बोचणाऱ्या सुखाची हसरी गोष्ट

मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटामध्ये गश्‍मीर महाजनी व स्पृहा जोशी.
मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटामध्ये गश्‍मीर महाजनी व स्पृहा जोशी.

मला काहीच प्रॉब्लेम नाही

पती-पत्नीतील नातेसंबंध व बदलत्या जीवशैलीमुळं त्याच्या टिकाऊपणाबद्दल निर्माण झालेले प्रश्‍नचिन्ह यांबद्दल सिनेमा, सोशल मीडियासह सर्वच माध्यमांतून चर्चा झडत आहेत. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा समीर विद्वांस दिग्दर्शित चित्रपट हाच विषय हाताळत तो आणखी थोडा पुढं नेण्याचा प्रयत्न करतो. पती-पत्नीनं नातं तोडताना त्याचा परिणाम होणाऱ्या कुटुंबातील इतर सर्वच घटकांचाही विचार करावा, असा संदेश देण्याचा प्रयत्न चित्रपट करतो. 

‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ची कथा आहे अजय (गश्‍मीर महाजनी) व केतकी (स्पृहा जोशी) यांची. अजय विदर्भातील, तर केतकी कोकणी. मोठी सांस्कृतिक दरी असल्यानं प्रेमात असूनही त्याचं लग्न ठरण्यात अडचणी येतात. देण्या-घेण्याच्या बैठकीतच लग्न मोडतं, मात्र घरच्यांचा विरोध डावलत दोघं लग्न करून मुंबईत सुखानं संसार करू लागतात. मात्र सात वर्षांनंतर (सर्व गोष्टी सुखनैव सुरू असूनही) दोघांत बेबनाव निर्माण होतो.

मुलाचं संगोपन, एकमेकांना दिला जाणारा वेळ, स्वभावातील फरक, व्यक्त होण्याची पद्धत असे अनेक प्रश्‍न असतात. एका टप्प्यावर दोघं वेगळं होण्याचा विचार करीत असतानाच अजयचे आई-वडील, भाऊ, वहिनी असे सर्वजण नागपूरहून मुंबईला येतात. केतकीच्याही आई-वडिलांना एवढ्या वर्षांत सहन कराव्या लागलेल्या विरहाचा विचार करून हे सर्वजण कोकणात येतात. अजय व केतकी आता या सर्व गोतावळ्यात अडकतात. आपला मूळ प्रश्‍न बाजूलाच पडल्याचं त्यांच्या लक्षात येतं. कोकणात असं काय घडतं, ज्यामुळं या दोघांना आपल्या नात्याबद्दल पुनर्विचार करावा लागतो, अजय-केतकी कसे एकत्र येतात याची उत्तरं चित्रपटाच्या शेवटी मिळतात. 

चित्रपटाची कथा सुरवातीला फक्त अजय आणि केतकीच्या दृष्टिकोनातून मांडली गेली आहे व त्यामुळं ती सूत्रबद्ध आहे. दुसऱ्या टप्प्यात कथेत अचानकच पात्रांची गर्दी वाढते. (त्यातील काहींची ओळखही करून दिली जात नाही.) प्रत्येकाच्याच नात्यातील तणावाचं ओझरतं दर्शन दिलं जातं व त्यात मूळ कथा मागं पडतं. कोकणात अनेक विधी व पूजा-अर्चा दाखविल्यानंतर पुन्हा एकदा अजय व केतकीचा विषय ऐरणीवर आणला जातो आणि फारसे खुलासे न करता संपवलाही जातो. कथेचे दोन सांधे जोडताना दिग्दर्शकाची थोडी तारांबळ उडालेली दिसते. कथेत अनेक पात्रांचा प्रवेश झाल्यावर खरंतर कथा वेगच घेते, पण ती मूळ कथेला फारशी पूरक नसल्यानं गोंधळ होतो.

वडील-मुलांमधील तणावाचे संबंध, मानपान, महिलांच्या व विधवांच्या समस्या, धार्मिक संबंध आवश्‍यक की अनावश्‍यक अशा अनेक प्रश्‍नांवर चित्रपट भाष्य करीत राहतो. शेवटी चित्रपट एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करीत असावा, असंही वाटून जातं. मात्र अजय-केतकीचं एकत्र येण्यामागचं एकच एक कारण न सांगता संपतो. मुंबईत घराचं आणि कोकणातील वाड्याचं देखणं छायाचित्रण जमेच्या बाजू आहेत.

गश्‍मीर महाजनी व स्पृहा जोशीनं चित्रपटात जाण आणली आहे. दोघांची कामं परफेक्‍ट झाली असून, त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री छान जुळली आहे. निर्मिती सावंत, सतीश आळेकर, विजय निकम, मंगला केंकरे, सीमा देशमुख या अनुभवी कलाकारांनी आपापल्या भूमिका समरसून केल्या आहेत.
एकंदरीतच, सुख अति झाल्यावर ते बोचू लागतं, तसं होऊ नये म्हणून सांगितलेला हा हसरा उपाय काही गोष्टी नक्कीच शिकवून जातो... 

निर्माता व दिग्दर्शक - समीर विद्वांस
भूमिका - गश्‍मीर महाजनी, स्पृहा जोशी, निर्मिती सावंत, सतीश आळेकर आदी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com