ऑन स्क्रीन : पुझू : जातीय संघर्षावरचा ‘थ्रिलर’

पुझूची कथा कुट्टन (मामूट्टी) या पोलिस अधिकाऱ्याची. त्याला आपण उच्च जातीतील, ब्राह्मण समाजातील असल्याचा मोठा अभिमान आहे व आपल्या कारकिर्दीत त्यानं या अभिमानाच्या जोरावर अनेकांवर अन्याय केला आहे.
puzhu movie
puzhu moviesakal
Summary

पुझूची कथा कुट्टन (मामूट्टी) या पोलिस अधिकाऱ्याची. त्याला आपण उच्च जातीतील, ब्राह्मण समाजातील असल्याचा मोठा अभिमान आहे व आपल्या कारकिर्दीत त्यानं या अभिमानाच्या जोरावर अनेकांवर अन्याय केला आहे.

दक्षिणेतील सिनेमा जात-पात, विशेषतः दलितांवर होणारे अन्याय व अत्याचार, त्यांनी सवर्णांविरोधात दिलेला लढा यांबद्दल थेट बोलतो. अगदी जातीचे उल्लेख आणि अत्याचारांच्या थेट दृश्यांसह भाष्य करतो. राथिना हा नवोदित दिग्दर्शक ‘पुझू’ (मराठीत अर्थ गांडूळ) या चित्रपटातून हाच विषय अगदी वेगळं कथानक घेऊन मांडतो, तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. मामूट्टी व पार्वती या मल्याळम चित्रपटांतील आघाडीच्या कलाकारांचा देखणा अभिनय, पटकथा, थ्रिलरच्या अंगानं केलेली कथेची मांडणी व संगीतामुळं प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.

पुझूची कथा कुट्टन (मामूट्टी) या पोलिस अधिकाऱ्याची. त्याला आपण उच्च जातीतील, ब्राह्मण समाजातील असल्याचा मोठा अभिमान आहे व आपल्या कारकिर्दीत त्यानं या अभिमानाच्या जोरावर अनेकांवर अन्याय केला आहे. नोकरीमुळं त्याला समोरच्या प्रत्येकावर संशय घेण्याची सवय असते व ती घरात असतानाही बदलत नाही. त्याच्या पत्नीचं निधन झालं आहे व किच्चू या छोट्या मुलाला तो एकटाच सांभाळतो आहे. आपल्या पत्नीचा मुलाबरोबर काढलेला शेवटचा व्हिडिओ रोज झोपण्याच्या आधी एकत्र पाहण्याचा त्याचा शिकस्ता आहे. वडिलांच्या कटकटीमुळं किच्चू चिडलेला आहे व त्याला वडील आपल्याजवळ राहू नयेत, असं वाटतं. कुट्टनची आजारी आई दुसऱ्या ठिकाणी राहते आहे, तर बहीण भारतीनं (पार्वती) एका खालच्या जातीतील कलाकार व्यक्तीशी लग्न केल्यानं त्यानं बहिणीशी संबंध तोडले आहेत. आपल्या भावाशी संबंध सुधारावेत म्हणून ती पतीसह कुट्टनच्या अपार्टमेंटमध्ये राहायला आली आहे.

कुट्टनला आपल्याला कोणीतरी मारून टाकण्याचा प्रयत्न करते आहे, अशी शंका आहे. आपल्या कारकीर्दीत केवळ खालच्या जातीतील असल्यानं त्यानं अनेकांवर अत्याचार केले आहेत व तो अशाच काही जणांवर संशय घेतो. त्यातील शिक्षा भोगून आलेल्या एकाला तूच मला मारायचा प्रयत्न करीत असशील,’ असं म्हणून त्रास देत राहतो. मात्र, कुट्टनवर होणारे हल्ले काही थांबत नाहीत. त्याचा संशय भारती व तिच्या नवऱ्यावरही असतो व त्यामुळं तो अत्यंत भयंकर पाऊल उचलतो. आपल्या मुलावरही संशय घेत राहतो...शेवटी या प्रयत्नांमागचा सूत्रधार त्याला गवसतो, मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

चित्रपटाच्या कथेत महाभारतातील परीक्षित या पात्राचा संदर्भ घेण्यात आल्याचा उल्लेख कथेच्या शेवटी होतो. मात्र, आपल्या जातीचा वृथा अभिमान बाळगून दलितांवर अन्याय करणारे समाजात सर्वत्र दिसतातच. मात्र, ही कथा मांडताना दिग्दर्शकानं (कदाचित पहिलाच प्रयत्न असल्यानं) प्रत्येक गोष्ट अगदी चावून चोथा करून सांगण्याचा सपाटाच लावला आहे. त्यामुळं प्रसंगांत तोच तोपणा आला आहे व कथा संथपणे पुढं सरकते. तरीही, कथेतील थरार कुठंही कमी होणार नाही याची दक्षता दिग्दर्शकानं घेतली आहे. कुट्टनवर विषप्रयोगाच्या प्रसंगानंतरचा थरार हादरवून सोडणारा आहे. मनुष्याचा मानगुटीवर संशय आणि जातीव्यवस्थेचं भूत बसल्यानंतर तो किती टोकाला जातो, याचं चित्रपण कुट्टन आणि त्याची बहीण भारती यांच्या संबंधांतून दिसतं. चित्रपटाचा शेवट अपेक्षित असला, तरी प्रभावी झाला आहे.

मामूट्टीनं साकारलेला कुट्टन जबरदस्तच. संशयी, पाताळयंत्री अधिकारी व त्याचवेळी मुलावर जिवापाड प्रेम करणारा व त्याला काहीही होऊ नये यासाठी धडपडणारा बाप त्यानं ताकदीनं उभा केला आहे. त्यांची करारी नजर आणि संथ चाल थरार उभा करते. पार्वतीनं भारतीच्या भूमिकेत गहिरे रंग भरले आहेत. ती इरफान खानबरोबरच्या ‘करीब करीब सिंगल’ या चित्रपटातील अष्टपैलू अभिनयामुळं हिंदी रसिकांच्या परिचयाची आहे. चित्रपटाचं संगीत कथेतील थरार अधिक जोरकसपणे उभा करण्यात यशस्वी ठरतं. एकंदरीतच, जातीय संघर्षाची पार्श्‍वभूमी असलेला हा ‘सोनी लिव्ह’वर प्रदर्शित थ्रिलर तुम्हाला विचार करायला भाग पाडतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com