'झिपऱ्या' चित्रपटाने 'थर्ड आय'ची सुरवात

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 डिसेंबर 2017

मुंबई - एशियन फिल्म फाउंडेशन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या 16 व्या "थर्ड आय' या आशियाई चित्रपट महोत्सवाला सुरवात झाली आहे. प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात या महोत्सवाचे उद्‌घाटन अध्यक्ष किरण शांताराम, महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगावकर, पु. ल. देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक संजीव पालांडे, अरुण साधू यांच्या पत्नी अरुणा साधू व मुलगी शेफाली या मान्यवरांच्या हस्ते झाले.

दिग्दर्शक केदार वैद्य यांच्यासह "झिपऱ्या' या चित्रपटाची संपूर्ण टीम आणि इतर कलाकार या वेळी उपस्थित होते. अरुण साधू यांच्या "झिपऱ्या' या गाजलेल्या कादंबरीवर बेतलेल्या केदार वैद्य दिग्दर्शित "झिपऱ्या' या मराठी चित्रपटाने महोत्सवाची शानदार सुरवात झाली. या प्रसंगी अध्यक्ष किरण शांताराम यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. अरुण साधू तसेच त्यांच्या "झिपऱ्या' कादंबरीच्या आठवणींना शेफाली साधू यांनी उजाळा दिला. दिग्दर्शक केदार वैद्य यांनी चांगली कलाकृती करायला मिळाल्याचे समाधान व्यक्त करताना, अरुण साधू यांनी हा चित्रपट पाहिला असता तर भरून पावलो असतो, अशी खंतही व्यक्त केली.

या महोत्सवात भारताबरोबरच इजिप्त, इराण, व्हिएतनाम, तिबेट, तैवान, बांगलादेश या देशांतील चित्रपटांबरोबरच आठ मराठी चित्रपट मुख्य विभागात दाखवण्यात येणार आहेत. दिग्दर्शक झोल्तन फाब्री यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चार हंगेरियन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. सत्यजित राय यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा "जनअरण्य' चित्रपट दाखवला जाईल. दरवर्षीप्रमाणे लघुपट स्पर्धा यंदाही असून, त्यात 25 लघुपट दाखवले जाणार आहेत.

Web Title: manoranjan news third eye start ziparya movie