हवी जबरदस्त इच्छाशक्ती

Mira-Devstali
Mira-Devstali

‘ससुराल सिमर का’, ‘जिंदगी विन्स’, ‘दिल्लीवाली ठाकूर गर्ल्स’ या मालिकांनंतर अभिनेत्री मीरा देवस्थळी ‘उडान’ मालिकेतील ‘चकोर’च्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली. तिची या मालिकेतील भूमिका अनेकांना प्रेरणा देणारी ठरली. एवढ्या लहान वयात प्रगल्भ भूमिका साकारणारी ही छोकरी गुजराती असली, तरी मराठमोळेपणाही तिच्यात आहेच. तिच्या या आजवरच्या प्रवासाविषयी सांगतेय खुद्द मीरा देवस्थळी... 

गुजरातमधील लुनावडा येथे माझा जन्म झाला आणि बडोद्यात मी लहानाची मोठी झाले. माझ्या बालपणातील काही चांगल्या आठवणी बडोद्यामधील आहेत. तेथील ‘जगदीश फरसाण’ दुकानातील फरसाण मला खूप आवडतं. तिथल्या बेसिल स्कूलमध्ये मी शालेय शिक्षण घेतलं. मी शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी होते. मला सर्वांत जास्त इंग्रजी व त्यानंतर रसायनशास्त्र हा विषय आवडत असे. गणितापासून मात्र मी लांब पळत असे. सध्या मी मुंबई विद्यापीठातून कला शाखेच्या पदवीचा अभ्यास करतेय. माझ्या आई-वडिलांचा प्रेमविवाह झालेला आहे. आई गुजराती आणि वडील महाराष्ट्रीय आहेत; पण मी जास्त गुजरातीच बोलते. माझा लहान भाऊ सध्या कॅनडात शिकतोय.  

शाळेत असताना मी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सहभागी होत असे. त्या वेळी अभिनयापेक्षा नृत्याला जास्त महत्त्व दिलं जात असे. मी आंतरशालेय नृत्य स्पर्धेमध्येही सहभागी होत असे. सुरुवातीला मला मंचावर जाण्याची भीती वाटायची आणि वक्तृत्व स्पर्धेच्या वेळी तर मी थरथर कापत असे. पण त्यानंतर एका मित्राने मला त्याच्यावर कशी मात करायची, ते शिकवलं. 

मी अभिनयाला सुरुवात १८ वर्षांची असतानाच केली. ‘ससुराल सिमर का’ मालिकेत मी पहिल्यांदा भूमिका साकारली. त्या वेळी सहकलाकारांनी मला सांभाळून घेतलं. त्यांच्याकडूनच मला खूप शिकायला मिळालं. ‘ससुराल सिमर का’ मालिकेनंतर मी २०१५ मध्ये ‘दिल्लीवाली ठाकूर गर्ल्स’ या मालिकेत ईश्‍वरीची भूमिका; तर ‘जिंदगी विन्स’च्या एका भागामध्ये रियाची भूमिका साकारली. मग २०१६ मध्ये चकोरची भूमिका करत ‘उडान’ मालिकेत अभिनय करायला सुरुवात केली. चकोरने आपलं स्वातंत्र्य गृहीत धरून देण्याचं मूल्य आणि काहीही झालं तरी, जर तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर तुम्ही उडू शकता, हे मला शिकवलं! 

आतापर्यंतच्या भूमिकांमध्ये ‘उडान’मधील चकोरची भूमिकाच आवडती म्हणावी लागेल. मला माझं पात्रं अतिशय आवडतं; कारण मीसुद्धा चकोरसारखा विचार करायला लागली आहे. मी माझ्या पात्राच्या अंतरंगात इतकी शिरलेय की, माझ्या मित्राने मला एकदा विचारलं, की मी तिच्यासारखी का वागतेय? एक व्यक्ती आणि एक परफॉर्मर म्हणून ‘चकोर’ने मला खूप काही शिकवलं आहे आणि दिलं आहे. 

‘उडान’ मालिकेत भारतीय खेड्यांमध्ये अजूनही राबवली जाणारी वेठबिगारीची पद्धत दाखविली आहे. यामधील माझं पात्र असलेली चकोर म्हणजे आझादगंजमधील वेठबिगारीच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांसाठी आशेचा किरण आहे. ‘उडान’चे कलाकार आणि कर्मचारी माझ्यासाठी कुटुंबासारखेच आहेत. 

मला दहावीत ९२ टक्के गुण मिळाले, तो माझ्या जीवनातील सर्वांत अविस्मरणीय क्षण होता. कारण, तेव्हा वर्तमानपत्रात माझा फोटो आला होता. माझे आई-वडील आणि मी आनंदाने उड्या मारत होतो. माझ्याकडे ते वर्तमानपत्र अजूनही आहे. माझा मित्र परिवार मला ‘मी हे कसं साध्य केलं,’ याविषयी फोन करून विचारत असे. 

माझ्या करिअरला ‘उडान’मुळेच कलाटणी मिळाली. मी आज जी काही आहे ती ‘उडान’मुळेच. जेव्हा प्रेक्षक मला विचारतात की, ‘उडान’ तुझ्यासाठी काय आहे?, तेव्हा मी सांगते की, ‘उडान’सोबतच मी राहते, श्‍वास घेते आणि जगतेसुद्धा. आगामी काळात मला ‘डान्स रिॲलिटी शो’मध्ये सहभागी व्हायची इच्छा आहे; पण ‘उडान’मध्ये काम करताना नाही.  कारण एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला मला आवडतं. मला वेबसीरिज किंवा शॉर्ट फिल्ममध्येही काम करायचंय. कारण त्यांचं स्वरूप आणि त्यात काम करण्याची शैली वेगळी असते. 

शब्दांकन - अरुण सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com