पाच महिन्यांनंतरही मराठी सिनेमाच्या हाती घंटाच 

सौमित्र पोटे
बुधवार, 31 मे 2017

एखाद्या सिनेमाचे कौतुक झाले की आपला सिनेमा कसा सातासमुद्रा पार चालला आहे. आपल्या सिनेमाला कसे आता सुगीचे दिवस आले आहेत हे सांगताना मराठी माणसाचा ऊर भरून येतो खरा. पण आता जरा डोळे नीट उघडण्याची गरज आहे. कारण 2017 हे वर्ष मराठी सिनेमासाठी सुमार आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत तब्बल 35 मराठी सिनेमे रिलीज झाले. पण त्यापैकी चालला केवळ एक तो म्हणजे जानेवारीत आलेला ती सध्या काय करते? हा चित्रपट. 

मुंबई : एखाद्या सिनेमाचे कौतुक झाले की आपला सिनेमा कसा सातासमुद्रा पार चालला आहे. आपल्या सिनेमाला कसे आता सुगीचे दिवस आले आहेत हे सांगताना मराठी माणसाचा ऊर भरून येतो खरा. पण आता जरा डोळे नीट उघडण्याची गरज आहे. कारण 2017 हे वर्ष मराठी सिनेमासाठी सुमार आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत तब्बल 35 मराठी सिनेमे रिलीज झाले. पण त्यापैकी चालला केवळ एक तो म्हणजे जानेवारीत आलेला ती सध्या काय करते? हा चित्रपट. 

मराठी सिनेमाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे. एकिकडे करमणूक कर झाला आहे. अनुदान योजना फॉर्मात आहे. असे असले तरी मराठी सिनेमा स्वत: च्या पायावर तर दूरच. पण आता तो पार लुळा होऊन फरपटू लागला आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यात अनुक्रमे 3, 10, 7, 10, 5 असे 35 सिनेमे रिलीज झाले. यात झाला बोभाटा, गाव थोर पुढारी चोर, नगरसेवक, ताटवा, ध्यानिमनी, फुगे, बघतोस काय मुजरा कर, वाक्‍या, श्‍यामची शाळा, माणूस एक माती आदी सिनेमांचा समावेश होतो. पण दुर्दैवाने यातील केवळ एक सिनेमा हिट झाला. तर बघतोस काय मुजरा करला काही प्रमाणात यश आले. याबद्दल बोलताना व्हिडोओ पॅलेसचे नानुभाई जयसिंघानी म्हणाले, सिनेमे चालले नाहीत ही बाब खरी आहे. या वर्षात आलेल्या सिनेमांपैकी केवळ ती सध्या काय करते या सिनेमाने 11 कोटीची कमाई केली. त्यानंतर उल्लेख करावा लागेल तो बघतोस काय मुजरा कर या सिनेमाचा. हा सिनेमा हिट नव्हता. पण, त्याने किमान व्यवसाय केला. बाकी सगळीकडे अंधार आहे. 

मराठी सिनेमाची अशी अवस्था का आहे, यावर पुढे बोलताना नानुभाई म्हणाले, आपल्याकडे सिनेमे चालले नाहीत. कारण त्यात काही कंटेंटच नव्हता. मुळात सिनेमाची गोष्टच लोकांना कळत नाही. मग त्या सिनेमाचे प्रमोशन कसे करायचे ते समजत नाही. आपल्याकडे हिरो, हिरोईन नाहीयेत. जे आहेत, ते ऍक्‍टर आहेत. यापुढेही सिनेमे येत रहाणार आहेत. एकाच दिवशी तीन तीन सिनेमे येत रहाणार आहेत. 

मराठी सिनेमाला चांगले दिवस आले असे आपण म्हणतो, पण तशी अवस्था सध्या नाही. सिनेमांना अनुदान जरी मिळत असले तरी त्या संपूर्ण प्रक्रियेवरच निर्मात्याच्या एका गटाने संशय व्यक्त केला आहे. सिनेमांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय कान्ससह इफ्फी येथे सिनेमे पाठवते. पण त्यातूनही फार काही हशील हाती लागल्याची स्थिती नाही. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आता या चित्रपट उद्योगाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 

Web Title: Marathi cinema is in loss entertainment news esakal