गाण्यांत वापरली इंग्रजी, हिंदी भाषा तर बिघडले काय? महेश मांजरेकर यांचा सवाल

टीम ई सकाळ
सोमवार, 29 मे 2017

हिॆदी गाणी आजच्या मराठी युवा वर्गाला आवडतात म्हणून मुद्दाम ही भाषा वापरली जात असल्याचा आरोप होतो. तसा तो आगामी 'एफयू' या सिनेमातील गाण्यांवरही झाला. याबाबत सोशल साइटवर ट्रोलिंगही झाले. या सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मात्र वापरलेल्या भाषेचे समर्थन केले आहे.

पुणे  : सध्या सोशल मिडीयावर एफयू सिनेमाची जोरदार धूम आहे. या सिनेमात तरूण कलाकारांची फौज असल्यामुळे या सिनेमाच्या पोस्टना मिळणारे लाइक्‍सही जास्त आहेत. या सिनेमात तब्बल 14 गाणी आहेत. याचीच दुसरी बाजू अशी की यातली काही गाणी ही हिंदी असल्यामुळे सिनेमा मराठी असूनही यात हिंदी, इंग्रजी भाषा वापरल्यामुळे या सिनेमावर टीकाही होताना दिसते आहे. या टीकेवर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ई-सकाळशी संवाद साधत पहिल्यांदाच यावर ठोस उत्तर दिले आहे. 

या ट्रोलिंगबद्दल बोलताना मांजरेकर म्हणाले, 'सिनेमाचा जॉनर लक्षात घेऊन तशी भाषा वापरली गेली पाहिजे. 'एफयू' हा सिनेमा आजच्या तरुणाईचा आहे. त्यांची भाषा, त्यांची रिऍक्‍ट व्हायची पद्धत लक्षात घेऊन तो बनवला जातो. या सिनेमातली कथा मुंबईत घडते. त्यामुळे यात मराठी व्यतिरिक्त इतरही भाषा आल्या आहेत. उरला प्रश्‍न मराठी भाषेचा तर मला आपल्या भाषेचे महत्त्व सांगायची गरज नाही. कारण आपली भाषा, आपला बाणा यावर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाची निर्मिती मीच केली होती. या सिनेमाला जे आवश्‍यक आहे ते ते त्या सिनेमात आणणे आवश्‍यक आहे.'

हे विस्ताराने सांगतानाच, केवळ लोकांना आवडते, म्हणून हिंदी भाषेतील गाणी वापरण्यास मात्र त्यांनी असहमती दर्शवली आहे. 

Web Title: Mahesh manjarekar Fu ENTERTAINMENT ESAKAL NEWS