आता मल्लखांब, कबड्डीवर चित्रपट!

आता मल्लखांब, कबड्डीवर चित्रपट!

पुणे - ‘मुलांसाठी जर अस्सल भारतीय मातीतले आणि खास त्यांच्या भावविश्‍वाशी जोडले जाणारे चित्रपट बनवले गेले, तर त्यामुळे रंजनातून मुलांमधील सर्जनशीलता, त्यांची विचारक्षमता आणि विवेक वाढीस लागेल,’ या हेतूने पंडित जवाहरलाल नेहरूंनी जिची पायाभरणी केली, त्या ‘चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे (सीएफएसआय) लवकरच मराठी मातीतल्या मल्लखांब आणि कबड्डी या खेळांवरील चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, विविध खेळांवर आधारित सात चित्रपट सोसायटीतर्फे सध्या एकावेळी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या काही काळात ते बच्चेकंपनीला पाहताही येणार आहेत.

ईशान्य भारतीय भाषांमध्ये देशातील प्रादेशिक चित्रपटांचे ध्वनिमुद्रण (डबिंग) करण्याचा प्रकल्प सोसायटीतर्फे या महिन्यात सुरू होत आहे. यानिमित्त ‘सकाळ’ने अभिनेते व सोसायटीचे अध्यक्ष मुकेश खन्ना यांच्याशी संवाद साधला. या वेळी सोसायटीच्या या उपक्रमाविषयी त्यांनी माहिती दिली.

खन्ना म्हणाले, ‘‘चिल्ड्रन फिल्म सोसायटी ही मुलांसाठी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट बनवत आली आहे; मात्र एखाद्या विषयाला घेऊन एकावेळी अनेक चित्रपटांची निर्मिती यंदा ‘खेळ’ या संकल्पनेच्या निमित्ताने पहिल्यांदाच होत आहे. मुलांना खेळांविषयी विशेष आवड आणि आकर्षणही असते. त्यामुळे त्यांना आवडतील असे मल्लखांब, कबड्डी, हॉकी, फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल, रग्बी या खेळांवरील चित्रपट काही महिन्यांत आम्ही प्रदर्शित करणार आहोत.’’

येत्या काळात काही बड्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय निर्मात्यांच्या सहकार्याने सोसायटी मुलांचे चित्रपट बनविणार आहे. त्यामुळे लवकरच मुलांचे चित्रपटही ‘बिग बजेट’ होऊ शकतील आणि परदेशांतही जातील, असे सूतोवाच खन्ना यांनी केले.

‘डबिंग’ जोडणार ईशान्य भारताशी मराठीचा पूल
ईशान्य भारताशी घट्ट नातं करण्यास ‘चिल्ड्रन फिल्म सोसायटी’ सज्ज झाली आहे. सोसायटीतर्फे देशातील १० प्रादेशिक भाषांतील चित्रपट सहा ईशान्य भारतीय भाषांत ध्वनिमुद्रित करण्यात येणार आहेत. तसेच तीन ईशान्य भारतीय चित्रपट १३ प्रादेशिक भाषांत ध्वनिमुद्रित केले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे मिझो, मणिपुरी आणि आसामी या भाषांतील तीन चित्रपट मराठीत ध्वनिमुद्रित करणार आहेत. येत्या सहा महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.

आता ‘ॲवॉर्डस’ नको, ‘रिवॉर्डस’ हवेत !
अभिनेते मुकेश खन्ना म्हणाले, ‘‘विविध चित्रपट महोत्सवांत दाखवले जाणारे आणि तिथे बक्षिसे मिळवणारे चित्रपट प्रत्यक्षात मात्र प्रदर्शित होत नाहीत. यामागे आर्थिक कारणे जेवढी असतात, तेवढीच त्या चित्रपटांचे अतिकलात्मक विषय हेही कारण असते. मुलांसाठी चित्रपट बनवताना मात्र त्यांची आवड आणि रंजनमूल्य विचारांत घेणेच अधिक आवश्‍यक आहे. त्यामुळेच चिल्ड्रन फिल्म सोसायटीतर्फे चित्रपट निवडताना आम्ही यापुढे ज्यांना ‘रिवॉर्डस’ अर्थात प्रेक्षकांची वाहवा मिळू शकेल, जे प्रदर्शित होऊन मुलांपर्यंत पोचू शकतील, असेच चित्रपट आधी निवडणार आहोत. ‘ॲवॉर्डस’साठीचे चित्रपट त्यानंतर...’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com