'तर आमच्या खास भाषेत तुम्हाला समजवावं लागेल' मनसेचा चित्रपटगृह मालकांना इशारा

वृत्तसंस्था
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळण्यास अडचण येऊ नये किंवा पुरेसे शो उपलब्ध व्हावेत यासाठी मनसेने हा मुद्दा हाती घेत महाराष्ट्र नमनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटर यासंबंधी पत्र जाहिर केलं आहे. 

मुंबई : दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हिंदीसह मराठी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. पण हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना पुरेसे थिएटर उपलब्ध होत नसल्याचा प्रकार अनेकदा घडतो. मराठी भाषेसाठी वारंवार आवाज उठविण्याऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याविरोधात पुन्हा एकदा पाऊल उचललं आहे. हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळण्यास अडचण येऊ नये किंवा पुरेसे शो उपलब्ध व्हावेत. यासाठी मनसेने हा मुद्दा हाती घेत महाराष्ट्र नमनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटर यासंबंधी पत्र जाहिर केलं आहे. 

चित्रपटगृहाच्या मालकांना लिहिण्यात आलेल्या या पत्रात हिरकणी आणि ट्रिपल सीट या चित्रपटांना थिएटर देण्यात यावे अथवा मनसेच्या खास भाषेत तुम्हाला समजविण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. अमेय खोपकर यांनी चित्रपटगृहाच्या मालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'हिरकणी आणि ट्रिपल सीट हे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी संबंधीत निर्देशकांचे अथक प्रयत्न सुरु आहेत. पण चित्रपटगृह उपलब्ध होत नाही.असे ठोकळेबाज उत्तर मिळत आहे. मग बाकी मराठी निर्णात्यांनी काय कराय़चे ?'.

स्वत: जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या. त्यात दोघांचेही हित आहे. आणि या दोन्ही भाषा तुम्हाला समजत नसतील तर मग आमच्या खास भाषेत तुम्हाला समजवलं जाईल. तेव्हा तुटेल तेवढे ताणू नका. अशी कडक शब्दात कानउघडणी अमेय खोपकर यांनी केली आहे. 

दिवाळीच्या शुभमुहुर्तावर म्हणजेच 24 ऑक्टोबरला 'हिरकणी' आणि 25 ऑक्टोबरला 'ट्रिपल सीट' हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 25 आणि 26 तारखेला 'सांड कि ऑंख', 'हाऊसफुल 4' आणि 'मेड इन चायना' हे तीन हिंदी सिनेमे रिलिज होणार आहेत. हिंदी आणि मराठी चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होणार असल्याने मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. हे पत्र जाहिर करण्याआधीही मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manase threatens about protest to theater owner