
भरत जाधव सध्या सोशल मीडियावरील त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. त्या पोस्टमध्ये वडिलांचा अपमान झाल्याचे त्याने म्हटले आहे.
मुंबई- मनमिळावू, मोकळ्या स्वभावाचा आणि साधं व्यक्तिमत्व म्हणून प्रसिध्द असणारा कलाकार अशी भरत जाधवची ओळख आहे. आभाळाएवढं यश मिळवूनही पाय जमिनीवर असणा-या भरत जाधवचा मराठी चित्रपट इंडस्ट्रीचील संघर्ष मोठा आहे. शुन्यापासून सुरुवात करुन त्यानं मोठी उंची गाठली आहे. असे दैदिप्यमान यश त्यानं मिळवले असताना देखील आपले मुळ तो काही विसरलेला नाही हे आवर्जुन सांगावे लागते. मराठी चित्रपट आणि मालिकेच्या दुनियते नव्य़ानं येणा-या पिढीपुढे त्याचा आदर्श मार्गदर्शक ठरणार आहे.
भरत जाधव सध्या सोशल मीडियावरील त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. त्या पोस्टमध्ये वडिलांचा अपमान झाल्याचे त्याने म्हटले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. तो प्रसंग सांगताना भरत जाधव म्हणाला, एकदा आमच्या टॅक्सीत काही प्रवासी बसले होते. त्यांना नाटकाच्या प्रयोगाला जायला उशीर होत होता म्हणुन ते प्रवासादरम्यान वडिलांशी वाद घालत होते. त्यांनी त्यावेळी कहर केला. तो म्हणजे माझ्या घरच्यांना आई बहिणी वरून शिव्या दिल्या पण वडिलांनी त्यांना एक शब्दही बोलले नाहीत. त्यांनी त्यांना नाट्यगृहावर सोडलं आणि शांतपणे निघून आले. रात्री घरी आल्यानंतर त्यांनी हा प्रसंग सांगितला’.
भरत म्हणाला, ‘ते प्रवासी ‘ऑल द बेस्ट’ च्या प्रयोगाला चालले होते! आपल्या मुलाच्या नाटकासाठी लोकं गर्दी करतायत. या एकाच गोष्टीसाठी त्यांनी तो अपमान मुकाट सहन केला. मी खुप रडलो होतो त्या दिवशी. सुदैवाने तेंव्हा मला 100 रुपये नाईट मिळत होती.. त्या दिवसापासून त्यांना टॅक्सी चालवणं आता बंद करा म्हणून सांगितलं. टॅक्सी चालवणं त्यांनी बंद केलं तरी ती टॅक्सी त्यांनी विकली नाही कारण त्यांना चिंता होती उद्या जर याचं एखादं नाटक नाही चाललं तर काय करणार. ज्या वेळेस मी पहिली लक्झरी कार ऑटोमॅटिक Honda Accord घेतली आणि त्यांना स्टीअरिंग वर बसवलं त्यावेळेस आम्हा दोघांनाही खुप भरून आलं होतं. त्यानंतर मी अनेक लक्झरी गाड्या घेतल्या.. BMW, Mercedes S Class.
सोशल मीडियावर शेयर केलेल्या पोस्टमध्ये भरत जाधव भावनिक झाला आहे. त्यानं म्हटले आहे की, ‘मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या हयातीतच मी मला जेवढं शक्य होत ते सगळं सुख त्यांना देऊ शकलो. अर्थात त्यांच्या आशीर्वादाच्या पाठबळावरच मी हा प्रवास केलाय. आजही माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे.