा प्रवास फार अवघड होता. त्याने खूप स्ट्रगल केला आहे. त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे त्याचे पूर्ण आयुष्य बदलले. त्याच घटनेविषयी प्रसादने एका मुलाखतीत सांगितले आहे.
(maharashtrachi hasyajatra fem prasad khandekar talks about career journey cricket accident)
प्रसाद आपल्या स्ट्रगल विषयी एका मुलाखतीत म्हणाला की, 'माझ्या वडिलांना नाटकांची प्रचंड आवड होती. मीही वडिलांसोबत नाटक पाहण्यासाठी जायचो. तिथूनच मला या क्षेत्राची ओढ निर्माण झाली..
पुढे तो म्हणाला, 'खरं तर मी क्रिकेटपटू होतो. मुंबईमधून अंडर १४साठी माझी निवड झाली होती. इयत्ता दहावीनंतर माझा एक मोठा अपघात झाला. त्यानंतर सगळंच थांबलं. जवळपास तीन महिने केईएम रुग्णालयामध्ये माझ्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर माझ्या आयुष्याला बरंच वळण मिळालं'
'त्यानंतर मी माझ्या वडिलांबरोबर भरत जाधवचं 'श्रीमंत दामोदर पंत'हे नाटक बघायला गेलो होतो. त्यावेळी मला असं वाटलं की हे क्रिकेट सारखंच आहे. इथे तुम्ही करत असलेल्या कामाची तुम्हाला समोरासमोर पोचपावती मिळते.'
प्रसाद म्हणाला, 'बाबांनाही नाटकाची आवड होती. माझ्या कुटुंबामधून कोणीही या क्षेत्रामध्ये नाही. पण या क्षेत्राबाबत मला आवड होती. कांदिवलीच्या ठाकुर महाविद्यालयामध्ये मी शिक्षण घेत होतो. या महाविद्यालयामध्ये एकांकीका वगैरे हा प्रकार काहीच नव्हता.
'ठाकुर महाविद्यालयामध्ये फार कमी मराठी मुलं होती. मग मीच १० ते १५ मुलं जमा केली. आम्ही सगळ्यांनी मिळून मराठी कलामंच नावाचा ग्रुप तयार केला. या ग्रुप अंतर्गत मी एकांकीका करू लागलो. इथूनच माझ्या अभिनयक्षेत्राला सुरुवात झाली. ‘आम्ही पाचपुते’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं.' अशा शब्दात प्रसादने क्रिकेटर ते कलाकार हा अनुभव सांगितला.