गणपतीच्या सजावटीत चूक झाल्याने अभिनेते प्रवीण तरडे ट्रोल, व्हिडिओ शेअर करत मागितली दलित बांधवांची माफी

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ | Saturday, 22 August 2020

मराठी अभिनेते प्रविण तरडे यांच्या घरीही अशीच वेगळी कल्पना करत बाप्पाची आरास तयार करण्यात आली आहे. मात्र या सजावटीत प्रवीण तरडे यांच्याकडून एक चूक झाल्याने ते सोशल मिडियावर ट्रोल झाले आहेत.

मुंबई- आजपासून देशभरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. अनेकांनी यावर्षी घरच्या घरी सजावट करत बाप्पाची आकर्षक आरास केली आहे. सामान्यांसोबतंच राजकारणी, सेलिब्रिटी यांनी बाप्पाची वेगवगेळी थीम तयार करत बाप्पा सजवला आहे. मराठी अभिनेते प्रविण तरडे यांच्या घरीही अशीच वेगळी कल्पना करत बाप्पाची आरास तयार करण्यात आली आहे. मात्र या सजावटीत प्रवीण तरडे यांच्याकडून एक चूक झाल्याने ते सोशल मिडियावर ट्रोल झाले आहेत. तरडे यांना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी व्हिडिओ शेअर करत माफी देखील मागितली आहे. 

हे ही वाचा: गणेश चतुर्थीनिमित्त अंकिता लोखंडेने फोटो शेअर करत म्हटलं, 'गणपती बाप्पा, मी वाट पाहतेय...'  

अभिनेता प्रवीण तरडे यांना नेहमीच काहीतरी हटके करायची इच्छा असते. वेगवेगळे प्रयोग त्यांना करुन पाहण्याची आवड आहे. असाच वेगळा विचार करत त्यांनी त्यांच्या घरच्या गणपती बाप्पासाठी यावर्षी पुस्तक गणपती अशी संकल्पना केली होती. इतर सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांनी त्यांच्या बाप्पाचा फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला. पण थोड्याच वेळात त्यांच्यावर ट्रोलर्सनी टीकेची झोड उठवायला सुरुवात केली. 

त्याचं झालं असं की प्रवीण तरडे यांच्या बाप्पाच्या आजुबाजुला सर्व ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांची आरास पाहायला मिळेत पण गणपती बाप्पाची मुर्ती ज्या पाटावर ठेवली होती त्या पाटाखाली त्यांनी भारताच्या संविधानाचे पुस्तक ठेवले होते. याच गोष्टीवरुन त्यांना ट्रोलिंगचा सामना करायला लागला. अभिनेता प्रवीण तरडे यांना ही गोष्ट लक्षात आल्यावर लगेचच फोटो सोशल मिडियावरुन डिलीट केला आणि जाहीर माफी मागणारा एक व्हिडिओ पोस्ट केला.

तरडे यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय, 'माझ्या घरी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती . बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सर्वात मोठं प्रतिक अशी माझी भावना होती. पण मी केलेली चूक अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिली. आरपीआय, भीम आर्मी तसंच लातूर आणि पुण्यातील संघटनांनी मला याची जाणीव करुन दिली. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांची मी जाहीर माफी मागतो. '

इतकंच नाही नाही तर प्रवीण तरडे यांनी चूक मान्य करत त्यांनी केलेला बदलही दाखवला आहे. 'मी खूप सामाजिक भावना जपतो. याआधी कधीच चूक झाली नाही आणि होणार नाही. जगभरातल्या दलित बांधवांची मी जाहीर माफी मागतो' अशा भावना त्यांनी व्हिडिओच्या शेवटी व्यक्त केल्या आहेत. 

marathi actor director pravin tarde apology over ganeshotsav celebration