ऑन स्क्रीन : ख्रिस्तोफर : एन्काउंटर्सचा भडक सूडपट

महिलांसंबंधी गुन्हे केलेली समोरची व्यक्ती दोषी आढळल्यास तिथंच एन्काउंटर करण्यासाठी प्रसिद्ध असलेला पोलिस अधिकारी ख्रिस्तोफर ॲन्टोनी (मामूट्टी) बलात्कार प्रकरणातील दोषींचा खातमा केल्यानं निलंबित झाला आहे.
christopher movie
christopher moviesakal
Summary

महिलांसंबंधी गुन्हे केलेली समोरची व्यक्ती दोषी आढळल्यास तिथंच एन्काउंटर करण्यासाठी प्रसिद्ध असलेला पोलिस अधिकारी ख्रिस्तोफर ॲन्टोनी (मामूट्टी) बलात्कार प्रकरणातील दोषींचा खातमा केल्यानं निलंबित झाला आहे.

कर्तव्यदक्ष पोलिसाच्या आयुष्याची कहाणी सांगणारे चित्रपट ढिगानं पाहायला मिळतात. मामुटीसारखा कसलेला कलाकार आणि बी. उन्नीकृष्णनसारखा नावाजलेला दिग्दर्शक याच विषयावर ‘ख्रिस्तोफर’सारखा ॲक्शनपट घेऊन येतात, तेव्हा त्याबद्दल उत्सुकता नक्कीच असते. ‘निर्भया’सारख्या प्रकरणानंतर महिलांना न्याय व तोही वेळेत मिळावा, यासाठी आग्रह वाढला आणि तो तशाप्रकारे देण्याच्या घटनाही देशात घडल्या. ख्रिस्तोफर अशाच एका पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट सांगतो, मात्र अत्यंत ढिसाळ पटकथा, अंगावर येणारे अत्याचारांचे प्रसंग, कर्णकर्कश संगीत यांमुळं चित्रपट डोकेदुखीच ठरतो.

महिलांसंबंधी गुन्हे केलेली समोरची व्यक्ती दोषी आढळल्यास तिथंच एन्काउंटर करण्यासाठी प्रसिद्ध असलेला पोलिस अधिकारी ख्रिस्तोफर ॲन्टोनी (मामूट्टी) बलात्कार प्रकरणातील दोषींचा खातमा केल्यानं निलंबित झाला आहे. तपास अधिकारी सुलेखाकडं (अमला पॉल) या चौकशीची सूत्रं असतात आणि ख्रिस्तोफरनं आजपर्यंत अनेक एन्काउंटर केल्याची माहिती आपल्याला (सचित्र) दाखवली जाते. त्रिमूर्ती (विनय राय) हा उद्योगपती कायदा हातात घेऊन महिलांवर अत्याचार करीत असतो आणि ख्रिस्तोफरचं पुढचं लक्ष्य तोच असल्यानं सुलेखा सावध असते. अमिना (ऐश्‍वर्या लक्ष्मी) ही ख्रिस्तोफरची दत्तक कन्या गायब होते आणि कथा मोठं वळण घेते. निलंबित असलेला ख्रिस्तोफर आपल्या पद्धतीनं या प्रकरणाचा तपास सुरू करतो. तिच्या निर्घृण हत्येमागं कोण आहे, याचे धागेदोरे तो शोधतो व बदला पूर्ण करतो.

महिलांवरील अत्याचार हा कथेचा गाभा असला, तरी चित्रपटातील सर्व प्रसंग अत्यंत भडक पद्धतीनं मांडण्यात आले आहेत. (कदाचित ख्रिस्तोफरच्या एन्काउंटरच्या समर्थनासाठी ही पद्धत लेखक-दिग्दर्शकानं अवलंबली असावी.) बालपणी सहन केलेला एक प्रसंग आणि त्यावेळी पोलिसांनी एन्काउंटरमधून दिलेल्या न्यायामुळं ख्रिस्तोफरची मानसिकता तशी झाल्याचं दिग्दर्शक दाखवण्याचा प्रयत्न करतो, मात्र एकाही प्रकरणाची चौकशी न करू देता गुडांना मारत फिरणं जरा अती होतं. याचं समर्थन तपास अधिकाऱ्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच जण करताना दिसतात, हे विशेष. मात्र, स्वतःच्या मुलीवरच अन्याय झाल्यानंतरचं ख्रिस्तोफरचं पेटून उठणं आणि आपलं कसब पणाला लावून गुन्हेगारापर्यंत पोचणं, त्याला शिक्षा देणं हा भाग त्यातल्या त्यात सुसह्य म्हणावा असा. चित्रपटातील संवाद कथेला पूरक आहेत आणि ते मजाही आणतात. खलनायक ‘मी त्रिमूर्ती आहे,’ असं म्हटल्यानंतर नायक ‘मी संहारमूर्ती आहे,’ असं ठणकावतो. असे संवाद कथा टोकदार बनवतात. मात्र, पार्श्‍वभूमीला अत्यंत कर्णकर्कश संगीताची जोड दिल्यानं अनेकदा रसभंग होतो. चित्रपटाचा शेवट जमून आला आहे.

मामूट्टीचा अशा प्रकारच्या भूमिका साकारण्यात हातखंडा आहे. थंड डोक्यानं आणि चेहऱ्यावर फारसे हावभाव न दाखवता एन्काउंटर करणारा अधिकारी त्यानं छान उभा केला आहे. विनय रॉय खलनायकाच्या भूमिकेत त्याच्या बलदंड शरीरयष्टीमुळं शोभून दिसतो. मात्र, मामूट्टी व त्याच्यातील अभिनयाची जुगलबंदी फारशी रंगत नाही. अमला पॉल, ऐश्‍वर्य लक्ष्मी या अभिनेत्रींच्या भूमिका त्रोटक. एकंदरीतच, एन्काउंटर्सचा हा भडक सूडपट कमकुवत पटकथेमुळं फसला आहे. हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com