esakal | ऑन स्क्रीन : हसीन दिलरुबा : तर्कहिन कथा; रहस्यही रटाळवाणं
sakal

बोलून बातमी शोधा

Haseen Dilruba Movie

ऑन स्क्रीन : हसीन दिलरुबा : तर्कहिन कथा; रहस्यही रटाळवाणं

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

पती-पत्नीमधील बेबनाव, त्यातून निर्माण झालेला तिसरा कोन आणि त्यातून अपरिहार्यपणे तयार होणारी मर्डर मिस्ट्री हा कथाप्रकार चित्रपटसृष्टीला नवा नाही. व्हिनिल मॅथ्यू दिग्दर्शक ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट यात अंगानं जात असला, तरी त्यासाठी निवडलेली पटकथा भयंकर वाईट आहे. त्याच्या जोडीला संकलन, अभिनय आणि संगीत या आघाड्यांवरही हा चित्रपट मार खात असल्यानं दोन तासांपेक्षा अधिक लांबी असलेला हा ‘नेटफ्लिक्स’वरील चित्रपट अंत पाहतो. (Mahesh Badrapurkar Writes about Haseen Dilruba Movie Entertainment)

हसीन दिलरुबाची कथा एका छोट्या गावात (अर्थातच दिग्दर्शकांच्या लाडक्या उत्तर प्रदेशातील) सुरू होते. राणी कश्यप (तापसी पन्नू) ही लग्नाकडून खूप मोठ्या अपेक्षा असलेल्या मुलीचं लग्न तुलनेनं अगदीच पापभीरू, आईच्या ताटाखालचं मांजर असलेल्या ऋषभबरोबर (विक्रांत मेस्सी) होतं. राणीचे रंगढंग पाहून पहिल्या दिवसापासूनच ऋषभच्या आईबरोबर व नंतर त्याच्याबरोबरही तिचे खटके उडू लागतात. राणीच्या संसारातला रस पूर्णपणे संपतो व ऋषभही हे मान्य करून स्वतःला ऑफिसच्या कामात गुंतवून टाकतो. याच काळात ऋषभचा मावसभाऊ नील (हर्षवर्धन राणे) काही दिवसांसाठी या घरात राहायला येतो. बिनधास्त, देखणा, अॅडव्हेंचर टुरिझमचा व्यवसाय करणारा नील राणीला भावतो आणि त्यातून एक जीवघेणी कथा जन्माला येते व अनेक ट्विस्टसह संपते.

लव्ह, लस्ट आणि क्राईमच्या अंगानं जाणाऱ्या अशा कथांमध्ये नावीन्य आणणं लेखक व दिग्दर्शकाचं काम असतं. मात्र, लग्नाच्या प्रसंगापासून राणी व ऋषभमधील बेवनावापर्यंतचा भाग अत्यंत सैल, समोर नक्की काय चाललंय याबद्दल प्रेक्षकांच्या मनात संभ्रम करणारा झाला आहे. नीलच्या एन्ट्रीनंतर कथा वेग पकडते, मात्र कथेमध्ये ट्विस्टऐवजी गोंधळच माजतो. यामध्ये राणीच्या पात्राचं लिखाण ही मूळ समस्या आहे. ‘मला त्या क्षणी गरज वाटली म्हणून मी तशी वागले, आता मला पश्चात्ताप होतोय म्हणून मी अशी वागतेय,’ हा या पात्राचा टोन पटणारा नाही. मध्यंतरानंतर कथेतला गोंधळ अधिकच वाढत जातो. त्यात पोलिस इन्स्पेक्टर किशोर रावत (आदित्य श्रीवास्तव) या प्रकरणाच्या करीत असलेला तपासाचे प्रसंग तर थेट लाज आणतात. या सर्वांचा परिपाक म्‍हणजे काहीसे ट्विस्ट असलेला शेवटही रटाळ होऊन जातो.

तापसी पन्नूकडून ‘पिंक’ व ‘थप्पड’सारख्या चित्रपटांमधून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या, मात्र ती गेल्या काही चित्रपटांतील तुकडे सादर करीत, अत्यंत गोंधळलेल्या स्थितीत वावरली आहे. अभिनयात कुठंही एकसंधता नसल्यानं ही भूमिका फसली आहे. विक्रांत मेस्सीला चांगली संधी आहे, मात्र त्याच्या पात्राचं लिखाणही गोंधळात टाकणारी असल्यानं त्याचाही प्रभाव पडत नाही. हर्षवर्धन राणे थोडा भाव खाऊन जातो.

loading image