
फारसं नावीन्य नसलेली ‘फर्जी’ ही वेब सिरीज ‘फॅमिली मॅन’मुळं चर्चेत आलेली दिग्दर्शक जोडी राज आणि डीके घेऊन आली आहे.
ऑन स्क्रीन : फर्जी : चुकीच्या ‘स्ट्रोक’नं फसलेली कथा!
बनावट नोटा, त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा दुष्परिणाम व ती समांतर व्यवस्था मोडून काढण्यासाठीचे प्रयत्न या विषयावरची, फारसं नावीन्य नसलेली ‘फर्जी’ ही वेब सिरीज ‘फॅमिली मॅन’मुळं चर्चेत आलेली दिग्दर्शक जोडी राज आणि डीके घेऊन आली आहे. कथेत थरार, ट्विस्ट आणि उत्सुकता असली, तरी ती अगदीच तोंडी लावण्यापुरती आहे. छोटा जीव असून आठ भागांपर्यंत ताणलेले कथानक, शाहीद कपूर आणि विजय सेतूपती या लोकप्रिय नायकांचा पुरेपूर वापर करून घेण्यात आलेले अपयश, ‘फॅमिली मॅन’ची कॉपी करताना उडालेला गोंधळ आणि उरकलेला शेवट यांमुळं पुरेसं समाधान करण्यात अयशस्वी ठरते.
‘फर्जी’ची कथा आहे सनी (शाहीद कपूर) या कलाकाराची. तो गाजलेल्या चित्रांची कॉपी करीत उदरनिर्वाह करतो व आजोबा माधव (अमोल पालेकर) यांच्याबरोबर राहतो आहे. माधव ‘क्रांती पत्रिका’ नावाचे साप्ताहिक चालवतात, मात्र त्यांच्यावरचा कर्जाचा डोंगरही वाढतो आहे. सनी काहीही करून या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या विचारात असतो. त्याचा बालपणीचा मित्र फिरोज (भुवन अरोरा) याचा त्याला पाठिंबा असतो. आजोबांना कर्जातून बाहेर काढण्यासाठी सनी बनावट नोटा बनवतो व त्या बाजारात चालवू पाहतो. दुसरीकडं, मायकेल (विजय सेतूपती) हा स्पेशल टास्क फोर्सचा अधिकारी गॅंगस्टर मन्सूर दलाल (के के मेनन) याच्या मागावर असतो.
आपल्या कलेतून हुबेहूब नोटा बनवणारा सनी व मन्सूरची भेट होते आणि सनीचं नशीब पालटतं. मायकेल आणि सनीचा पाठशिवणीचा खेळ सुरू होतो. मायकलच्या टीममधील मेघाला (राशी खन्ना) ट्रॅप करून गुप्तहेर खात्याच्या हालचालींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सनी करतो. सनीची महत्त्वाकांक्षा वाढतच जाते. ही महत्त्वाकांक्षा त्याला कोठपर्यंत घेऊन जाते, आजोबांना त्याच्या व्यवसायाबद्दल समजतं का, मायकेल आणि सनीमधील युद्धात कोण बाजी मारतं, मन्सूरचं काय होतं अशा प्रश्नांची उत्तरं कथेच्या ओघात मिळतात.
कथेत बनावट नोटांच्या माध्यमातून होणारा अर्थव्यवस्थेवरील आघात व दहशतवादावर दिग्दर्शक भाष्य करू पाहतो. याला नोटाबंदीचा संदर्भही देतो. मात्र, बनावट नोटा कशा बनतात, त्याला कोणता कागद लागतो, शाई कोणती वापरतात, ती ओळखू येऊ नये म्हणून काय करतात याचं अतिशय विस्तारानं चित्रण कथेत येतं. (अगदी तुमचा अभ्यासच घेतला जातो म्हणा ना!) मायकेलच्या पात्राला ‘फॅमिली मॅन’च्या अंगानं रंगवताना झालेला गोंधळ कथेला अधिक पातळ करतो. ट्विस्टही अभावानं येतात. काही प्रसंगांत थरार निर्माण करण्यात दिग्दर्शकाला यश येतं, मात्र तेवढ्यापुरतंच. दुसऱ्या भागाची तयारी करीत करण्यात आलेला शेवटही उत्कंठा निर्माण करीत नाही.
शाहीद कपूर आणि विजय सेतूपती या स्टार्सची जुगलबंदी पाहायला मिळंल, ही अपेक्षा पूर्ण होत नाही. शाहीद नेहमीच्या सफाईनं सनी उभा करतो. त्याच्या देहबोलीतील जोष, संवादफेक, विनोद खिळवून ठेवतात. विजय सेतूपतीनं साकारलेला मायकेल तिथल्या तिथं फिरत राहतो. त्याची तमीळमिश्रित हिंदी समजायला कठीण जाते. के के मेनन, भुवन अरोरा, राशी खन्ना, अमोल पालेकर यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. एखादी कलाकृती मास्टरपीस होणं आणि फसणं यात एका स्ट्रोकचा फरक असतो, असं सनीचे आजोबा कथेच्या ओघात त्याला सांगतात. दिग्दर्शकानं असाच चुकीचा ‘स्ट्रोक’ दिल्यानं वेब सिरीज फसली आहे...