Exclusive : व्यावसायिक रंगमंच कामगार 30 सप्टेंबरपासून संपावर; उद्या तातडीची बैठक

back stage artists strike for demands esakal news by soumitra pote
back stage artists strike for demands esakal news by soumitra pote

पुणे : गेली तीन वर्षे सातत्याने पत्रव्यवहार करूनही व्यवसायिक नाट्य निर्माता संघ आपल्या मागण्यांची दखल घेेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मराठी व्यावसायिक रंगमंच कामगार संघाने संपाचे हत्यार उपसायचे ठरवले आहे. आपल्या मागण्यांची दखल जर घेतली गेली नाही, तर 30 सप्टेंबरपासून आपण बेमुदत संपावर जाऊ असा इशारा संघटनेने दिला आहे. तशा संदर्भातील मेसेज सध्या व्हायरल होताहेत. 

नाटक सादर होण्यापूर्वी नाटकाचे नेपथ्य गोडाऊनमधून बसमध्ये भरणे.. नाटकाच्या ठिकाणी आल्यानंतर ते उतरवून मंचावर सेट उभा करणे, प्राॅपर्टी लावणे आणि नाटक संपल्यानंतर तो सेट काढून बसमध्ये भरणे. त्यानंतर गोडाऊनमध्ये बस गेल्यानंतर तो सेट पुन्हा उतरवणे हे रंगमंच कामगारांचे काम असते. आज त्यांना या कामासाठी प्रतिदिन 500 ते 600 रूपये मिळतात. कामगार किती जुना त्यावर त्याचा या पैशातला फरक ठरतो. गेल्या तीन वर्षांपासून कामगार संघटना आपला हा भत्ता वाढवावा म्हणून सातत्याने निर्माता संघाकडे पाठपुरावा करते आहे. पण त्याकडे कोणीच गांभीर्यांने पाहात नसलेले दिसते. त्यात निर्माता संघात दोन गट पडल्याचा फटकाही या मागणीला बसला आहे. एकिकडे नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष म्ङणून प्रसाद कांबळी यांची निवड झालेली असताना मावळते अध्यक्ष प्रशांत दामले, सचिव दिलीप जाधव यांनी अद्याप संघाचे दप्तर नव्या कार्यकारिणीच्या हवाली केलेलं नाही. याचा वाद धर्मादाय आयुक्तांकडेही गेला आहे. त्यामुळे या वादात कामगार संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले असण्याची दाट शक्यताा आहे. मात्र आता संघटनेने अल्टिमेटम दिला असून, 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. 

याबाबत बोलताना कामगार संघटनेचे अध्यक्ष रत्नकांत जगताप म्हणाले, 'गेली तीन वर्षे आम्ही पाठपुरावा करतोय. पण त्याकडे लक्ष दिले जात नाहीय. आमच्या भत्त्यात आम्हाला केवळ दीडशे रूपये वाढवून हवे आहेत. याकडे दुर्लक्ष झाल्याने सर्व सदस्यांनी आता संपाचे हत्यार उपसले आहे. याबाबात मी निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याशी बोललो असून, त्यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच आमची याबाबत बैठक होणार असून त्यात अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील याची आम्हालाा खात्री आहे. मी आशा करतो की संपाची वेळ आमच्यावर आणि नाट्यसृष्टीवर येणार नाही. '

निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com