ऑन स्क्रीन : माई : ‘बदल्या’च्या फॉर्म्युल्याला पटकथा, अभिनयाचं कोंदण!

मुलीच्या निर्घृण हत्येचा आईनं घेतलेला बदला, ही कथा येत्या चार-पाच वर्षांतच आपण मोठ्या आणि छोट्या पडद्यावर अनेकदा पाहिली आहे.
Mai Movie
Mai MovieSakal
Summary

मुलीच्या निर्घृण हत्येचा आईनं घेतलेला बदला, ही कथा येत्या चार-पाच वर्षांतच आपण मोठ्या आणि छोट्या पडद्यावर अनेकदा पाहिली आहे.

मुलीच्या निर्घृण हत्येचा आईनं घेतलेला बदला, ही कथा येत्या चार-पाच वर्षांतच आपण मोठ्या आणि छोट्या पडद्यावर अनेकदा पाहिली आहे. ‘नेटफ्लिक्स’वरील ‘माई’ या अंशई लाल व अतुल मोंगिया दिग्दर्शित बेवसीरिजचं कथाबीज हेच असलं, तरी या बदल्याचे उलगडून दाखवलेले अनेक पैलू, बदल्यामागचा मानवी चेहरा दाखवताना त्यात भरलेले गहरे रंग आणि साक्षी तन्वीरचा जबरदस्त अभिनय यांच्या जोरावर ही सीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे.

‘माई’ची कथा लखनौ शहरात घडते. शील चौधरी (साक्षी तन्वीर) ही परिचारिका आहे, तर तिचा पती यश (विवेक मुश्रन) छोटे-मोठे व्यवसाय करतो. त्यांची मुलगी सुप्रिया मूक आहे व ती वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करीत असते. स्वतःवर चिडलेल्या व काही सांगू इच्छिणाऱ्या सुप्रियाचा शीलसमोरच एका अपघातात मृत्यू होतो. पोलिस याला सामान्य अपघात म्हणून सोडून देतात, मात्र शीलला यामागं काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय येतो. ती सुप्रियाच्या मृत्युमागचं कारण शोधण्यासाठी बाहेर पडते. जवाहर व्यास (प्रशांत नारायण) व त्याची पत्नी नीलम (रायमा सेन) या शिक्षण संस्था चालवणाऱ्या जोडप्याबद्दल तिला प्रथम संशय येतो. त्यांचा माग घेत रघू (सौरभ दुबे) या युवकापाशी येऊन पोचते. आपल्या परिचारिकेच्या प्रशिक्षणाचा फायदा घेत शील एकेकाला यमसदनास पाठवण्यास सुरवात करते. कल्पना (सीमा पाहवा) ही रुग्णवाहिकेची चालक तिला या कामी मदत करते. शीलचा बदला पूर्ण होतो आहे, असं वाटत असतानाच आणखी काही जणांवर तिचा संशय बळावतो आणि खूनांची ही मालिका सुरूच राहते...

वेबसीरिजची कथा टिपिकल असल्याचं तुम्हाला कथासार वाचून नक्कीच वाटलं असणार आणि ती तशी आहेही. तरीही ती गुंतवून ठेवण्यामागं सिरीजच्या पटकथेचा मोठा वाटा आहे. ही कथा सांगताना प्रत्येक खलप्रवृत्तीमागची मानसिकता, त्यांचं आपल्या मतावर ठाम असणं यांचा अत्यंत नेमका उपयोग केला गेला आहे. व्हाइट कॉलर क्राईम अधिक निर्घृण असतो व त्यामागं डोक्याचा वापर केल्यानं तो शोधणं कसं कठीण जातं याचं चित्रण दमदार झालं आहे. अर्थात, कथेत फारसे ट्विस्ट नाहीत व आहेत तेही समजण्यास अत्यंत सोपे आहेत. विशेषतः मोहनदास या पात्राचा प्रवेश फारच फिल्मी आहे. या पात्राचा उपयोग कथा फुलवण्यासाठी चांगला केला गेला असला, तरी त्यामुळं कथा पातळही होते. कथेचा शेवट दुसऱ्या भागाची तयारी करणारा आहे व पहिल्या भागाचा नेमका शेवट न झाल्यानं कथा अधांतरीच राहिली आहे. मात्र, हे थरारक कथानक आणि त्यातील प्रत्येक प्रसंगानं छाप सोपडल्यानं दुसऱ्या भागाबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे.

साक्षी तन्वर या अभिनेत्रीला आपण छोट्या पडद्यावर अनेक वर्षं पाहतो आहोत. साधारणपणे मध्यमवर्गीय, सोज्वळ स्त्री रंगवणाऱ्या साक्षीच्या वाट्याला आलेली ही भूमिका खूपच आव्हानात्मक आहे. तिनं अनेक छोटे प्रसंग जिवंत करीत कथेला मोठ्या उंचीवर नेले आहे. आपल्या मृत कन्येच्या आवडीचं आइस्क्रीम खातानाचा तिचा चेहरा किंवा खलनायकाला धडा शिकवल्यानंतर थंड चेहऱ्यानं घरात येत नवऱ्याला घरी उशिरा येण्यामागचं (खोटं) कारण सांगतानाचे भाव हेलावून टाकतात. प्रशांत नारायण दुहेरी भूमिकेत भाव खाऊन जातो. रायमा सेननं साकारलेली ग्लॅमरस नीलमही छान. सीमा पाहवा, सौरभ दुबे यांनी आपापल्या भूमिका छान वठवल्या आहेत. एकंदरीतच, पारंपरिक बदल्याच्या कथेला दिलेलं पटकथा व अभिनयाचं कोंदण जमून आल्यानं ही वेबसीरिज पाहणं लक्षात राहणारा अनुभव ठरतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com