तुम्हारी सुलू...हमारी विद्या...

Marathi news Hindi film review in Marathi Tumhari Sulu
Marathi news Hindi film review in Marathi Tumhari Sulu

सगळ्यात आधी हे सांगायला हवं की, तुम्हारी सुलु हा सिनेमा आमच्या विद्याचा आहे. पूर्णपणे.
विद्या आवडतेच. फार पुर्वीपासून. 
​परिणितात काय दिसलीय ती. लगे रहो मुन्नाभाईमध्ये तिचं हॅलो मुंबई म्हणणं. 
​असो विषय सुलुचा आहे... 
​तर तुम्हारी सुलुची हिरॉईन नाही विद्या...हिरोच आहे. सगळा सिनेमा तिच्याभोवतीच फिरतो.
अर्थात तिची व्यक्तिरेखाही आहे तशीच. 
मध्यमवयीन गृहिणी. लग्न होऊन काही वर्षं झालीत. मुलगा मोठा झालाय. पण इतकी वर्षं होऊनही नवरा तिच्या आणि ती नवऱ्याच्या प्रेमात आहे. ती आहेच तशी लाघवी आणि गोड.
​(थोडी जाड झालीय पण चेहऱ्यावरचा गोडवा तसाच आहे. विद्या मुद्दाम झालीय का जाडी या सिनेमासाठी? माहित नाही पण तशीही छान दिसते ती...)
​ती म्हणजे सुलक्षणा. सुलु. ​नवऱ्याबरोबर खूप मस्तीखोरपणे वागणारी; पण घराच्या साऱ्या जबाबदाऱ्या तितक्‍याच दक्षतेने पाळणारी, पहाटे साडेपाचपासून तिचा दिवस होतो सुरु पण त्यात आनंदचंय तिला. संसाराला हातभार लावण्यासाठी नेहमीच नवनव्या आयडिया शोधतेय.
मुलासह त्रिकोणी कुटुंबात ती खुश आहे, पण कधी तिच्या जुळ्या बहिणी येऊन तिला कॉम्प्लेक्‍स देण्याचा प्रयत्न करतात. पण ती फार दबाव नाही सहन करत. बँकेत नोकरी करणाऱ्या हुशार बहिणी आणि वडिलांचंही ती एका मर्यादेपलीकडे ऐकून नाही घेत. ती बारावी फेल असली तरी ती मठ्ठ नक्कीच नाही, हे ती वारंवार सिद्धच करते...तिने घेतलेल्या निर्णयावर ती ठाम रहाते.(त्यामुळे चिडलेल्या बहिणी म्हणतात, "त्यातून काही बरंवाईट झालं तर मग आमच्याकडेच येशील रडत', त्यावर ती म्हणते, "तुम्हारे पासही आऊंगी ना...फॅमिली जो हो!').
आपल्या संसाराचा आनंद घेणारी ही सुलक्षणा अत्यंत पारदर्शी आणि प्रामाणिक आहे. खरं बोलल्यामुळे आपली संधी जाऊ शकते, हे माहीत असतानाही ती आपण बारावी फेल असल्याचं सांगून टाकण्याचं धैर्य दाखवते. (तेही रेडियो स्टेशनच्या डायरेक्टर समोर, आरजेचा जॉब पणाला लागलेला असताना)
नवरा अशोक (मानव कौल) बरोबरचं तिचं नातं अतिशय मस्त आहे. परिस्थितीने गांजलेला असला तरी तो अतिशय समजूतदार आहे. तिलाही त्याची जाणीव आहेच. त्यामुळे त्याचा त्रास कमी व्हावा, ही तिची सततची धडपड. त्यासाठीच तर नवनव्या आयडिया तिच्या डोक्‍यात रुंजी घालत असतात. त्यातूनच येते आरजे बनण्याची आयडिया. एका रेडिओ स्पर्धेत तिला लागलेला कुकर घेऊन येण्यासाठी रेडिओ स्टेशनवर गेलेली सुलू ही आयडिया डोक्‍यात घेऊनच परतते. तिला स्वतःला विश्‍वास असतो... "मैं कर सकती है``. हे ती त्या स्टेशन डायरेक्‍टरलाही सांगते. मग सुरू होतो एका सामान्य बारावी फेल गृहिणीचा आरजे होण्यासाठीचा प्रवास.
तिची ही अर्धीकच्ची; पण पारदर्शक भाषा हेच तिचं बलस्थान बनतं. येणाऱ्या टेली-कॉलरशी शब्दच्छल न करता मनापासून, मनातलं बोलल्यामुळे तिला संधी मिळते, तिचा शोही हिट होतो; पण यामुळे सुरू  होते तिची वेगळीच कसरत. तिचा शो रेडिओवरचा लेट नाईट शो असतो. तिच्याशी डर्टी टॉक करू पाहणारेही असतातच. हा शो ऐकून तिचे कुटुंबीय अस्वस्थ होतात, त्यामुळे तिचा नवरा अस्वस्थ होतो. तिच्या रात्रीच्या शिफ्ट आणि पहाटेपासून सुरू होणारा तिच्या संसाराचा  धबगडा. याचा तोल सांभाळण्याची कसरत सुरू होते आणि तो काहीसा ढळतो. त्यातून पौगंडावस्थेतला तिचा मुलगा काही घोळ घालतो. त्यामुळे तिच्यासमोर प्रश्‍न उभा राहतो... नेमकं काय करावं? 
हे इतकं तपशीलात आपल्याला प़डद्यावर दिसतं, कारण ते विद्या खूप मस्त सांगते आपल्याला. अर्थात यात दिग्दर्शक आणि पटकतेचा हात आहेच पण विद्या इतकी छान वावरतेना, की तिचं गोड सुलुपण येतच आपल्या मनात वस्तीला. 
तिला अशोक बनलेल्या मानव कौलने अतिशय समजुतदार साथ दिलीय. तिच्या आयडियांना कधीही मोडीत न काढणारा, संसारासाठी ती काय करतेय याची जाणिव असणारा, त्यामुळेच तिला न दुखावणारा पण नोकरीवरच्या तणावामुळे आणि सुलुच्या कुटुंबाच्या दबाबामुळे थोडा डिस्टर्ब होणारा नवरा सुलुचं गोड असंण अधिक ठळक बनवतो.
दिग्दर्शक सुरेश तिवारींनी सिनेमाला अतिशय छान ट्रिटमेंट दिलीय. नवरा-बायको आणि मुलांमधलं अकृत्रिम नातं त्यांनी अतिशय सुंदर सादर केलंय. एकूणच त्यांनी मांडलेले सगळेच नातेसंबंध मस्तच. इथे दिसणारी बहिणींमधली "सिबलिंग रायव्हलरी', त्यांच्यातली नोकझोक, तरीही त्यांचं अडचणींना धावून येणं हे कोणत्याही सामान्य कुटुंबात दिसू शकेल, असंच आहे. सुलू आणि अशोकचं ते मध्यमवर्गीय घर हेही एक व्यक्तिरेखाच म्हणून उभं राहतं. सुलूचं त्याच्याशीही वेगळंच नातं आहे. त्या घरात येणाऱ्या कबुतराशीही ती​ गप्पा मारते. त्यांच्यासारख्याच उडून सकाळी घरी परतणाऱ्या शेजारच्या एअर होस्टेसशीही बोलायचं असतं तिला... 
सुलुच हे सारं आसूसून जगणं प्रेक्षकांपर्यंत सहज पोहचतं याचं सारं श्रेय आहे दिग्दर्शकाचं. विद्या बालनबरोबर तोही या सिनेमात मिसळून गेलेला दिसतो प्रत्येक फ्रेममध्ये. त्याचबरोबर उल्लेख करायला हवा तो संवादांचा. अतिशय स्वाभाविक आणि वास्तवदर्शी संवाद येतात यातल्या व्यक्तिरेखांकडून. 
दिग्दर्शकाने या सिनेमाचा शेवट थोडा स्वप्नाळू केलाय. जो बाकी ट्रिटमेंटपेक्षा थोडा वेगळा वाटतो. तो अधिक वास्तवदर्शी आणि पॉझिटिव्ह नोटवर व्हायला हवा होता, असं वाटत राहतं. 
पण एकंदरीत सिनेमा​ आहे गोड​च.
म्हटलं, तर एका सर्वसामान्य गृहिणीची ही साधीशीच गोष्ट. पण "अगर मनमें ठान लो, तो कुछ भी हो सकता है' हे सत्य "मैं कर​ सकती है' या सुलूच्या साध्या शब्दांसाखंच थेटपणानं पोहोचवतो हा सिनेमा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com