कलापूरचा आदर आणखी वाढवायचाय..!

कलापूरचा आदर आणखी वाढवायचाय..!

मी लहानाचा मोठा झालो, तो मंगळवार पेठेतल्या सणगर गल्लीत. त्यामुळं ओघानंच पेठेचे संस्कार रुजले. दररोज आजूबाजूला अनेक घटना, घडामोडी घडायच्या आणि आपणही आपल्याला जे मनापासून वाटतं त्याबाबत व्यक्त झालं पाहिजे, असं वाटायचं. आजवर पस्तीसहून अधिक चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. सध्या तीन चित्रपटांचं लेखन सुरू असून, त्याचं दिग्दर्शनही मीच करणार आहे...युवा लेखक, दिग्दर्शक मकरंद लिंगनूरकर संवाद साधत असतो.

केवळ अभिनय, दिग्दर्शन किंवा तांत्रिक गोष्टींबरोबरच लेखनातही कलापूरची जी तरुणाई अगदी सजगपणे आता पुढे आली आहे. मकरंद त्यापैकीच एक. कलापूरची एक वेगळी ओळख आहे आणि येत्या काळात हा आदर आणखी वाढवायचाय, असेही तो आवर्जून सांगतो.

मकरंदचे आजोबा ज्येष्ठ ध्वनिमुद्रक बाबा लिंगनूरकर. त्यांच्यानंतर वडील रत्नाकर लिंगनूरकर यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी वेशभूषाकार व रंगभूषाकार म्हणून काम केलं. मकरंद तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी. न्यू कॉलेजला महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अवधूत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इथं नाव ठेवायला जागाच नाही’ या एकांकिकेतून त्याचं रंगमंचावर पहिलं पदार्पण झालं आणि त्याचा प्रवास तिथूनच सुरू झाला. ‘

महाद्वार’,‘गिऱ्हाईक’, ‘सी-सॉ’, ‘मॅन प्लस वूमन प्लसनेबर्स’, ‘तुका म्हणे अवघेचि सोंग’ आदी एकांकिका गाजल्या. अनेक बक्षिसांची लयलूट या एकांकिकांनी केली. ‘मॅन प्लस वूमन प्लस नेबर्स’ या एकांकिकेसाठी ‘सकाळ’ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट अभिनयाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आणि एकूणच प्रवासाला आणखी बळ मिळालं. ‘केळ ते काश्‍मीर’, ‘परकाया प्रवेशाचा वग’, ‘ढिंगचान्ग ढीचान्ग’ या नाटकातूनही त्यांनं विविध भूमिका साकारल्या. ‘बाभळी’, ‘क्रांती’, ‘पावनखिंड’,‘छकुली’ या लघुपटांसाठी त्यानं दिग्दर्शन केलं. ‘बाभळी’ आणि ‘पावनखिंड’ या लघुपटांनाही अनेक पारितोषिकं मिळाली. ‘सखाराम बाईंडर’ आणि ‘कुटुंब कल्लोळ’ या व्यावसायिक नाटकांचे स्वतंत्र दिग्दर्शन त्यानं केलं. ‘बंपर लॉटरी’ हा त्याचा स्वतंत्र लेखक आणि दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. स्थानिक कलाकार, तंत्रज्ञांना घेऊन त्यांनं या चित्रपटाच्या निमित्तानं एक चांगली कलाकृती दिली. अवधूत जोशी, संतोष शिंदे, अजय कुरणे, विद्यासागर अध्यापक यांचं त्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं.

लेखन आणि दिग्दर्शनातही अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आत्ता कुठे सुरवात झाली आहे. या प्रवासात कलापूरचं पाठबळ नक्कीच मिळणार आहे.
- मकरंद लिंगनूरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com