Man Udhaan Vara Review: सकारात्मकतेची ऊर्जा

संतोष भिंगार्डे
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

आपल्या आयुष्यात अशी एखादी भयंकर घटना घडते, की त्यामुळे आपण मनाने हताश आणि निराश होतो.परंतु अशा वेळीही काही जण निराश न होता पुन्हा नव्या उमेदीने आणि आत्मविश्‍वासाने उभे राहतात. "मन उधाण वारा' या चित्रपटातील सरिताची कहाणी हेच सांगणारी आहे. 

आपल्या आयुष्यात अशी एखादी भयंकर घटना घडते, की त्यामुळे आपण मनाने हताश आणि निराश होतो. त्या घटनेचा आपल्या मनावर इतका खोलवर परिणाम होतो की आपण अक्षरशः कोलमडून पडतो... आपले मन कावरेबावरे होते... आपल्या जगण्याला महत्त्व राहात नाही; परंतु अशा वेळीही काही जण निराश न होता पुन्हा नव्या उमेदीने आणि आत्मविश्‍वासाने उभे राहतात. आयुष्याची नवी वाट शोधतात आणि नव्याने जगण्याचा विचार करतात. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात.. "मन उधाण वारा' या चित्रपटातील सरिताची कहाणी हेच सांगणारी आहे. 

ही कथा आहे सरिताची (मोनल गज्जर). आपल्या आई-वडिलांबरोबर सरिता आनंदी जीवन जगत असते. परंतु, एक अशी घटना घडते की तिच्या मनावर खोल परिणाम होतो. त्या घटनेने ती भेदरून गेलेली असते. त्या घटनेचा विसर पडावा याकरिता ती कोकणातील आपल्या काकांकडे (किशोर कदम) येते. तेथे तिला बिंदा (रित्वीक वैद्य), चंद्रा (शर्वरी लोहकरे), विष्णू (सागर कारंडे), गणा भाऊ (डॉ. शरद भुताडिया) अशी काही विविध स्वभावाची गोड माणसे भेटतात. ही माणसे खूप प्रेमळ आणि साधीभोळी असतात. त्यांच्यामध्ये मिसळल्यानंतर सरिताचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. ती सकारात्मक विचार करू लागते आणि त्यातच बिंदा आणि सरितामध्ये चांगली मैत्री होते. त्यानंतर काय आणि कशा घडामोडी घडतात हे पडद्यावर पाहिलेले बरे. 

संजय मेमाणे हा उत्तम आणि हुशार सिनेमॅटोग्राफर आहे आणि त्याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच प्रयत्न आहे. तसेच निशांत कौशिक, अक्षय गडा आणि धवल गडा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

कोकणातील नितांत सुंदर आणि नयनरम्य लोकेशन्सवर चित्रपट शूट झाला आहे. ही लोकेशन्स डोळ्यांना सुखद आनंद देणारी आहेत. कलाकारांनीदेखील आपली कामगिरी चोख केली आहे. मोनल गज्जर आणि रित्वीक वैद्य यांनी आपापल्या भूमिकेत चांगली छाप पाडली आहे. विशेष म्हणजे सागर कारंडेची वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचे संवाद छान. तरीही पटकथेवर अधिक काम होणे आवश्‍यक होते. ते झाले असते तर चित्रपट अधिक भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवणारा झाला असता. एका घटनेने भेदरून गेलेली तरुणी... त्यानंतर कसा सकारात्मक विचार करते आणि आपले आयुष्य नव्याने सुरू करते. एकूणच सकारात्मक विचार देणारा हा चित्रपट आहे. 

अडीच स्टार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man Udhaan Vara Movie Review