पाण्याचे महत्त्व सांगणाऱ्या 'H2O' चा ट्रेलर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

शहरी आणि ग्रामीण भागातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या तरुणांच्या भावना या चित्रपटात मांडल्या आहेत, असे ट्रेलर बघितल्यावर कळते.

सध्याच्या घडीला 'पाणी' हा अतिशय ज्वलंत विषय होत चालला आहे. याची जाणीव करुन देणारा आणि पाण्याचे महत्त्व सांगणारा 'H2O' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. काही तरुण शहरात शिक्षणासाठी राहत असून पण शहरात असणाऱ्या भौतिक सुखाला दूर सारून पुन्हा गावाकडे वळतात. पाण्याचा विषय मांडतांना तो तरुण पिढीच्या नजरेतून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या तरुणांच्या भावना या चित्रपटात मांडल्या आहेत, असे ट्रेलर बघितल्यावर कळते.

या ट्रेलर सोबतच चित्रपटातील 'झालो मी बावरा' हे रोमँटिक गाणे आणि 'दिल दोस्तीचा वादा' हे  कॉलेजमधील आठवणींना उजाळा देणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'झालो मी बावरा' या गाण्याचे वैशिष्टय म्हणजे या गाण्याला बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक जावेद अली यांचा आवाज लाभला आहे. तर 'दिल दोस्तीचा वादा' हे गाणे रोहित राऊत आणि केतकी माटेगावकर यांनी गायले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन मिलिंद पाटील यांनी केले असून सिनेमाची निर्मिती सुनिल झवर आणि जी. एस. प्रोडक्शन यांनी केली आहे. 'H2O'  हा चित्रपट 12 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi film H2O trailer release

टॅग्स